नवीन लेखन...

मार्च ०३ : दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील दुर्दैवाचा कहर आणि पाकिस्तानात श्रीलंकेच्या चमूवर हल्ला


<विश्वचषक १९९२ : सिडनी - पावसाबद्दलच्या नियमांमुळे एका चेंडूवर २३ धावा काढण्याचे हास्यास्पद आव्हान मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकातून बाहेर. विश्वचषक १९९९ : एजबॅस्टन - उपांत्य फेरीचा सामना अ‍ॅलन डोनल्डच्या घाईमुळे बरोबरीत सुटल्याने ऑस्ट्रेलियाला पुढे चाल आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषकाबाहेर.

नाणेकौल जिंकून फलंदाजी करणार्‍या श्रिलंकेच्या निर्धारित षटकांमध्ये ९ बाद २६८ धावा.

उष्णकटिबंधीय वादळ डर्बनला आपल्या कवेत घेऊ पाहत असल्याने सर्वांच्या नजरा डकवर्थ-लुइस नियमाकडे होत्या. पंचेचाळिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्क बाउचरने षटकार मारला. हवेला त्याने आवळलेल्या मुठीने काही गुद्दे घातले आणि अखेरचा चेंडू त्याने निवांत खेळून काढला, धाव न घेता. द. आफ्रिका ६ बाद २२९. मात्र….ड-लु नियमानुसार एवढ्याने सामना केवळ बरोबरीत सुटणार होता आणि बाउचरला आपल्या संघाने सामना जिंकला आहे असे वाटले होते ! चूक बाउचरची नव्हती…त्याला देण्यात आलेल्या माहितीनुसार ४५ षटकांनंतर खेळ थांबल्यास जिंकण्यासाठी २२९ धावा हव्या होत्या पण हा आकडा चुकीचा होता आणि निकी बोएला (बारावा खेळाडू) ही वस्तुस्थिती बाउचरपर्यंत पोहचविण्याची संधीच मिळालेली नव्हती ! एऽऽऽऽक तास कर्णधार शॉन पोलॉक विषण्ण मनस्थितीत खिडकीबाहेर पाहत बसून होता. अखेर पंचांनी आता उरलेला खेळ होणे शक्य नसल्याचे पाहून अंतिम निकालावर सह्या केल्या आणि दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले. एका आठवड्याच्या आत शॉन पोलॉकची कर्णधारपदावर हकालपट्टी झाली.

हा दिवसरात्रीचा सामना होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरणार नाही हे निश्चित झाल्यावर टीव्हीवर समालोचन करणारा आफ्रिकेचा माजी सलामीवीर म्हणाला होता : “सव्वाचार कोटी दक्षिण आफ्रिकी नागरिक आज आपण एक वाईट स्वप्न पाहिले असे समजून झोपी जातील…”

<२००९

लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर दहशतवाद्यांनी बसमधून प्रवास करणार्‍या श्रिलंकेच्या संघातील खेळाडूंवर गोळीबार केला. आधी बसच्या चाकांवर आणि मग थेट बसवर गोळीबार करण्यात आला. कप्तान जयवर्दने, उपकप्तान संगकारासह पाच जणांना किरकोळ जखमा झाल्या. सहा सुरक्षारक्षक आणि दोन नागरिक या हल्ल्यात जिवाला मुकले. लाहोरमधील नियोजित कसोटी सामना रद्द करण्यात आला आणि दौराही रद्द झाला. समरवीरा आणि परनविताना यांच्या जखमा काहीशा गंभीर स्वरुपाच्या असल्याने त्यांना तातडीने मायदेशी रवाना करण्यात आले.

क्रिकेटपटूंवर थेट हल्ला होण्याची इतिहासातील ही पहिली व आजवरची एकमेव घटना आहे. आश्चर्य म्हणजे असा हल्ला होणार असल्याची निश्चित गुप्तवार्ता उपलब्ध होती पण दरम्यानच्या काळात पंजाब प्रांतात सत्तापालट झाल्याने त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डेविड मॉर्गन यांनी “पाकिस्तान ही अतिशय धोकादायक जागा आहे” असे म्हटले आणि आगामी विश्वचषकाबद्दल छेडले असता “तिथे सामने खेळवले जायचे असतील तर परिस्थितीत नाट्यपूर्ण सुधारणा आवश्यक आहेत” असे म्हटले.

नेपिअरमध्ये हे वृत्त जावून धडकताच भारताच्या व न्युझिलंडच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधून खेळत या प्रकाराचा निषेध केला. भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिल्यानंतर श्रिलंकेने हा दौरा करण्याचे ठरविले होते.

या तारखेपासून आजतागायत पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही.

मैदानावरील फलंदाजाला चुकीचा संदेश मिळाल्याने विश्वचषकाबाहेर पडलेली दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेटपटूंवर थेट हल्ला झाल्याची इतिहासातील एकमेव घटना

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..