अनिल बळवंत धुमाळ यांचा जन्म २९ मार्च १९१४ रोजी मुंबईत झाला .
त्यांच्या काळात हिंदीमध्ये भरपूर कामे करणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्यांपैकी एक धुमाळ हे अभिनेते होते. बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शकांना या कलाकाराने दखल घ्यायला लावण्यास भाग पाडले होते.
धुमाळ यांचे पूर्ण नाव अनिल बळवंत धुमाळ. धुमाळ यांचे वडील व्यवसायाने वकील होते, परंतु वयाच्या १० वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरची सर्व जबाबदारी अनिल यांच्यावरच येऊन पडली. त्यामुळे त्यांनी नाटक कंपनीत छोटी मोठी कामे मिळवली. इथे मिळेल ती कामे त्यांनी केली. यातूनच कधीकधी नाटकांतून छोट्या भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. यातून धुमाळ यांची प्र के अत्रे आणि नानासाहेब फाटक या नाट्य क्षेत्रातील दिग्गजांशी ओळख झाली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला खरी सुरुवात मिळाली.
पुढे मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीप्रमाणेच त्यांनी हिंदी चित्रपटांतून विनोदी भूमिका गाजवून आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटात धुमाळ यांनी मद्रासी संगीत शिक्षकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे ते चित्रपटसृष्टीत नावारूपाला आले. त्यावरून करदार यांनी हिंदीत ‘चाचा चौधरी’चित्रपट बनवला, तेव्हा धुमाळ यांना तीच भूमिका दिली.
४० ते ८० च्या दशकात त्यांनी आयत्या बिळावर नागोबा, खानदान, अंजाम, बेशरम, कश्मीर की कली, गुमनाम, आरजू, लव्ह इन टोकियो, देवता, हावडा ब्रिज सारखे अनेक मराठी हिंदी चित्रपट गाजवले. लग्नाची बेडी, घराबाहेर या मराठी नाटकांतून त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.
शुभा खोटे, मेहमूद यांच्यासोबत चित्रपटांतून त्यांची छान केमिस्ट्री जुळून आली होती. अनेक चित्रपटात धुमाळ यांनी शुभा खोटेंच्या वडीलांचा रोल केला होता. त्यावेळी त्यांचे कुटुंब चेंबूरला स्थायिक होते. मुंबई ते चेंबूर या प्रवास त्यावेळी खूप बिकट होता. घरी फोन नसल्याने अनेक निर्मात्यांना धुमाळ यांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून त्यांच्या घरी जावे लागत असे. या कारणामुळे बहुतेक चांगल्या भूमिकांपासून ते वंचित देखील राहिले. परंतु काम मिळावे म्हणून कोणापुढे हात पसरले नाही. त्यातील बहुतेक राज खोसला, बप्पी सोनी, प्रमोद चक्रवर्ती आणि मराठीतील कमलाकर तोरणे, वसंत जोगळेकर यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी कामे केली.
धुमाळ यांचे १४ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
Leave a Reply