नवीन लेखन...

मराठी साहित्यातील साठोत्तरी समीक्षाप्रवाह

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला कृष्णा चौधरी यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


साठोत्तरी समीक्षाप्रवाहात साहित्यप्रकारांचा, अनेकविध जाणिवांचा विकास झाल्यामुळे समीक्षाविचारांचे काही ठळक प्रवाह दिसून येतात. जीवनवादी, कलावादी, आदर्श मूल्यांवर आधारलेला, नैतिक मूल्यांचा, सत्य, शिव व सौंदर्याचा पुरस्कार करणारी समीक्षापद्धती मागे पडली आणि साम्यवादी, ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, अस्तित्ववादी, ग्रामीण, दलित, प्रतीकवादी, आदिवासी, स्त्रीवादी, चरित्रात्मक व आदिबंधात्मक समीक्षाविचारांचा प्रवाह खळखळू लागला. एक सौंदर्यशास्त्रीय (स्वायत्ततावादी-रूपवादी) समीक्षेचा अपवाद वगळता, वरील सर्व लौकिकतावादी समीक्षाप्रवाह कलाकृतीतील सौंदर्यानुभूतीचे घटक कसे असावेत याविषयी सतत विचार करताना दिसतात. कलाकृतीकडे ते हेतुयुक्त साधन म्हणून पाहतात. फक्त सौंदर्यवादी-स्वायत्ततावादी समीक्षाच कलानिर्मितीच्या प्रक्रियेचा विचार करते. कलाकृतीत माध्यमधर्मामुळे, द्रव्य व माध्यमाच्या संयोगामुळे एक नवे रसायन निर्माण होऊन एक स्वतंत्र कलाकृती, आशय व घाटातून साकार होत असते, असे सौंदर्यवादी समीक्षा मानते.

समीक्षा ही एक ज्ञानगर्भ व मूल्यगर्भ संज्ञा असून, सौंदर्यानुभूतीतील विविध घटकातील संगती लावून सर्जनशील अशी अक्षर कलाकृती कशी निर्माण होते, त्या कलाकृतीतील केंद्र व परिघाचा व्यूह कसा अनेकार्थसूचक होत जातो याचे विश्लेषण करून कलाकृतीचा आस्वादप्रक्रियेतून विचार करते.कलाकृतीचे विश्लेषण, अर्थनिर्णयन व मूल्यमापन करणारी ज्ञानगर्भप्रक्रिया, सौंदर्यवादी समीक्षाप्रवाहात प्राधान्याने दिसून येते. या समीक्षेची गंगोत्री म्हणजे मर्टेकरांचा ‘सौंदर्य आणि साहित्य’ हा ग्रंथ होय. कलावंत, कला व रसिक या तिन्ही घटकांचा एकात्मविचार करून कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया व आस्वादप्रक्रिया विशद करणारी सौंदर्यवादी समीक्षा, त्यांनी लयबंधाच्या रूपाने मांडली.

युरोपातील साहित्यविचारवंतांनी साहित्यकृतीच्या संरचनेचा वेध भाषिक पातळीवर घेऊन कलाकृतीतील आशयसूत्र प्रतिमा, प्रतीक, अलंकार व भाषेच्या व्यंजनेतून अनेकार्थसूचक कसे होते याचे विश्लेषण केले. रोमँटिक समीक्षेत कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार केला जात होता; पण इलियटने काव्य म्हणजे व्यक्तिमत्त्वापासून मुक्त होणे अशी ‘ऑब्जेक्टिव्ह ,
कोरिलेटिव्हिटी’ची (भावनानिष्ठ समतानता) संकल्पना मांडली.

रूपवादीसमीक्षेची प्रधान वैशिष्ट्ये गंगाधर पाटील यांनी ‘समीक्षेची नवी रूपे’ या ग्रंथात सांगितली, ती अशी:

१. कलाकृतीची निर्मिती हा जीवनप्रवाहाचा अविभाज्य भाग असतो.

२. कलाकृतीचे कलाकृतीपण अनुभवघटकांच्या नवरचनेत असते.

३. या रचनेतून सचेतनत्वाचा प्रत्यय आल्याखेरीज कोणतीही घटना ही कलाकृती म्हणून सिद्ध होत नसते.

प्रभाकर पाध्ये यांच्या भाषेत- कलाकृती हा एक ‘मोनॅड’ असतो. (अन्यून व अनरिक्त) बाहेरून किंवा आतून काहीही येऊ-जाऊ न शकणारी अशी सेंद्रिय व एकजिनसी संरचना म्हणजे कलाकृती. सेंद्रियता व रूपबंधाशी निगडित असणे ही रूपवादी समीक्षेची प्रमुख लक्षणे आहेत.या सौंदर्यवादी समीक्षेवर वा.ल.कुलकर्णी, पु.शि.रेगे, गंगाधर गाडगीळ, माधव आचवल, सुधीर रसाळ, सुरेंद्र बारलिंगे, वसंत दावतर, रा.भा.पाटणकर,शरदच्चंद्र मुक्तिबोध, द.भि.कुलकर्णी, विवेक गोखले,विजयराज इंगळे, प्रभाकर पाध्ये, गो.वि.करंदीकर, नरहर कुरुंदकर, अशोक जोशी, मिलिंद मालशे व कृष्णा चौधरी यांनी लेखन केले आहे.

साम्यवादी महावर्तुळातील एक लहान वर्तुळ म्हणजे समाजवादी समीक्षा. साठोत्तरी कालखंडात मराठी समीक्षाप्रवाहात या समीक्षेने आपली मुळे रुजवली. मार्क्स व एंगल्स यांनी विशिष्ट भौतिक परिस्थितीत विशिष्ट प्रकारची विचारसरणी व त्यानुसार कलाकृती निर्माण होतात असे म्हटले.कलावाद व जीवनवाद यातील द्वंद्वच मार्क्सवादी समीक्षेने नष्ट केले. समाजवादी समीक्षेची सुरुवात लालजी पेंडसेंच्या ‘साहित्य आणि समाजजीवन’ या ग्रंथाने झाली (१९३५).दि.के.बेडेकर, सदा कन्हाडे, स.शि.भावे, के.वा.शिरवाडकर, गं.बा.सरदार, वि.स.जोग, दिगंबर पाध्ये, प्रभाकर पाध्ये यांनी या साम्यवादी समीक्षा केली आहे.

मराठी समीक्षेत मानसशास्त्रीय समीक्षा युरोपीय समीक्षेप्रमाणे रुजली नाही. या समीक्षेचे नाते काही प्रमाणात चरित्रात्मक समीक्षेशी जुळते. पण कलानिर्मितीची प्रक्रिया ही लौकिकभिन्न स्वरूपाची असल्यामुळे कलाकृतीची प्रत व पोत तिचा समग्र संरचनात्मक लयबंध ही समीक्षा उलगडून दाखवू शकत नाही. त्र्यं.वि.सरदेशमुख, कि.मो.फडके, मे.पुं.रेगे यांनी या समीक्षेत लेखन केले आहे.

आदिबंधात्मक समीक्षा हा सौंदर्यवादी समीक्षा/संरचनावादी समीक्षेला जोडणारा पूल आहे. याचे उदाहरण म्हणून पु.शि.रेगे यांच्या ‘सुहृदगाथा’ या कवितासंग्रहाची दीर्घ प्रस्तावना सांगता येईल.या समीक्षेत सात दृष्टिकोनांतून विचार करण्यात येतो. भाषिक, रूपबंधात्मक (संरचनात्मक), कल्पकतापूर्ण, प्रकारात्मक, सौंदर्यात्मक, अस्तित्वात्मक (सौंदर्यशास्त्रीय) अशी अंगे हीत एकवटलेली असतात. जी. ए., ग्रेस, आरती प्रभू व बालकवी यांची निर्मितीप्रक्रिया शोधण्याचा प्रयत्नही समीक्षा करते.

साठोत्तरी कालखंडात स्त्रीमुक्तीच्या बंडखोर जाणिवेतून पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करून स्त्रीमनाच्या अंतःसत्त्वाचा वेध स्त्रीवादी समीक्षा घेते. ‘महर्षी ते गार्गी’ (मंगला आठलेकर), ‘स्त्रीविकासाच्या पाऊलखुणा’ (विनया खडपेकर), ‘स्त्रीसाहित्याचा मागोवा खंड १ व २’ (मंदा खांडगे), ‘स्त्रीलिखित कादंबऱ्याः प्रेरणा आणि प्रवृत्ती’ (विद्या देवधर), ‘स्त्रीवादी समीक्षाः स्वरूप आणि उपयोजन’ (अश्विनी धोंडगे), ‘भारतीय नारी’ (संपा.सरोजिनी बाबर), ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर व तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ (तारा भवाळकर), ‘स्त्रीप्रश्नांची वाटचाल’ (विद्युत भागवत), ‘स्त्रीप्रश्नांची चर्चा’ (प्रतिभा रानडे), भारतीय स्त्रीजीवन’ (गीता साने), ‘साहित्य आणि सामाजिक संदर्भ’ (अंजली सोमण), ‘भारतीय स्त्रीसंकल्पना आणि प्रतिमा’ (मीना केळकर), ‘स्त्रीवादी कादंबऱ्या’ (शंकर सारडा), ‘स्त्रीसूक्त’ (माधवी कुंटे) व ‘स्त्रीवादी समीक्षा’ (मंगला वरखेडे) इत्यादी ग्रंथ स्त्रीवादी समीक्षेचे संश्लेषण व विश्लेषण करणारे आहेत.

साठोत्तरी समीक्षेत अस्तित्ववादी (घटितार्थवादी) समीक्षेच्या प्रवाहाला केंद्रिभूत स्थान आहे. दि.के.बेडेकर, पी.डी.चौधरी, रवींद्र मनोहर, रेखा इनामदार-साने ह्यांच्या ग्रंथांतून अस्तित्ववादी समीक्षेची बीजे प्रकट होतात.

दलित साहित्यसमीक्षा, विद्रोही जाणिवेचे विश्लेषण करते व कलाकृतीला साधन मानून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयींचा पुरस्कार करून, मानवतेची प्रतिस्थापना करणे आपले साध्य मानते. डॉ.म.ना.वानखेडे, डॉ.जनार्दन वाघमारे,बाबुराव बागुल, रा.ग.जाधव, डॉ.भालचंद्र फडके, ज्योती लांजेवार, डॉ.यशवंत मनोहर, एस्.एस्.भोसले, केशव मेश्राम, वामन निंबाळकर, शरणकुमार लिंबाळे, इत्यादींची दलित साहित्यावरची समीक्षा इथे नमूद करणे आवश्यक वाटते.

प्राचीन इतिहासाला मूळारंभ देणारे साहित्य ही आदिवासी समीक्षेची प्रेरणा आहे. विनायक तुमराम, प्रमोद मुनघाटे, डॉ.रमेश कुबल, गोविंद मोरे, माधव मोरे इत्यादींचे ग्रंथ आदिवासी समीक्षाप्रवाहाची संकल्पना स्पष्ट करणारे आहेत.

इतिहासनिष्ठ समीक्षालेखनात काळ, समाज, परिवेश यांनी साहित्यकृतीचे मूल्यमापन होत असल्याने तिचे स्वरूप सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी असे आहे.

चरित्रात्मक समीक्षेत लेखकाच्या साहित्यकृतीतून त्याचा धर्म, नैतिक मूल्ये, कौटुंबिक परिस्थिती, गुणदोष इत्यादींचे चरित्रात्मक विवेचन येते. डॉ.विजया राजाध्यक्ष, जया दडकर, म.वा.धोंड यांनी अशा प्रकारचे समीक्षालेखन केलेले आहे.

प्रतीकवादी समीक्षा कलाकृतीतील सौंदर्यानुभूतीच्या रूपाचा अर्थ प्रक्षेपित करून, प्रतीकातील आशय व प्रतीकरूप वस्तु, यांतील गुणधर्मसाम्य रचनाबंधातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. डॉ.सुधीर रसाळ, डॉ.द.भि.कुलकर्णी, मालती पाटील, म.द.हातकणंगलेकर, रा.ग.जाधव इत्यादींनी अशा प्रकारची समीक्षा केलेली आहे.

देशीवादी समीक्षेत विशिष्ट भूप्रदेश, भाषा, परंपरा आणि संस्कृती हे महत्त्वाचे घटक असतात. नेमाडे व चित्रे यांचे तुकारामावरील ग्रंथ हे या समीक्षेची उदाहरणे म्हणून देता येतील. अलीकडे साहित्याचा मूलबंध कळण्यासाठी शैलीशास्त्रीय समीक्षेचा उदय झाला. अशोक केळकर, अश्विनी धोंडगे, रमेश धोंडगे, दिलीप धोंडगे, सुरेश भृगुवार, म.द.हातकणंगलेकर, कल्याण काळे यांनी अशी समीक्षा केलेली आहे.

समीक्षाविचार हा साहित्यकृतीतील सौंदर्यानुभूतीचे घटक कोणते असावेत हे ठरवणारा प्रमुख विचारप्रवाह आहे. नीतिशास्त्रीय, आदर्शवादी, साम्यवादी, मानसशास्त्रीय, अस्तित्ववादी, देशी, यथार्थवादी, स्त्रीवादी, प्रतीकवादी व आदिबंधात्मक हे सर्व समीक्षाप्रवाह कलाकृतीतील विविध घटकांच्या अस्तित्वाला महत्त्व देतात.फक्त सौंदर्यवादी, रूपवादी समीक्षाच कलाकृतीतील सर्व घटक लयबद्ध संघटनतत्त्वाने किंवा भारतीय साहित्यशास्त्रानुसार व्यंग्यार्थाने धारणीकरणामुळे कशी आकारास येते याचा प्रामुख्याने विचार करते. भावानुभवाचे सौंदर्यनिष्ठ लयबद्ध संघटन म्हणजे साहित्यकृती, हा विचार मर्टेकरांनी दिला; तो कलाकृतीच्या निर्मितीप्रक्रियेचा व आस्वादप्रक्रियेचा विचार करणारा आहे. इतर सर्व समीक्षाप्रवाह कलाकृतीचा साधन म्हणून विचार करतात.

सौंदर्यवादी/रूपवादी/संरचनावादी समीक्षाच द्रव्य व आकार (आशय व घाट) यांचा, माध्यमधर्माने कलानिर्मितीप्रक्रियेचा व आस्वादप्रक्रियेचा साहित्यकृतीच्या माध्यमातून विचार करते. माध्यम म्हणजे कलावंताची बाह्यजगाविषयीची जाणीव. द्रव्य व आकार या दोन्ही घटकांचे रसायन सौंदर्यशास्त्रीय समीक्षेत होते. कलाकृतीतील द्रव्य व माध्यमभेद सौंदर्यवादी समीक्षाच ओळखू शकते कारण ती कलाकृतीतील भावनानिष्ठ अर्थाचे विश्लेषण संश्लेषण व संघटन करून कलाकृतीची योग्य प्रतवारी ठरवू शकते.

— कृष्णा चौधरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..