लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ?
मला तर वाटत फक्त डेटींगचा आनंद उपभोगलेला असतो. सध्या बहुसंख्य तरुण- तरुणी आपला जोडीदार स्वतः शोधण्यासाठी, मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना हवा तसा जोडीदार जवळ्पास सहज नाही सापडला की ही लोक या लग्न जुळविणार्या मंडळांची, संस्थांची अथवा वेबसाईटची मदत घेतात. पालकही आपला वेळ आणि इगो सांभाळण्यासाठी व आपल्या नातेवाईकंची मदत घेण्यापेक्षा हे सोयीचे आहे म्ह्णून लग्न जुळविणार्या या माध्यमांची मदत घेतात. या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी लग्नासाठी इच्छुक तरुण- तरुणींची भेट घडवून आणली जाते ज्यामुळे विषमलिंगी व्यक्तीच्या सहवासासाठी आसुसलेली ही लोक या माध्यमातून तो सहवास मिळवून आनांदी होतात, मग तो सहवास आणखी व्यक्तींकडून मिळविण्याची हुक्की त्यांच्या मनात निर्माण होते. त्यामुळेच या अशा लोकांची लग्न जुळवणे या माध्यमांना वर्षानुवर्षे शक्य होत नाही. पण त्यातही त्यांचे नुकसान होत नाही उलट फायदाच होतो त्यामुळे ते ही या गोष्टीकडे सोयिस्करपणे कानाडोळा करतात.
लग्न जुळविणार्या माध्यमातून तरूण- तरुणी चर्चेसाठी भेटतात तेंव्हा त्यांच्यात चर्चा होतात, गप्पा- गोष्टी होतात तेव्हा आजची ओपन माईंडेड असलेली पिढी समोरच्यासमोर कोणताही आडपडदा न ठेवता आपलं हृद्य अगदी खोलून ठेवते. त्यांच्या या मोकळेपणाचा फायदा घेणारेही कमी नसतात. त्यामुळे लग्नासाठीची बोलणी राहतात बाजूला आणि एक वेगळ्याप्रकारचे नातेसंबंध निर्माण व्हायला सुरूवात होते. हे नातेसंबंध नैतिकतेच्या सिमा ओलांडण्यापलिकडेही जाऊ शकतात. एकमेकांना समजून घेण्याच्या नावाखाली सहा-सहा महिने मोबाईल, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कींग साईट्सच्या माध्यमातून चॅटींग करत राहतात अगदी मोकळेपणाने खुलेआम. सहा-महिन्याच्या चॅटींग – डेटींग नंतर पत्रिका जुळत नाही, विचार जुळत नाही अथवा लाईफ स्टाईल जुळत नाही अशी फालतू कारणे देऊन हा कार्याक्रम आटोपता घेतला जातो. पालकांना वाटत राहत आपल्या मुलांची लग्ने जुळत नाही पण मुळात त्यांच्या त्या मुलांना लग्न जुळविण्यात फारसा रस नसतो त्यांना रस असतो त्या माध्यमातून मिळणार्या डेटींगचा आनंद घेण्यात.
सर्वच लग्न जुळविणारी मंडळे, संस्था, वेबसाईट्स लग्न जुळविण्याचा फक्त व्यावसाय करतात असं नाही म्ह्णता येणार पण काय असतं सुक्या बरोबर कधी- कधी ओलं ही जळत. लग्न जुळण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला आपल्या बद्दल किती माहिती द्यावी याचाही विचार व्हायला हवा. लग्न जुळविणार्या माध्यमांचाही ते ज्यांची लग्ने जुळवत आहेत त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष असायला हवे कारण मनापासून लग्न करण्यास इच्छुक असणार्या तरूण- तरूणींच्या मनावर या विनाकारण मिळालेल्या नकाराचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लग्न जुळविण्यासाठी किती भेटींची गरज आहे हे अगोदरच निश्चित करायला हवे. फालतू कारणे देऊन जर कोणी लग्नासाठी नकार देत असेल तर अशांना बाजुला सारायला हवे.
लग्न जुळविणारी मंडळे, संस्था, वेबसाईट्स, लोकांना सहाय्यकच होत आहेत. पण त्यांना ही सामाजिक भान असायला हवे बदलत्या परिस्थितीचा आणि मानसिकतेचा विचार करता सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी काही ठोस पावले उचलायला हवीत. नाहीतर काही दिवसांनी त्यांनाच प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही की आपली ही लग्न जुळविणारी माध्यमे डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?
— निलेश बामणे,
202 / बी, जलधारा एस.आर.ए.गृहनिर्माण संस्था मर्यादीत, ओमकार डेव्हलपर्स, गणेश मंदीर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375
Leave a Reply