नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. रेल्वे खचाखच भरलेली. पंजाबमधील शेतकरी जास्त प्रमाणात आलेले. घोषणांनी परिसर दणाणलेला. अधिवेशनाची चर्चा. नागपूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो, तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले. भूक लागलेली. हॉटेल बंद झालेले. सोबत आणलेल्या दशम्या संपलेल्या. इकडे तिकडे शोध घेतला. नवीन जागा. पर्याय काहीच नाही. त्याचवेळी जवळूनच केळी विक्रेता गाडा घेऊन निघालेला. डोक्यावर पिवळा दिवा. पिवळ्या प्रकाशात केळी पिवळीधमक दिसली. बरी वाटली. गाडीवळ गेलो. दोन डझन घेतली. पैसे दिले. केळीवाला निघून गेला. आम्ही पिवळ्या उजेडात ती खाणार होतो. सगळी केळी कच्ची निघाली. तशीच सोलली. दोन- तीन केळी खाल्ली. पोटासाठी कशीबशी. मध्यरात्र उलटली. पोट दुखायला लागले. काही केल्या थांबेना. दवाखाना कुठेच दिसेना. रात्रभर फिरत होतो. ओरडत, कण्हत रात्र काढली. मरणाच्या दारातून परत येण्याचा क्षण तो. अधिवेशन पार पडले. घोषणा दिल्या. परत आलो. पण पोटाच्या वेदनांची आठवण घेऊन. आता कुठेही केळीचा गाडा दिसला की केळी घेतो. पिकलेली आहे काय ते पाहूनच. खात्री करूनच.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995
(पुण्यनगरी)
Leave a Reply