कोणतीही मालगाडी नीटपणे न्याहाळली तर असं लक्षात येतं, की तिला भारतातील वेगवेगळ्या विभागांचे डबे जोडलेले असतात. नॉर्थन रेल (एन.आर.), वेस्टर्न रेल (डब्ल्यू.आर.), वगैरे. असे डबे काही महत्त्वाच्या जागी एकमेकांना जोडले जाऊन त्यांची ६० ते ७० डब्यांची मालगाडी तयार होते. ज्या जागी अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागांतून येतात त्या जागांना ‘मार्शलींग यार्ड’ म्हणतात. यांमध्ये मुख्यत: दोन प्रकार आहेत:
१. फ्लॅट: ज्या जागी साधारण प्रत्येक दिवशी ५०० डबे जोडले जातात.
२. हम्प: या जागी ५००० डबे प्रत्येक दिवशी जोडले जातात.
या मार्शलींग यार्डांमध्ये उंच मार्गावरून डबे त्यांच्या मूळ वजनांमुळे खाली आणले जातात. त्यामुळे अर्थातच ते हलवण्याकरता होणाऱ्या खर्चात बचत होते. परंतु अशा ठिकाणी जागा भरपूर मोठी असावी लागते.
एके काळी मुगलसराई (वाराणसीपासून १९ कि.मी. अंतरावरील स्टेशन) हे आशियातील सर्वांत मोठं मार्शलींग यार्ड होतं. आता टर्मिनल यार्डस् जास्त प्रमाणात आहेत, जिथे एका स्थळाहून दुसऱ्या ठरलेल्या स्थळाकडे मालगाड्या जातात. उदाहरणार्थ, वाडीबंदर (मुंबई) पासून ते थेट शालीमार (कलकत्ता) येथपर्यंत मालगाड्या जाऊन पोहोचतात. यामुळे सर्व माल लवकर पोहोचण्यास मदत होते.
मालगाड्यांचं प्रवासी गाड्यांसारखं पक्कं छापील टाईम टेबल नसतं, परंतु त्यांना वेगळा क्रमांक व नावं असतात. त्यावरून त्या ओळखल्या जातात. कोणत्याही मधल्या स्टेशनावर थांबा नसल्यानं त्या चांगल्या वेगात जातात. रेल्वेचं उत्पन्न या माल पोहोचविण्यावर जास्त प्रमाणात अवलंबून असल्यानं या गाड्यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. रशियामध्ये मालगाड्यांचं महत्त्व मेल एक्सप्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply