५ नोव्हेंबरच्या रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी १८४३ साली मा.विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीच्या दरबारात केला’ असा चुकीचा उल्लेख आला आहे. वास्तविक, भावे यांनी त्या वर्षी हा प्रयोग कधी केला, याची तारीख संशोधकांनाही उपलब्ध झालेली नाही. रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरच का? केव्हापासून? त्याचे ज्ञात उत्तर असे :
१९४३ मध्ये सांगली येथे मराठी नाटकाचा शतसांवत्सरिक उत्सव व नाटय़संमेलन भरले. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन (चिंतामणरावांचे नातू, यांचेही नाव हिज हायनेस चिंतामणराव) यांनी ‘नाटय़ विद्यामंदिर’ स्थापन करण्यासाठी गावातील मध्यवर्ती जागा दिली व तेथील इमारतीचा कोनशिला समारंभ पाच नोव्हेंबर १९४३ रोजी झाला. सध्या या जागी ‘विष्णुदास भावे नाटय़गृह’ आणि ‘अखिल भारतीय नाटय़ विद्यामंदिर समिती’चे कार्यालय आहे. नाटय़ महोत्सवातील हा महत्त्वाचा दिवस, त्यामुळे दरवर्षी नटराज पूजन करून ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन पाळला जावा, असा ठराव केला गेला. ५ नोव्हेंबर १९४३ पासूनच हा ‘रंगभूमी दिन’ पाळला जातो. अ. भा. मराठी नाटय़ विद्यामंदिर समितीच्या १९६०च्या अहवालात याचा पुनरुच्चार केला आहे. विष्णुदासांचा पहिला ‘सीतास्वयंवरा’चा नाटय़प्रयोग त्या दिवशी झाल्याचा अस्सल पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही. नाटय़ाभ्यासकांच्या मनात चुकीची नोंद होऊ नये, म्हणून हा खुलासा.
डॉ.तारा भवाळकर, सांगली
मराठी रंगभूमी स्थापनादिन प्रतिवर्षी ठिकठिकाणी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्यार ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, दिलीप प्रभावळकर,रामदास कामत, शं.ना. नवरे , फय्याज इमाम शेख, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, महेश एलकुंचवार, डॉ.जब्बार पटेल, जयंत सावरकर आदींना मिळाला आहे. पुरस्काराचे यंदाचे हे ५२ वे वर्ष आहे. या वर्षीचा पुरस्कार अनेक नाटके, व मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते मा. मोहन जोशी यांना मिळाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मोहन जोशी यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी सुरू असतानाच त्यांचा अभिनयाकडे ओढा वाढला. ‘टूनटून नगरी- खणखण राजा’ या बालनाट्यापासून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. पुण्याच्या भरत नाट्य मंदिर संस्थेतर्फे बालनाट्य, एकांकिका, नाटक यामध्ये त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. ‘गार्बो’, ‘एक शून्य बाजीराव’ या प्रायोगिक नाटकांत सहभाग घेत ‘मोरूची मावशी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यातून मराठी रंगभूमीला एक विनोदी कलाकार मिळाला. त्यांचे ‘नाथ हा माझा’ हे नाटक खूप गाजले. तेथून त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर हमखास यश मिळवून देणारा कलाकार अशी नोंद झाली. ‘प्रेमाच्या गांवा जावे’, ‘आसू आणि हासू’ ही त्यांची गाजलेली नाटके. त्यानंतर ते चित्रपट सृष्टीत गेले. तेथेही त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी १०२ पेक्षा अधिक मराठी चित्रपटात काम केले. ‘भूकंप’ या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटात सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी १७२ पेक्षा अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्या शिवाय बंगाली, भोजपूरी आणि कन्नड भाषांतील चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. मराठी आणि हिंदीमध्ये अनेक मालिकांत त्यांचा सहभाग आहे. अभिनयाबरोबर त्यांचे सामाजीक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. मैत्री ट्रस्टच्या माध्यमातून वृद्ध, अपंग आणि आजारी कलाकारांना मोठी मदत केली आहे. सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्या माध्यमातून विविध योजना ते राबवत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply