गेल्याच महिन्यात मराठी भाषा दिन साजरा झाला. मराठीचा जागर करण्याचा हा दिवस. सगळीकडे मराठीचा उदोउदो झाला.
या दिनाच्या निमित्ताने शासनातर्फे मराठी विश्वकोशाच्या खंड १७ ते १९ चे इंटरनेटवरील प्रकाशनही झालं. साहित्यिकांचा सत्कारही झाला. मात्र रविंद्र नाट्यमंदिरात झालेल्या या सरकारी सोहोळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येणार सांगूनही उपस्थित नव्हते.
सरकारच्या वतीने मराठी वेबसाईटची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या साईटसची संख्या शंभरीही पार करु शकली नाही. वास्तविक सरकारच्या सर्व विभागांना या वेबसाईट स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सूचना शासनानेच परिपत्रक काढून दिली होती. मात्र सरकारी खात्यांच्या मराठी साईटस हा संशोधनाचाच विषय आहे. त्यावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ मराठी संकेतस्थळांचे उदघाटन करण्यात आलं पण ही संकेतस्थळं कोणती त्याची एखादी यादीसुद्धा प्रकाशित करण्याची गरज ना मिडियाला वाटली, ना वृत्तपत्रांना. असा उत्साह असल्यावर आणखी काय म्हणायचे?
विकिपिडियावर मराठीत केवळ ३८,००० लेख आहेत. मराठी वेबसाईटतर तीन आकड्यांच्याही संख्येत जात नाहीत. मराठी ब्लॉग्स आहेत पण त्यातले नियमितपणे अपडेट होणारे किती हा प्रश्नच आहे. तो तर एखाद्या वेगळ्या लेखाचा विषयच होईल.
हे सगळे होत असताना अगदी मराठी भाषा दिनाच्या मुहुर्तावर एक बातमी वाचली आणि मराठीची उपेक्षा अजूनही होत असल्याची खात्री पटली. ब्लॅकबेरी या आघाडीच्या स्मार्टफोनची नवी आवृत्ती येतेय. त्यात ७ भारतीय भाषांमध्ये काम करण्याची सोय आहे….. या ७ भारतीय भाषांमध्ये मराठीचा समावेश नाही ! मराठीचा समावेश नंतर होईल असे ब्लॅकबेरीच्या प्रवक्त्याने सांगितले खरे पण ते म्हणजे केवळ समजूत घालण्यासारखेच.
आता मराठीच्या प्रसार, प्रचार, संवर्धन, अभ्यास वगैरेसाठी कंबर कसणारे काय भूमिका घेतात बघूया….
— निनाद अरविंद प्रधान
११ मार्च २०१३
Leave a Reply