नवीन लेखन...

मारे गाम काथा पारे

१९७५ सालची गोष्ट आहे. हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत ‘अंकुर’ सारख्या कलात्मक चित्रपटाने सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले. शबाना आझमी, अनंत नाग, साधू मेहेर आणि आपली मराठी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिचा ‘अंकुर’ चित्रपट मी भानुविलास थिएटरमध्ये ‘मॅटिनी शो’ ला पाहिला. चित्रपट चाकोरीबाहेरचा होता. श्याम बेनेगल निर्मित व दिग्दर्शित हा पहिला चित्रपट. या चित्रपटापासूनच श्याम बेनेगल आणि संगीतकार वनराज भाटिया यांची जोडी जमली.

श्याम बेनेगल यांनी एकूण नऊ चित्रपट केले. या सर्व चित्रपटांना संगीतसाज चढवला होता वनराज भाटिया यांनी. ‘अंकुर’ नंतर ‘भूमिका’ हा चित्रपट हंसा वाडकरच्या ‘सांगते ऐका’ या आत्मचरित्रावर आधारित होता. त्यानंतर आलेला ‘मंथन’ हा चित्रपट गुजरातमधील घराघरांतून ‘अमूल’ दूध संकलन करणाऱ्या सहकारी सोसायटी या विषयावर होता. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी असे तगडे कलाकार या चित्रपटात होते. वनराज भाटिया यांचं लोकसंगीताच्या बाजाचं संगीत, अप्रतिम व अविस्मरणीय असंच आहे. या ‘मंथन’ मधील बॅकग्राऊंडला असलेलं ‘मारे गाम काथा पारे’ हे प्रीति सागरच्या आवाजातील गाणं संपूर्ण चित्रपटाचं सार आहे. या गाण्यात दिसणारी स्मिता ही अभिनेत्री न वाटता, गुजरातच्या खेड्यातील सर्वसामान्य कष्टकरी महिला वाटते. ‘अमूल’ कंपनीने त्यांच्या टीव्ही वरील जाहिरातीसाठी कित्येक वर्षे या गाण्याचा वापर केला. मला सर्वात जास्त आवडलेलं हे गाणं आहे.

१९८१ साली शशी कपूरने ‘कलयुग’ या चित्रपटाची निर्मिती केली. दिग्दर्शक अर्थात श्याम बेनेगलच होते. या चित्रपटात महाभारतातील पात्र व्यावसायिक स्पर्धा, सूड, लालसा, अहंकार यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली दाखवलेली आहेत. मल्टीस्टार असलेला हा चित्रपट फार गाजला. यातील सुप्रिया पाठक व अनंत नाग यांच्यावर चित्रीत झालेले ‘क्या है तेरा गम बता’ हे प्रीति सागरच्या आवाजातील गाणं अप्रतिम आहे. इथे वनराज भाटिया यांनी पाश्र्चात्य व भारतीय संगीताचं ‘फ्युजन’ केलेलं आहे.

श्याम बेनेगल यांची ‘भारत एक खोज’ ही दूरदर्शन मालिका फार गाजली. ‘तमस’ या मालिकेला देखील वनराज भाटिया यांनीच संगीत दिलं होतं. ‘वागळे की दुनिया’, ‘बनेगी अपनी बात’ अशा कितीतरी मालिकांची शीर्षकगीतं त्यांनी तयार केली होती.

वनराज भाटिया यांच्या ९३ वर्षांच्या आयुष्यात काय काय घडलं? याचा एक आढावा. १९२७ साली मुंबईत वनराज भाटिया यांचा जन्म झाला. लंडन येथील ‘राॅयल अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक’ आणि पॅरिस येथील संगीत विद्यालयात संगीताचे धडे गिरविल्यानंतर ते भारतात परतले. इथे त्यांनी जाहिरातींना संगीत देणे सुरु केले. सात हजार जाहिरातींसाठी जिंगल्स केली. अनेक कलात्मक व व्यावसायिक चित्रपटांना संगीत दिले.‌ ‘अजूबा’, ‘दामिनी’, ‘बेटा’, ‘चमत्कार’, ‘परदेस’ सारख्या अनेक व्यावसायिक चित्रपटांना पार्श्र्वसंगीत दिले. दूरदर्शनवरील ‘खानदान’, ‘कथासागर’, ‘यात्रा’ अशा गाजलेल्या अनेक मालिकांना संगीत दिले.

त्यांना संगीत क्षेत्रातील या योगदानाबद्दल भारत सरकारने २०१२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ‘तमस’ या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. २००० सालापर्यंत सारं काही ठीक चाललं होतं. मिळालेला पैसा त्यांनी शेअर बाजारात गुंतवला होता. २००० पासून शेअर मार्केट कोसळल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली.

वनराज भाटिया यांनी लग्न केले नव्हते. ते एकटेच रहात होते. गेले वीस वर्ष त्यांनी कशीबशी काढली. त्यांची सोबत करणारा एक केअरटेकर होता. गेले दोन वर्ष ते गुडघ्याच्या त्रासामुळे उभे देखील राहू शकत नव्हते. जावेद अख्तर यांनी मध्यंतरी त्यांना आर्थिक मदत केली होती. शेवटी घरातील वस्तू विकून पोट भरण्याची त्यांच्यावर वेळ आली.

काल त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. या मायानगरीत सर्वजण कामापुरते जवळ असतात. अडचणीला सहसा कोणीही जवळ येत नाही.

आज जरी वनराज भाटिया या जगात नसले, तरीदेखील त्यांनी चित्रपट, मालिका, जाहिरातींना दिलेलं संगीत नक्कीच ‘अजरामर’ राहिल.

संगीतकार वनराज भाटिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

८-५-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..