नवीन लेखन...

मार्लेश्वरची यात्रा

सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.

त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.

शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.

मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..