चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी आपले अन्नही शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे असले पाहीजे. मात्र आपण मराठी माणसांनी ज्वारी खाणे बंद केल्यानेच बहुतांश आजार बळावल्याचे स्पष्ट मत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्टा आणि कल्याण रोटरी क्लबतर्फे कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘नियोजनबद्ध आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर ते बोलत होते.
आपल्या दैनंदिन आहारात ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पाचक रस ज्वारीत ठासून भरलेला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ज्वारीच्या पदार्थाने करण्याबरोबरच जेवणातही आपण तिचा वापर केल्यास लठ्ठपणा,मधुमेह,ख हृदयरोग यासारख्या अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो, असे खडीवाले यांनी सांगितले. तर हल्लीच्या काळात अपचनाची समस्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली असून रोजच्या जेवणात पुदिना, आले आणि लसूण यांपासून बनविलेली चटणी खाल्ल्यास तुम्ही खाल्लेला दगडही (पचण्यास जड अन्न) पचवण्याची ताकद शरिरात तयार होते.
ज्याला 100 वर्षे जगायचे असल्यास लसूणासारखा छोटासा पदार्थ नाही. रोजच्या आहारात लसणाच्या किमान 3 ते 4 पाकळ्या खाल्ल्यास मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार जवळ फिरकतही नाहीत. आपल्या शारीरिक विकारांत वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर किमान अर्धा तास चालल्यास डोक्यातील आणि पोटातील वायू बाहेर निघून चांगली झोप लागते.
तर आपल्याकडे उपवास करणाऱ्या व्यक्तींना शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे हे परदेशातून आलेले पदार्थ चालतात. मात्र उपवासाला बटाट्याऐवजी शिंगाडे,रताळ्याचा वापर करणे केव्हाही शरीरासाठी चांगलेच ठरते. ज्यांचे पोट वाढलेले आहे, त्यांनी चणाडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा अधिकाधिक वापर करावा. तसेच पश्चिमोतानासन आणि सिटअप्स (डोके आपल्या गुडघ्याला लावणे) केल्याने पोट कमी होते. पोट साफ नसल्याची तक्रार असणाऱ्यांनी दिवसातून किमान 20 ते 25 बिया असणाऱ्या काळ्या मनुका खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होण्याबरोबरच चांगले रक्त, सर्दी, खोकला, पडसे, दमा यांना आळा बसतो, असे ते म्हणाले.
तसेच पालेभाज्या या जमिनीपासून कमी उंचीवर असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याला माती लागण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या खाण्यापूर्वी गरम पाण्यातून धुवून घेतल्यास त्याला लागलेले मातीचे कण निघून जाण्यास मदत होते.
तर मीठ खाल्ल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण हे साखरेमूळे होणाऱ्या अजारांपेक्षा अधिक भयानक असल्याचे सांगत शक्यतो मिठाचा वापर टाळल्यास अनेक विकार आपण टाळू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही वैद्य खडीवाले यांनी सखोल उत्तरे दिली.
Leave a Reply