आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचे चित्र करणारे ज्येष्ठ साहित्यिक व झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचा जन्म १ जानेवारी १९४२ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या ‘एनकूळ’ या गावी झाला.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात जन्मलेले तुपे रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात मोलमजुरी करून दिवस काढले. लेखागार विभागात शिपाई म्हणून नोकरीला लागले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. अल्पशिक्षित असूनही तुपे लिहू लागले. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली आहेत. त्यांनी कादंबरी, कथा, नाटक आणि आत्मकथन प्रकारात पन्नासहून अधिक पुस्तकांतून भरीव अशी साहित्यनिर्मिती केली.
तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. त्यांचे ‘काट्यावरची पोटं’ हे आत्मचरित्र गाजले. ‘काट्यावरची पोटं’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘झुलवा’ कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी तुपे यांच्या ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक रंगभूमीवर आणले होते. त्यात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या. १९९७ साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार, तसेच त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता.
उत्तम बंडू तुपे यांचे २६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
उत्तम बंडू तुपे यांचे लेखन.
इजाळ (कादंबरी), खाई (कादंबरी), खुळी (कादंबरी), चिपाड (कादंबरी), झावळ (कादंबरी), झुलवा (कादंबरी), भस्म (कादंबरी), लांबलेल्या सावल्या (कादंबरी), शेवंती (कादंबरी), संतू (कादंबरी), आंदण (लघुकथा संग्रह), पिंड (लघुकथा संग्रह), माती आणि माणसं (लघुकथा संग्रह), कोबारा (लघुकथा संग्रह), काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply