नवीन लेखन...

कोकणातील सागरी मासेमारी

महाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे  आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कणामध्ये मासेमारी करण्यासाठी उपलब्ध असलेली साधनसंपत्ती आणि त्यामधून मिळणारे उत्पन्न.

कोकणातील मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या सहा जिल्ह्यात एकूण 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून उत्तरेकडील झाई ते दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत या किनाऱ्याचा समावेश आहे. निसर्गाच्या कृपेने लाभलेल्या किनारपट्टीचा उपयोग येथील भूमिपुत्रांनी मत्स्योद्योगाच्या रूपात रोजगाराचे साधन म्हणून केला आहे. अनेक शतकांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली कोकणातील मासेमारी बदलत्या काळानुसार मासेमारीच्या साधनसामग्रीत सुधारणा करून आज यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून प्रगती साधत आहे, ज्यावर येथील मच्छीमार उदरनिर्वाह करत आहेत.

समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणे हे खूप कठीण आणि अवघड काम आहे. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या  आकडेवारीनुसार ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये 98, मुंबईमध्ये 36, रायगडमध्ये 195, रत्नागिरीमध्ये 110 आणि सिंधुदुर्गमध्ये 87 अशी एकूण 526 मत्स्यमारीची गावे आहेत. ठाणे/पालघर जिल्ह्यात मच्छीमार लोकसंख्या 114899 इतकी आहे, तर मुंबई जिल्ह्यात 32516, रायगडमध्ये 113847, रत्नागिरी जिल्ह्यात 71620 आणि सिंधुदुर्गातील 32017 मच्छीमार लोकसंख्या आढळून येते. तसेच कोकणातील सागरी जिल्ह्यांमध्ये मासेमारी बंदर, मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिकी आणि अयांत्रिकी नौका, मासेमारी करणाऱ्या कुटुंबांचा आणि लोकसंख्येचा विचार केला तर यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये 29 बंदरे, मुंबईमध्ये 19, रायगड 45, रत्नागिरीमध्ये 46, तर सिंधुदुर्गमध्ये 34 बंदरे आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये 2350, मुंबईमध्ये  4297, रायगडमध्ये 2418, रत्नागिरीमध्ये 2267, तर सिंधुदुर्गमध्ये 1618 अशा एकूण 12946 यांत्रिकी नौका आहेत. तर ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये 14, मुंबई 150,  रायगड 580, रत्नागिरी 771, तर सिंधुदुर्ग 6667 अशा एकूण  2272 अयांत्रिकी  नौका आहेत. ठाणे व पालघरमध्ये 27894, मुंबई  8147, रायगड 24676, रत्नागिरी 16696 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7304 मच्छीमार कुटुंब आहेत.

कोकणातील सर्व सागरी जिल्ह्यामधून सन 2020-21 मध्ये 398511 दशलक्ष  टन सागरी मत्स्य उत्पादन झाले आहे. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्याचे 67547 दशलक्ष टन, मुंबई 210260 दशलक्ष टन, रायगड 38019 दशलक्ष टन, रत्नागिरी 65374 दशलक्ष टन व सिंधुदुर्ग 17311 दशलक्ष टन सागरी मत्स्योपादन झाले आहे.

कोकणात मिळणारे प्रमुख सागरी मासे

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या आकडेवारीनुसार कोकणातील समुद्रामध्ये सुमारे 49 व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या माशांच्या आणि इतर प्रजाती आढळतात. यामध्ये प्रामुख्याने सार्डिन, नॉन पेनाईड प्रॉन्स (कोळंबी), बोंबील, पेनाइड प्रॉन्स, प्रॉम्फ्रेट (पापलेट), सीअर फीश, ब्लॅक प्राम्फ्रेट (सारंगा), ईल्स, लॉबस्टर आणि मॅकरल (बांगडा) इत्यादी तसेच खेकडे आणि माकुळ यांचाही प्रामुख्याने समावेश असतो.

प्रमुख मासेमारीमध्ये बोंबीलाचे सरासरी वार्षिक उत्पादन 31 हजार 500 टन एवढे आहे. ही मासेमारी सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. यानंतरही बोंबील मासेमारी केली जाते. सुके बोंबील मत्स्य खवय्यांचा आवडीचा मासा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश लोकांपर्यंत याची विक्री होते. सारंगा जातीच्या माशामध्ये काटे कमी असल्याने खवय्यांमधून याची मागणी जास्त असते. याची किंमतही जास्त असते. मालवणचा बांगडा म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या बांगडा माशाला अत्यंत लोकप्रियता आहे. मालवण, वेंगुर्ला किनारपट्टीवर हा मासा जास्त प्रमाणात आढळतो. रापण पद्धतीने या माशाची मासेमारी केली जाते. दाढ, घोळ हे मासे खोल समुद्रात सापडतात. या माशांचे आकारमान मोठे असल्याने मत्स्य उत्पादनात त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच सुरमई, मुशी, ढोम, वाम, रावस, हलवा, सफेद कोळंबी, जवळा, शेवंड अशा विविध प्रकारच्या मासळी कोकणी किनारपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असतात.

मासेमारी साधने व पद्धती

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात सुमारे 72 मीटर खोलीपर्यंत यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते. समुद्र किनाऱ्यापासून 2 किमी अंतरापासून लहान लोड्या, मचवे याच्या माध्यमातून बोई, बोंबील, लहान शिंगाळी, काटी, शेवंड, कोळंबी, लहान मुशी या प्रकारची मासेमारी केली जाते. किनाऱ्यापासून 22 सागरी मैलावर डोल, दालदा व ट्रॉलर या माध्यमातून विविध पद्धतीच्या मच्छीमारी जाळ्यांचा वापर करून सरंगा, रावस, घोळ, दाढा, कोता, वाम, शिंगाब, बांगडा, मुशी अशा मोठ्या जातीच्या माशांची केली जात असल्याने मासेमारी क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला आहे.

कोकणातील सागरी मासेमारी

आंतरराष्ट्रीय सागरी सीमा नियमाप्रमाणे किनाऱ्यापासून 200 मैलापर्यंतचे क्षेत्र संपूर्ण आर्थिक क्षेत्र म्हणून मानले जाते. तसेच किनाऱ्यापासून 12 सागरी मैल या क्षेत्रांवर केंद्राने राज्यांना मत्स्यमारीसाठी कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. समुद्राच्या पाण्यात 100 फॅदम खोलीपर्यंतच्या भागात जिवंत प्लवंग वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. हे प्लवंग, माशांचे आवडते खाद्य असल्यामुळे मासेमारीसाठी हा भाग खूपच महत्त्वाचा ठरतो.

खोल समुद्रातील मासेमारी, उथळ पाण्यातील मासेमारी आणि खाडीतील मासेमारी अशा तीन पद्धतीने मासेमारी चालते. कोकणातील खाड्यांमध्ये बोई, ताऊस, काळुंद्रा इत्यादी प्रकारचे चविष्ट मासे सापडतात. यांचे संवर्धन मात्र पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. यांच्या संवर्धनात विशेष लक्ष दिल्यास माशांचे उत्पादन चांगल्या रीतीने वाढू शकते.

मात्र समुद्रातील मत्स्यसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनही कमी होत आहे. यासाठी आपणाला निमखाऱ्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील माशांचे योग्य संवर्धन करणे गरजेचे आहे. असे केल्याने राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल.

कोळंबी संवर्धनाबरोबरच कालवे, काकई यांचे संवर्धन कोकणात समुद्रात देखील करता येणे शक्य आहे. अशा संवर्धनासाठी  सहकारी संस्था तसेच स्थानिक नागरिकांना प्रोत्साहित करणे लाभदायक ठरेल. सागरी पिंजरा संवर्धनामध्ये विकास घडवून आणण्यासाठी बीजोत्पादन केंद्रे, सहकारी संस्था, शैक्षणिक-संशोधन संस्था, बँका, महामंडळे, सरकारी उपलब्ध सागरी क्षेत्राचा विचार करता, असे संवर्धन लोकप्रिय करणे काळाची गरज आहे.

 

मत्स्य सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका

मच्छिमारांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कोकण प्रांतातील सागरी किनारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध कार्यकारी मच्छिमारी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांमार्फत मत्स्य खरेदी, विक्री, डिझेल विक्री, मच्छिमारांच्या नौकांसाठी लागणारे साहित्य माफक दरात पुरविले जाते. मत्स्य उत्पादन घटक असल्याने कार्यरत संस्थाही घसरत आहेत. परंतु बदलत्या काळात मत्स्य उत्पादनात वाढ होण्याकरिता या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. कुलाबा येथील ससून व माझगाव बंदरातून मासेमारीची विक्री केली जाते. मुंबईमधील एक्स्पोर्ट कंपन्यामध्ये अत्याधुनिक शीतगृहे असल्याने शीतगृहे असल्याने हजारो टन मासळी साठवून ठेवण्याची क्षमता त्यांच्याजवळ असते. या कंपन्या येथील बंदरातून उच्च प्रतीचे मासे मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन, सागरी इंजीन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदुर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. जिथे प्रशिक्षण कालावधी सहा महिने असून प्रशिक्षण सत्रांमध्ये 2 (1 जानेवारी ते 30 जून) व (1 जुलै ते 31 डिसेंबर) 22 प्रशिक्षणार्थी शिकू शकतात.

मच्छिमारांवरील संकट

मात्र सरकारने मासेमारीसंदर्भात लागू केलेले नियम पाळले जात नाहीत. 1 जून, 15 ऑगस्ट हा कालावधी मत्स्य प्रजननाचा असल्याने या कालावधीत शासनाने मच्छिमारीवर बंदी घातलेली असते. असे असतानाही या काळात मासेमारी केली जाते. त्यामुळे मत्स्य उत्पादन घटत आहे.

प्रा. डॉ. बाळासाहेब चव्हाण

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..