वसंत नरहर फेणे यांचा जन्म २८ एप्रिल १९२६ रोजी झाला.
वसंत नरहर फेणे यांना कौटुंबिक कारणांमुळे लहानपणापासूनच खूप वणवण करावी लागली. मुंबईतल्या जोगेश्वरी भागात बालपण व्यतीत होत असतानाच त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी पितृछत्र हरपले. त्यानंतर त्यांच्यासह भावंडांना घेऊन आई कारवारला गेली. तिथल्या मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावाबरोबर साताऱ्याला आले आणि तिथून वर्षभरातच पुन्हा कारवारला परतले. काही वर्षांनंतर ते मुंबईला आले आणि पुढचे सगळे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले.
लेखक म्हणून संवेदनशील वृत्ती असलेल्या फेणे यांनी या काळात राष्ट्रसेवादलाशी जोडून घेतले. नोकरीच्या निमित्ताने पुणे, कोल्हापूर, विजापूर, नाशिक अशी भटकंती करावी लागली. भटकंतीच्या काळातील या अनुभवांतूनच त्यांच्यातील लेखक घडत आणि प्रगल्भ बनत गेला. दिवाळी अंकांसाठी लेखन करणारे महत्त्वाचे लेखक म्हणून वसंत नरहर फेणे यांना ओळखले जाऊ लागले. कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद अशा विविध प्रकारांमध्ये वसंत फेणे यांनी भरपूर लेखन केले.
फेणे यांनी प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांमध्ये अधिक लेखन केले आहे. सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने या लेखनातून प्रकट होते. व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन मराठी साहित्यामधील प्रवृत्तीप्रवाहांच्या पलीकडे वावरणारे आहे. त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये सेंट्रल बस स्टेशन, सहस्रचंद्रदर्शन, विश्वंभरे बोलविले या कादंबऱ्या तसेच देशांतर कथा, ध्वजा, हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृद्गंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावल्यांची वसाहत, शतकान्तिका या कथासंग्रहांचा समावेश आहे.
पूर्णवेळ लेखनाला वाहून घेणारे लेखक मराठीमध्ये अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असतील. त्याचे कारण मराठीत लेखकांना आणि लेखनासाठी मिळणारा अल्प मोबदला. जोखीम असतानाही फेणे यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर १९७८ साली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखन-वाचनाला वाहून घेतले. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही त्यांनी व्रतस्थपणे लेखन-वाचन सुरू ठेवले होते.
मराठी साहित्यिकांच्या रूढ गटांमध्ये किंवा कंपूमध्ये फेणे कधी दिसले नाहीत. गंभीरपणे लेखन करणाऱ्या मध्यवर्ती प्रवाहातील लेखकांमध्ये त्यांची दखल फारशी घेतली नाही आणि वाचनसंस्कृती वाढवणाऱ्या लोकप्रिय लेखकांमध्येही त्यांना गृहित धरले नाही. त्यामुळे दर्जेदार आणि वाचकप्रिय लेखन करूनही वसंत नरहर फेणे तसे उपेक्षितच राहिले.
वसंत फेणे यांच्या ‘काना आणि मात्रा’ कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय ‘विश्वंभर बोलविले’ कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कार आणि मुंबईतील ‘शब्द : द बुक गॅलरी’च्या वतीने एकूण लेखकीय कारकीर्दीसाठी देण्यात येणाऱ्या भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कारानेही वसंत फेणे यांची यांचा सन्मान करण्यात आला.
वसंत नरहर फेणे यांचे निधन ६ मार्च २०१८ रोजी झाले.
Leave a Reply