नवीन लेखन...

मरीआईची कहाणी (स्वच्छता संदेश देणारी गोष्ट )

ऐका देवी, मरीआई तुमची कहाणी.

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही, रोग नाही, राई नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आषाढचा महिना आला. झिम झिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गाई गुरांना चारा झाला. दूध दुभत्याची चंगळ झाली. शेतातली कामे संपली. मुली माहेरी आल्या. आई-बापांना आनंद झाला. माझी नव्या नवसाची, भरल्या चुड्याची बाबी आली. तिला कोठे ठेवू असे झाले. रोज नवी नवी पक्वान्ने होऊ लागली.नगरात आनंदी आनंद होता. खाण्या-पिण्यास ताळतंत्र राहिले नाही. इकडे काय झाले, मरी आई देवीने हे सारे पाहिले. तिने मनात विचार केला, राजाच्या राज्यात जावे. लगाबगा उठली. तिने कुंकवाचा मळवट भरला. केस मोकळे सोडले; आणि अनवाणी चालत निघाली. नगराच्या वेशीपाशी आली आणि तिने आत डोकावून पाहिले. तिला मोठा आनंद झाला. नगरात ती शिरली. मरीआई रस्तोरस्ती फिरू लागली. प्रत्येक घरांत डोकावून पाही. घाण दिसली की शिरली तिथे. लोक पटापट मरू लागले. मोठा कहर गुदरला. रोज पाच-पन्नास माणसे मरू लागली. वार्ता राजाच्या कानी गेली. राजाला फार वाईट वाटले. माझी प्रजा कोण मारते? मी कोणाचे वाईट केले नाही. देवाच्या सेवेत अंतर केले नाही. गोरगरिबांना नाडले नाही. कर वाटेल तसे घेतले नाही. मग देवाचा माझ्या राज्यावर कोप का? राजा दु:खी झाला. त्याला खाणे पिणे रुचेना. सुखविलास सुचेना. तो देवाला शरण गेला व म्हणाला, “देवा नारायणा, चुकले माकले क्षमा कर; माझी प्रजा सुखी कर.” राजाच्या स्वप्नात देव येऊन म्हणाला. “राजा, राजा, उठ अरे. निजतोस काय? तुझ्या नगरात मरीआईचा फेरा आला आहे ना?’ तिला नगराच्या बाहेर घालव. ती उद्या तुझ्या राजवाड्याकडे येणार आहे.”

राजा उठला. मरीआईसाठी त्याने तयारी केली. सर्व राजवाडा झाडून झुडून स्वच्छ केला होता. रांगोळ्या घातल्या होत्या. धूप-दीप लावले होते. चंदनाचे सडे घातले होते. घाणीचे कोठे नाव नव्हते. राजा मरीआईची वाट पहात बसला.

मरीआई त्या दिवशी लवकर उठली. राजवाड्याकडे जाऊ लागली. परंतु राजवाड्यात स्वच्छता पाहून दु:खी झाली. राजाने विचारले, “आई, आपण दु:खी कष्टी का? सेवेत काय कमी आहे?” मरीआई म्हणाली, “ काय सांगू राजा, मला तुझ्या राज्यात फारसे खायला मिळाले नाही.” राजा म्हणाला, “आई, इतकी प्रजा बळी पडली, तरी तू सुखी नाहीस?”

मरीआई म्हणाली, “ राजा, माझी भूक तुला माहीत नाही. मी जाते तेथे गावाची म्हसणवटी करते. तुझ्या नगरात मला पोटभर खायला मिळाले नाही.मी उपाशी आहे.” राजाने विचारले, “आई, माझे राज्य तुला आवडले का?

“नाहीरे, तितकेसे काही आवडले नाही. तुझे लोक फार स्वच्छतेने राहतात.

घर स्वच्छ दिसले की, माझे कपाळ उठते.” राजा बोलला, “मग मरीआई, माझी इतकी माणसे कशी मेली?” मरीआई म्हणाली, “ राजा थोडी घरे माझ्या आवडीची सापडली, त्या घरांत मी गेल्ये. दारातच उकिरडे होते, तेथे घाणीची रास साचलेली. माशांचे घोंघावणे चाललेच होते. राजा, ह्या जागा मला फार आवडल्या. काही लोकांनी खाण्यांत धरबंद ठेवला नव्हता. वाटेल तेव्हा, वाटेल तितके, हवे तसे खात होते. त्यांच्यावर मी कृपा केली, त्यांना मी नेले.” राजाने मनात विचार केला, मरीआईला स्वच्छता का आवडत नाही? ठीक आहे. राजाने नगरात दवंडी पिटवली. ‘घरे दारे स्वच्छ ठेवा. दारात उकिरडे करू नका. शिळे पाके खाऊ नका. माशा अन्नावर बसू देऊ नका. पाणी गाळून, तापवून प्या. जेवताना लिंबाचा सडळ हाताने उपयोग करा.”

दवंडी लोकांनी ऐकली व लोक तसे करू लागले. मरीआई संतापली. रागाने खवळली; जशी नागीण! ती राजाकडे गेली व म्हणाली, “राजा मोठा रे कपटी आहेस तू. मला भूकेने मारतोस! मी तुझ्यावर कोपले आहे. तुझ्या राज्यात फिरून म्हणून येणार नाही.’ राजाला आनंद झाला. लोक सुखी झाले. तुम्ही आम्ही पण सुखी होऊ या.

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !

[“बालसुधा’, पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ५७-५९]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..