नवीन लेखन...

प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके

प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (Shridhar Phadke) यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला.

मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व ‘देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी….’ या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मा.श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. ‘तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण’ असं श्रीधर फडके म्हणतात.

लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि ‘तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा’ असं सुचवलं. मा.सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही.

श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला. कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया मा.श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा…

कुठे जातात भेटून
कशा होतात ओळखी
आणि आपली माणसे
कशी होतात पारखी

या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या….

कुण्या देशाचे पाखरू
माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी
परी ओळखीचे डोळे

श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).

एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”

श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक , ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्य संगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. त्यांना ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटासाठी ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी, ‘लेकरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. श्रीधर फडके यांनी आत्ता पर्यंत अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, ३ मराठी व ११ गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. अशोक जैन / थिंक महाराष्ट्र

श्रीधर फडके यांनी गायलेली, संगीत दिलेली काही गाणी





https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE&t=287s

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..