कवि सूर्यकांत खांडेकर हे या मागील पिढीतील तसे नावारूपाला आलेले कवी. त्यांचा जन्म २ एप्रिल १९२६ रोजी झाला. कवि सूर्यकांत खांडेकर हे मितभाषी. म्हणजे वर्गात शिकविण्यापुरते बोलणारे असे शिक्षक. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कसदार कविता लिहिणारे कवी. त्या काळातील बहुतेक साऱ्या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असत. कालांतराने ते रयत शिक्षण संस्थेच्या कीर्ती महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक झाले. कवी मा.सूर्यकांत खांडेकर हे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे भाचे. त्यातूनच त्यांनी मराठी पोवाडा वाङ्मयाचा इतिहास लिहिला आणि बराच खडतर काळ गेल्यावर तो शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आला. ‘सावली’ आणि ‘पानफुल’ ‘छुमछुम’ (बालकविता) हे त्यांचे रसिकांच्या पसंतीस उतरलेले काव्यसंग्रह. त्याच्या कविता बालभारतीच्या पुस्तकात पण आहेत. मा.सूर्यकांत खांडेकर यांनी पाच एक मराठी चित्रपटांना गाणीही लिहिली.
‘या फुलाच्या गंधकोषी…’ या एकाच गाण्याने ते सर्वत्र प्रसिद्ध झाले.
‘सावली सूर्याची’ हे आत्मकथन कवि मा.सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी मा.अनुराधा खांडेकर यांनी लिहिले आहे. हे आत्मकथन आपणास एका काळातील एका नगरीची जशी सांस्कृतिक ओळख करून देते, तसेच ते आपणास एका सकस सहभावाची सात्विक ओळख करून देते. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे १५ जून १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सूर्यकांत खांडेकर यांची काही गाणी
उतरली सांज ही धरेवरी
गोड तुझी बासरी श्रीहरी
त्या फुलांच्या गंधकोषी
सहज सख्या एकटाच
त्या फुलांच्या गंधकोषी. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे हे गाणं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलंय आणि संगीतही त्यांचंच आहे. कवी सूर्यकांत खांडेकर यांनी आपल्या या काव्यातुन मानवाच्या मनामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध, अनंत काळापासुन सुरु आहे त्याचं अतिशय सुरेख वर्णन केले आहे. परमेश्वराचं हेच ते रूप असे मात्र कुणीही ठामपणे सांगत नाही, पण त्याचं अस्तित्व आपण सर्वजण मान्य करीत असतो. मग हा ईश्वर कुठे आहे, कसा आहे, कोणत्या रुपात आहे याचा शोध सर्वजण आपापल्या परीने घेत असतात.
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का
Leave a Reply