मराठी कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ नाथमाधव यांचा जन्म ३ एप्रिल १८८२ रोजी झाला.
द्वारकानाथ माधव पितळे यांचे शिक्षण मुंबईत झाले. मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर पितळ्यांनी कुलाब्यातल्या तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी धरली. नोकरी करत असताना त्यांना शिकारीची आवड निर्माण झाली. १९०५ सालच्या मे महिन्यात सिंहगडाच्या परिसरात शिकारीस गेले असताना, टेहळणी करता करता ते कड्यावरून खाली कोसळले. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालील भाग लुळा पडला. रुग्णालयात चैद्यकीय उपचार घेत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. या काळात त्यांनी इंग्रजी व मराठी भाषांतील अनेक ग्रंथ वाचून काढले. या वाङमयाभिरुचीतून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
नाथमाधवांची पहिली कादंबरी, प्रेमवेडा, ही १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणाऱ्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.
नाथमाधव हे एक उत्तम शिकारी सुद्धा होते.
नाथमाधव यांचे २१ जून १९२८ रोजी निधन झाले. आपल्या समुहाकडून नाथमाधव यांना आदरांजली.
Leave a Reply