लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
“मराठी असे आमुची मायबोली “
म्हणजे मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मग हा दिवस साजरा करण्यामागचे प्रयोजन काय? हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असेल नाही का? मराठी कवी “विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज “यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषागौरव दिन म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.
जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला .आणि या मायबोलीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही समस्त मराठी जनांची मागणी आहे. या मराठी भाषेत अनेक संत कवी होऊन गेले प्रत्येकाने या भाषेला समृद्ध केले. यात प्रकर्षाने “संत ज्ञानेश्वरांचा” उल्लेख करावासा वाटतो. “इये म~हाटिचीया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी”.
अशा शब्दातून ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख करत तिला ब्रह्मविद्या म्हंटले आहे. आणि याची यथार्थता खरोखरच पटते.
मग हा मराठी भाषागौरव दिन म्हणजे ज्या माय मराठी ने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचे मोठे केले .या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यात निर्माण केली. आपल्याला आपल्या भाषेतव्यक्त होण्यासाठी जिने ममतारूपी शब्दांची पखरण केली .मग तिच्या प्रती सन्मानाचा दिन म्हणजे ” मराठी भाषागौरव दिन “म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपल्या भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी “मराठी भाषा” एक आहे महाराष्ट्र ,गोवा राज्याची ही अधिकृत राजभाषा आहे.
या भाषेची निर्मिती ही संस्कृत पासून झालेल्या महाराष्ट्र प्राकृत् अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. या मराठीत अनेक साहित्यिकांची मांदियाळी आहे. मराठीतील आद्यग्रंथ म्हणून” ज्ञानेश्वरीचा” उल्लेख करतात .
मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. मातृभाषेबद्दलचा सार्थ अभिमान व्यक्त करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. “माझ्या मराठीची बोली कौतुकी परी अमृता तेही पैजेसी जिंके”.
साहित्यिकांनी या मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. असे असूनही आज आपण आपल्या भाषेचा अभिमान फक्त एकाच दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो कायम राखायला हवा. आज आपल्या समाजात बघितले असता इंग्रजीच्या अट्टाहासापायी पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.
काय तर म्हणे उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही. खरंतर” मातृभाषा “ही शिक्षणाचे माध्यम असावे. कारण लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते. “मातृभाषा हीच ज्ञानभाषा” झाली तर शिक्षण नक्कीच सुलभ होईल. याचा अर्थ असा नाही की परकीय भाषा शिकू नये. पण ही भाषा शिकताना आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये इतकेच सांगणे.
नवीन शैक्षणिक धोरणात देखील मातृभाषेला स्थान आहे. आणि आता वैद्यकीय अभ्यासक्रम देखील मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा ही सहज सोपी ,रसाळ भाषा आहे आणि म्हणूनच आपण केवळ २७ फेब्रुवारी पुरते या दिवसाचे महत्त्व न ठेवता आपल्या मनात, अंतरंगात कायमच ठेवली तर रो ज राज्यभाषा दिन साजरा होईल या शंकाच नाही.
सौ. प्रिया नितीन उपासनी
Leave a Reply