27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन‘ असतो. त्या निमित्ताने समस्त मराठी जनांना मराठीचा पुळका येत असतो. कार्यक्रमांची तर रेलचेलच असते. पण ‘बहुत राजकीय धुमाळी जाहली ऐजी जे‘ अशा बातम्याही 28 तारखेच्या पेपरांमधून वाचायला मिळतात. आपले काही अतिउत्साही मराठी एवढे थोर अहेत की ‘मराठी राजभाषा दिना‘ चे मोठमोठे कापडी फलक लावायलाही ते कमी करत नाहीत.
आपल्याच राज्यात आणि विशेषतः मुंबई राजधानीत आपलीच भाषा दीन’ का झालीय, याला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज मात्र कोणालाच वाटेनाशी झालीय, हे आपले दुर्दैव आहे. अशा वेळी ग्रेट मराठी कवी माधव ज्युलियन (ग्रेट म्हटलं की कसं मराठी असल्यासारखं वाटतं न?) यांची ‘मायबोली ही जुनी कविता मला आठवते…
मराठी असे आमुची मायबोली जरी आजही राजभाषा नसे
नसाआडवर्य या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे….
माधवराव, तुम्ही आज असता तर या दिव्य आशेचं काय झालंय हे बघून तुम्ही कपाळावर हात मारून घेतला असता. राजभाषा नसे या तुमच्या काळानंतर “राजभाषा असे हा काळ येऊन तब्बल 50 वर्षे लोटली पण अजून काही कविवर्य आलेलं नाही. याचं कारण काय म्हणाल तर, तुम्ही याच कवितेत पुढे काय म्हटलंय ते मराठी लोकांनी ध्यानात घेतलेलं नाही. तुम्ही म्हटलंय,
न घालू जरी वाङ्मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’ वृथा ही बढाई सुकार्या विणे…
आम्ही मराठी लोक वृथा बढाया मारत राहिलो. शिक्षण, साहित्य, कला, राजकारण, समाजकारण, व्यापार-उदीम यामध्ये आम्ही काही सुकार्य केलेल नाही. आता हे सत्य कडवट असल्याने आमचे आम्हालाच पटणे कठीण आहे. मराठी माणसांनी अंतर्मुख व्हा, असं जर कोणी सांगितलं तर त्याच्या तोंडावर पाच-पन्नास यशस्वी मराठी माणसांची उदाहरणे फेकून त्याला अंतर्मुख (शुद्ध मराठीत – थोबाडीत मारणे) करायला बढाईखोर सदैव सज्ज आहेत. ‘मराठी-मराठी’ करीत झेंडे नाचवणाऱ्या राजकीय आणि साहित्यातील वगैरे नेत्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये महदंतर कसे आहे? तर –
मराठी मराठी असा घोष कंठी, तयांची मुले मात्र कॉनव्हेटी आणि यांनी सांगायचं, लोकांना की मराठीत बोला, मराठीत चाला, म्हणून अरे! हमको क्या समझता है क्या तुम लोग? तुम हमको वापर के बीच में छोड देगा क्या? आं? हम मराठीच है और मराठीच रहेगा, हमको मराठी के बारे में मत सिखाना…
– डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply