भारतीय भाषांचा संगणकावर उपयोग गेली वीसहून जास्त वर्षे होत आहे. मात्र दुर्दैवाने सुरुवातीची बरीच वर्षे केवळ डीटीपी म्हणजे मुद्रणविषयक गरजांसाठीच संगणकाचा मराठीत वापर होता. या काळात बर्याच तांत्रिक सुधारणा झाल्या. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानातील मोठ्या उलाढालीमुळे संगणक गतीवान बनले, माहिती साठवण्याच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली. एकदा मुद्रणव्यवसायासाठी संगणकाचा भारतीय भाषांमध्ये सुरळीत आणि यशस्वी वापर होतोय हे पाहिल्यावर इतरही क्षेत्रांमध्ये भारतीय भाषांचा संगणकावर वापर सुरु झाला. वेगवेगळ्या कामांसाठी सॉफ्टवेअर बनवली गेली. बँका, सरकारी खाती यामध्ये संगणकाच्या वाढत्या वापराबरोबरच भाषिक सॉफ्टवेअरचा उपयोग होउ लागला.
सुरुवातीच्या काळातील सी-डॅक, आकृती, आयटीआर, मॉड्युलर यासारख्या केवळ चारपाच मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्यांच्या जोडीने नवेनवे सॉफ्टवेअर निर्माते या क्षेत्रात येउ लागले. आपआपल्या परिने सॉफ्टवेअर बनवू लागले.
बघताबघता वर्षामागून वर्षे जात होती आणि मोठ्या प्रमाणावर माहितीचा साठा मराठी आणि इतर भाषांमध्ये तयार होऊ लागला. वेगवेगळ्या कामांसाठी हा साठा वापरला जाऊ लागला, अगदी सरकारदरबारी आणि खाजगी क्षेत्रातही.
सगळं सुरळीत चालू होतं पण केव्हातरी माशी शिंकली आणि एक दिवस अडचणींचा आला. दुसर्या दिवशी दुसरी अडचण आली. दिवसामागून दिवस जात होते आणि काही मोठ्ठे प्रश्न निर्माण होत होते. प्रश्नामागून प्रश्न निर्माण झाले आणि त्यांची उत्तरे शोधायचा प्रयत्न सुरु झाला. काय होते हे प्रश्न? कोणत्या होत्या या समस्या? यावर पूर्वी विचार झाला नव्हता ? की झाला असला तरीही डोळेझाक केली गेली? डोळेझाक केली तर ती का ? कोणाचा फायदा होता त्यात ? आणि मग त्यामुळे नुकसान कोणाचं झालं ?
या प्रश्नांचा, त्यामागील कारणांचा अभ्यास या लेखमालेत केला गेलाय. या समस्यांवरील उपायांचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. तांत्रिक बाबी लक्षात घेउन, मात्र त्यांचे अवडंबर न माजविता, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोणा एका सॉफ्टवेअर निर्मात्यावर दोषारोप करण्याचा उद्देश नाही आणि चुका काढण्याचाही प्रश्न नाही. जबाबदारी सर्वांचीच आहे. सॉफ्टवेअर निर्मात्यांची आहे तशी सरकारी संस्थांची आणि सरकारचीही आहे आणि सॉफ्टवेअर वापरणार्यांचीही आहे.
या लेखमालेसाठी प्रामुख्याने मराठी भाषेचा विचार केला असल्यामुळे देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्या हिंदी किंवा संस्कृतसारख्या इतर भाषांचा विचार केलेला नाही. मात्र मराठीबाबत येणार्या सर्व समस्या हिंदीमध्येही तशाच प्रकारे संबंधित आहेत आणि मराठीसाठी जी उत्तरे किंवा उपाययोजना पुढे येतील त्यांची हिंदीसाठीही तशाच पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे केवळ लेखाचा सुटसुटीतपणा आणि वारंवार ‘हिंदी आणि मराठी’ अशा शब्दप्रयोगाचा उपयोग टाळला आहे.
सध्या फॉन्टचे प्रमाणीकरण म्हणजे युनिकोड असा काही संस्थांचा आणि व्यक्तींचा समज झालेला आहे, आणि तसा प्रचारही सुरु झालेला आहे. संशोधनात्मक उपयोग बाजूला ठेवून प्रत्यक्ष संगणकावर मोठ्या प्रमाणात काम करणार्या वृत्तपत्रे, प्रकाशने, डाटा सव्र्हिसेस यांसारख्या व्यवसायांना युनिकोडचा फायदा अथवा तोटा काय याचा विचार करण्याची गरज आहे. युनिकोडमध्येच असलेल्या काही फॉन्टसमध्ये प्रमाणीकरणाचा अभाव आहे. मराठी आकडे आणि इंग्रजी आकड्यांचाही थोडासा घोळ आहे. त्यामुळे खरोखरच युनिकोडमुळे आपल्याला अपेक्षित असलेले प्रमाणीकरण होणार आहे काय? त्यातील अडचणी आणि कच्चे दुवे काय याचाही विचार इथे केलेला आहे.
मराठी सॉफ्टवेअरमधील प्रमाणीकरणाचे मुद्दे लक्षात घेताना केवळ सॉफ्टवेअरपुरते थांबून चालणार नाही तर यात फॉन्ट, किबोर्ड आणि परिभाषा यांचेही तेवढेच मोठे महत्त्व आहे. स्पेलचेकर, शब्दसंग्रह, डिक्शनरी वगैरेसारख्या युटिलिटीजचाही प्रमाणीकरणाशी थेट संबंध येतो. त्यामुळे याही मुद्यांचा विचार केलाय.
संगणकीय परिभाषेतील मराठी शब्दांचा अभाव तसेच उपलब्ध शब्दांची क्लिष्टता लक्षात घेवून अनेक ठिकाणी प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर करणे भाग पडले आहे. या अडचणीवरुन परिभाषेच्या प्रमाणीकरणाची आणि प्रसाराची आत्यंतिक गरज लक्षात येईलच.
तेव्हा पुढच्या लेखापासून प्रत्यक्ष विषयालाच हात घालुया!
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply