कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणार्या संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत.
संजीवनी मराठे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाला. शाळकरी वयातच त्या कविता लिहू लागल्या. तरुण वयात घरचा विरोध असताना त्यांनी रामभाऊ मराठे यांच्याशी विवाह केला होता.
१९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्यसंमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘काव्यसंजीवनी’ त्याच वर्षी प्रकाशित झाला. पुढे ‘राका,’ ‘संसार’, ‘छाया’, ‘चित्रा’, ‘चंद्रफूल’, ‘मी दिवाणी’ ‘आत्मीय’ अशा अनेक कवितासंग्रहातून आणि ‘भावपुष्प’ व ‘परिमला’गीतसंग्रहांतून त्यांची काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली. संजीवनी मराठे यांच्या कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणारी आहे.
संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी मराठी मनाला एकेकाळी मोहिनी घातली होती. संजीवनी मराठे यांच्या बालकविताही लक्षवेधी आहेत. बालमनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांनी शिशुगीते, कुमारगीते लिहिली आहेत. त्यात वात्सल्यभावनेचा परिपोष आढळतो. त्याचबरोबर मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते. मुलांशी संवाद साधत लिहिलेल्या या गीतांमध्ये गोडवा आहे. ‘बरं का ग आई’ आणि ‘नको बाई रुसू’ हे त्यांचे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांच्या काही कवितासंग्रहांमध्येही बालगीतांचा समावेश आहे. त्यांची ‘या गडे हासू या, या गडे नाचू या, गाऊ या मंगलगान,’ तसेच ‘सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग मधोमध विसावला, माझा चित्तचोर ग’ ही गाणी आजही लोकांच्या आठवणीत राहिलेली आहेत.
संजीवनीबाईंवर भा. रा. तांबे यांच्या भावगीतांचाही प्रभाव होता. आणखीही एका कवीचा त्यांच्यावर प्रभाव होता, तो कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांच्या ‘गीतांजली’ आणि ‘गार्डनर’मधील निसर्गरूपात परमतत्त्व पाहण्याच्या दृष्टीचा ठसा संजीवनीबाईंच्या कवितांमध्येही जाणवतो. संजीवनीबाईंच्या कविता वाचताना काळाच्या अंतरावरून तिच्या काही मर्यादा जाणवतात आणि ते साहजिकही आहे.
आज मराठीतील स्त्रीकाव्य वेगळय़ा टप्प्यावर आहे. पण म्हणून त्यांच्या कवितेच्या परंपरेतील संदर्भखुणा विसरता येणे शक्य नाही. किंबहुना संजीवनीबाई, पद्मा गोळे, सरिता पदकी आणि शांता किलरेस्कर यांनी पुण्यात ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ ही संस्था स्थापन करून आपली दूरदृष्टी व्यक्त केलेली आहे.
संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संक्षिप्त चांगला कविपरिचय.