२ मार्च १९७७ रोजी दक्षिण आफ्रिकेत अँड्र्यू जॉन स्ट्रॉसचा जन्म झाला. लाडनावे हे जर श्रीमंतीचे लक्षण असेल तर स्ट्रॉस खूपच श्रीमंत माणूस आहे असे म्हणावे लागेल. त्याची लाडनावे आहेत : स्ट्रॉसी, लिव्हाय, मेअरमन, मपिट इ.
१९९६ च्या उन्हाळ्यात स्ट्रॉस डरहॅम युनिवर्सिटी आणि मिडलसेक्सच्या दुय्यम संघाकडून खेळला. ३१ ऑगस्ट १९९८ रोजी स्ट्रॉसने (वयाच्या एकविसाव्या वर्षी) प्रथमश्रेणीत पदार्पण केले. हॅम्पशायरविरुद्धच्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात ८३ धावा काढल्या.
१११ ही संख्या इंग्लंडमध्ये अशुभ मानली जाते पण स्ट्रॉसचे पहिले प्रथमश्रेणी शतक नाबाद १११ धावांचे होते. तेही लॉर्ड्स मैदानावर ! सलामीवीर म्हणून खेळायला त्याने नुकताच प्रारंभ केलेला होता आणि नव्या भूमिकेसाठी तो संपूर्णतया योग्य असल्याचेही सिद्ध झाले होते.
अँगस फ्रेजरच्या अकस्मात निवृत्तीनंतर प्रवासी श्रीलंकेविरुद्ध मिडलसेक्सचे नेतृत्व स्ट्रॉसने केले (मे २००२). एप्रिल ते सप्टेंबर २००२ हा काळ स्ट्रॉसने एकूण ११३३ प्रथमश्रेणी धावा काढून गाजवला. २००३ च्या सप्टेंबरात स्ट्रॉसच्या नावावर १४०१ प्रथमश्रेणी धावा जमा झालेल्या होत्या आणि बांग्लादेशाच्या दौर्यावर जाणार्या इंग्लंडच्या एकदिवसीय चमूत त्याची निवड झाली.
२००४ मधील कॅरिबिअन दौर्यावर राखीव खेळाडू म्हणून कसोट्यांमध्ये त्याची निवड झाली आणि त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतके काढून स्ट्रॉसने आपले नाणे वाजवले.
२२ मे २००४ रोजी लॉर्ड्सवर सुरू झालेल्या कसोटीत स्ट्रॉसने पदार्पण केले. मायकल वॉगन तंदुरुस्त नसल्यामुळे केवळ दोन दिवस आधी स्ट्रॉसला बोलावणे आले होते. पहिल्याच डावात स्ट्रॉसने ११२ धावा काढल्या. पदार्पणाची कसोटी लॉर्ड्सवर आणि त्या कसोटीत शतक असा योग स्ट्रॉसच्या आधी केवळ तीन फलंदाजांच्या वाट्याला आला होता. त्याच वर्षी ६ जुलैला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना लॉर्ड्सवरच त्याने कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले.
त्यानंतर स्ट्रॉसच्या यशाचा आलेख सतत चढता राहिला. न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेत ४५.५० च्या सरासरीने २७३ धावा त्याने काढल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ४५.२८ च्या सरासरीने ३१७ धावा त्याने काढल्या आणि लॉर्ड्सवर आणखी एक शतक झळकावले. दक्षिण आफ्रिका दौर्यात त्याने पहिल्या आणि दुसर्या कसोटीत शतके फडकावली. पुन्हा चौथ्या कसोटीत त्याने शतक झळकावले आणि याच कसोटीत इंग्लंडने आपला मालिकाविजय निश्चित केला.
२००५ मध्ये इंग्लंडने तब्बल १८ वर्षांनंतर अॅशेसवर ताबा मिळवला. त्या संघाच्या यशात स्ट्रॉसचा मोठा वाटा होता. २००६ मध्ये अँड्र्यू फ्लिन्टॉफ आणि मायकल वॉगन तंदुरुस्त नसल्यामुळे संघाबाहेर गेल्यानंतर कप्तानी स्ट्रॉसकडे आली आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मालिकेत ५-० असा पराभव इंग्लंडला स्विकारावा लागला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धची मालिका अखेर ओवलवरील ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे गालबोटली गेली. नंतर इंग्लंडने अॅशेस गमावल्या आणि २००७ चा विश्वचषकही त्यांना (आणि स्ट्रॉसलाही) कोरडाच गेला.
२००७ च्या घरगुती हंगामातही जुना, धावांचा रतीब घालणारा स्ट्रॉस कुठे दिसला नाही. परिणामी कसोटीसंघातून त्याला वगळण्यात आले. अखेर मार्च २००८ मध्ये न्युझिलंडच्या दौर्यावर पहिल्या दोन कसोट्यांमध्ये अडखळल्यानंतर तिसर्या कसोटीत १७७ धावा काढून स्ट्रॉसने पुन्हा झेप घेतली….
जानेवारी २००९ मध्ये लॉर्ड्सवरील एका भरगच्च पत्रपरिषदेत अँड्र्यू स्ट्रॉस हा इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त झाल्याचा निर्णय घोषित करण्यात आला. वेस्ट इंडिज दौर्यावर पहिल्याच कसोटीत ५१ धावांमध्ये इंग्लंडचा संघ गार झाला. तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या सामन्यात स्ट्रॉसने देखणी आणि मोठी शतके काढली पण मालिकेत इंग्रजांचा पराभव झाला.
नंतर मायदेशी झालेल्या कसोटी-मालिकेत मात्र इंग्लंडची वेस्ट इंडिजविरुद्ध २-० अशी सरशी झाली.
मायदेशात झालेल्या अॅशेस मालिकेत ४७४ धावा काढत त्याच्या नेतृत्वाखालील संघाने अॅशेस पुन्हा मिळवल्या. स्ट्रॉसच्या कारकिर्दीतील हे सोनेरी दिवस मानावे लागतील. नंतर आफ्रिकेच्या दौर्यात त्याची बॅट फार तळपली नाही पण कसोटीमालिका बरोबरीत सोडवून आणि एकदिवसीय मालिका जिंकून कर्णधार म्हणून त्याने छान बस्तान बसवले.
डिसेंबर २०१०-जानेवारी २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात लोळवून इंग्लंडने अॅशेस स्वतःकडेच राखल्या. मायदेशात आणि ऑस्ट्रेलियातही अॅशेस जिंकणारा कप्तान अशी जबरदस्त ख्याती त्याने मिळवली.
भारतीयांना त्याच्या जोरकस खेळाचे जोरकस दर्शन कालपरवापर्यंत घडले नव्हते. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात त्याने तुफानी वेगाची खेळी करीत भारतीयांना हैराण केले आणि अखेर पराभव स्विकारला नाहीच.
२ मार्च २०११ हा त्याचा चौतिसावा वाढदिवस. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या हातून नेमक्या चौतीस धावा निघाल्या आणि शेजार्यांकडून बोचरा पराभव इंग्लंडला स्विकारावा लागला.
सातत्यासाठी आणि खंबीर नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा विद्यमान कर्णधार.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply