नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
डॉ.श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ सातारा येथे झाला. डॉ. श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानियायेथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात जम बसत असतानाही केवळ नाटकाच्या ओढीने कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. डॉ.लागूंनी रंगभूमीवर कलावंत म्हणून प्रवास सुरु केला. पी.डी.ए, रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. ह्या मान्यवर नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच एक होती राणी आणि अॅन्टीगनी या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे. त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या ‘प्रायोगिक’ कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या. मोहन तोंडवळकर, सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही त्यांनी निष्ठेने काम केले. सत्यदेव दुबे यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली.
डॉ.श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या त्यातही नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या ‘झाकोळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’तल्या अभिनयाने इतिहास घडवला. सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. ‘पिंजरा’तली भूमिका आव्हानात्मक होती. एकाच चित्रपटात लागूंनी दुहेरी अभिनय केला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला एका संस्कारक्षम, जीवनातील सर्व मूल्य सांभाळून असणारा शिस्तप्रिय शिक्षक, तर चित्रपटांच्या उत्तरार्धात सर्व संस्कार लयाला गेलेली एक असहाय, केविलवाणी, स्वत:चं सर्व अस्तित्व घालवून बसलेली व्यक्ती. एकाच चित्रपटातली आपली ही दोन रुपं अभिनयाच्या ताकदीवर लागूंनी इतकी अप्रतिम साकारलीत की आजही भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास वर्णन करताना तो ह्या भूमिकेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निळू फुले आणि श्रीराम लागूंचा ‘सामना’ ही चांगलाच रंगला. आणि लागूंच्या ‘सिंहासन’लाही रसिकांनी दाद दिली. आणि सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली.हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीने चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली. मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. हिंदीत चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. ‘सौतन’ चित्रपटातील वडिलांची भूमिका त्यांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात रहाते. अनेक मालिकांमधूनही त्यांनी काम केले. व्यावसायिक चित्रपटांच्या या दुनियेत कामाच्या समाधानापेक्षा लोकांना काय आवडते हे जास्त पाहिले जाते. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनात सुरु झालेला श्रीराम लागूंचा चित्रपट प्रवास एका एखाद्या सुंदर स्वप्नासारखा आहे, श्रीराम लागूंच्या अनेकविध भूमिकांमधले वैविध्य अचंबित करणारे आहे. लागूंनी पु. लं.च्या ‘सुंदर मी होणार’ मधूनही काम केले. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारीत ‘ सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटकही वैचारीक वर्तुळात गाजले. शिवाय ‘मित्र’ मधूनही वेगळे लागू पहायला मिळाले. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘देवाला रिटायर करा’ या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती. विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे मा.श्रीराम लागू अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर परखड प्रतिक्रिया नोंदवतात. सांस्कृतिक व्यासपीठावर ते चौफेर विषयांवर अभ्यासपूर्ण विधाने करतात. सूक्ष्म निरिक्षण व विश्लेषण क्षमता याचा उत्कृष्ट संयोग त्यांच्या व्यक्तीमत्वात झाला आहे. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन करण्यात आला. मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरविले आहे. मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक आहे ‘रूपवेध’.
तसेच “लमाण” हे डॉ. श्रीराम लागू यांनी लिहीलेले स्वताःचे आत्मचरित्र आहे.
‘लमाण’ म्हणजे मालवाहू कामगार. वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या ‘नटसम्राट’ या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील त्यांचे वाक्य आहे : ”आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.”
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
श्रीराम लागू यांचे नटसम्राट नाटक
श्रीराम लागू यांचा पिंजरा चित्रपट
श्रीराम लागू यांचा सामना चित्रपट
श्रीराम लागू यांचा सिंहांसन चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=nQoh1HGlxdY
Leave a Reply