शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०
हैदराबादच्या आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. सेतुमाधवराव पगडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने समग्र सेतुमाधवराव पगडी या त्यांच्या साहित्याच्या इंग्रजी व मराठी अशा आठ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. पु.ल.देशपांडे
कला अकादमी व आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गो.ब.देगलूरकर होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला असून सांस्कृतिक धोरणही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने सकारात्मक भूमिकेतून मराठी भाषेची जपणूक करण्याच्या दृष्टीने भविष्याची जडणघडण होण्यासाठी ही पावले उचलली आहेत. ते म्हणाले, देशाचा व राज्याचा इतिहास आपल्याला बदलता येणार नाही, तो आपला ठेवा आहे आणि तो जोपासला जावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. देशात तसेच राज्यात चांगले वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर लेखक, साहित्यिक, विचारवंत यांनी या गोष्टीस प्रखर विरोध करावा. सेतुमाधवराव पगडी यांनी ६० वर्षे सतत लेखन, संशोधन, अभ्यास व संचार या चतु:सुत्रीच्या आधारावर कथेपासून संशोधनात्मक विषयांपर्यंत असे विविधांगी लेखन केले. त्यांनी ६६ मराठी-इंग्रजी ग्रंथांची रचना केली. त्यातून उलगडणारा इतिहासाचा पट त्यांनी आजच्या वर्तमानासाठी व भावी पिढय़ांसाठी ठेवलेला वारसा म्हणजेच हा समग्र सेतुमाधवराव पगडी ग्रंथ प्रकल्प होय, असे गौरवोद्गार श्री. चव्हाण यांनी काढले. या पाच मराठी खंडा
ंचे एकत्रित मूल्य आठ हजार रुपये असून दोन इंग्रजी खंडाचे एकत्रित मूल्य दोन हजार रुपये आहे. कल्पना मुद्रणालय यांनी या खंडाची छपाई केलेली आहे. राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे, सांस्कृतिक कार्य संचालक दिलीप शिंदे, परिषदेचे
अध्यक्ष द.पं.जोशी, कार्यवाह विद्या देवधर, अब्दुल सत्तार दळवी, डॉ.राजा दीक्षित, डॉ.निशिकांत ठकार, आनंद लाटकर, ना.धों.महानोर, चंद्रकांत पाटील, सुधीर आंबेकर, अरुण पगडी, अरुणचंद्र पाठक, उषाताई जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
— बातमीदार
Leave a Reply