नवीन लेखन...

प्रतिभावंत कवी, तत्त्वचिंतक विं.दा.करंदीकर

विंदा करंदीकर हे धालवली खारेपाटण ता. देवगड गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी, जेष्ठ लेखक, अभ्यासू आणि जाणकार समीक्षक, बाल नाटककार, संस्कृत आणि मराठी वाङ्‌मय गाढे अभ्यासक .एक चोखंदळ वाचक, विध्यार्त्यांचे मार्गदर्शक. असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व. विंदाच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो..! मराठी साहित्य विश्वात लेखक कवी विंदांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.त्यांचे पूर्ण नाव ‘गोविंद विनायक करंदीकर! ‘परंतु मराठी मनामनात घर केलं ते ‘विंदा ‘या नावानेच…!
जन्म नाव:- गोविंद विनायक करंदीकर
टोपणनाव:- विंदा, विंदा करंदीकर
जन्म: ऑगस्ट २३, १९१८
धालवली खारेपाटण ता. देवगड, सिंधुदुर्ग
मृत्यू: मार्च १४,२०१०
मुंबई,महाराष्ट्र.
राष्ट्रीयत्व- भारतीय
कार्यक्षेत्र- कवी, समीक्षक
साहित्य प्रकार- कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य
पुरस्कार: ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान,जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान
गोविंद विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी जयश्री विश्वास काळे आणि नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते
वि.स.खांडेकर आणि वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे केवळ तिसरे मराठी लेखक म्हणजे विंदा ! त्यांना ‘अष्टदर्शने ‘या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला.विंदांच्या कवितेच्या दिंडीत “स्वेदगंगा, मृद्गंध, धृपद, जातक, विरूपिका”हे काव्यसंग्रह भव्यमनाच्या सूक्ष्म नादातून गजर करीत नाचले.तर बालनगरीतल्या भूमीवर त्यांनी “राणीचा बाग,एकदा काय झाले,सशाचे कान,परी गं परी,अजबखाना,सर्कसवाला,बागुलबोवा,तटू लोकांचा देश”हे बालकवितासंग्रह फुलवले. त्यांचे “स्पर्शाची पालवी”आणि”आकाशाचा अर्थ”हे लघुनिबंध, “फाउस्ट, राजा लियर, अॅरिस्टाॅटलचे काव्यशास्त्र”यासारख्या अभिजात साहित्यकृतीचे अनुवाद प्रसिद्ध.
कवितांविषयी….
विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणार्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते.
प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.
मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत – “करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगूळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले ‘ज्ञानपीठ’ हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे.”
देणार्‍याने देत जावे,
घेणार्‍याने घेत जावे,
घेता घेतां एक दिवस,
देणार्‍याचे हात घ्यावे
– विं.दा.करंदीकर
© गणेश उर्फ अभिजित कदम, कुडाळ, सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..