आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याची महती पटू लागली आहे. चेहऱ्यावरची मुरुम त्वचेवरची बंद छिद्र यावर त्याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. याबद्दल काही खास टिप्स.
दालचिनी : दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारत दालचिनीचा चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांवर चांगला उपयोग होऊं शकतो. याची पेस्ट तयार करून ती पुटकुळ्यांवर लावता येते.
हळद : हळदीमध्ये प्रतिजैविकं आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग उत्तम अँटी एजिंग घटक म्हणूनही होऊ शकतो. त्वचेवर लावण्यासाठीच्या अनेक मलमांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केलेला असतो. यामुळे त्वचा उजळतेही. जर फेसपॅकमध्ये हळद आणि मधाचा वापर केला तर त्वचेला एक निराळीच झळाळी मिळते.
धने : चवीला छान असणारे धने हा अतिशय थंड पदार्थ आहे. रात्रभर धने पाण्यात भिजवून ठेऊन ते पाणी तुम्ही सकाळी डोळ्यांत ड्रॉप्स म्हणून टाकू शकता. या उपायामुळे डोळे स्वच्छ होतील शिवाय डोळ्यांना थंडावाही मिळेल. यामुळे डोळ्यांना छान चमक येईल.
काळी मिरी : काळ्या मिरीची पूड करून ती पुटकुळ्यांच्या किंवा मुरुमांच्या जागी लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. थोड्याशा दह्यात काळी मिरी पूड घालून ते मिश्रण लावल्यास मुरुमांवर त्याचा चांगला वापर होऊ शकतो.
आले : कायाकल्पामध्ये आल्याचा उपयोगी मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो. आल्याची पेस्ट थोडा वेळ त्वचेवर लावल्यास त्वचेचा पोत छान होतो. तसंच त्वचेवरील डागांवरही याचा चांगला उपयोग होतो.
लाल मसूर डाळ : जरी हा मसाल्याचा पदार्थ नसला तरीही ते एक उत्तम सौंदर्यप्रसाधन होऊ शकतं. यामध्ये अँटी टॅनिग गुणधर्म असतात. त्यामुळे या डाळीचा उपयोग फेसपॅकमध्ये करता येतो. बॉडी स्क्रब म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. या डाळीची पूड, चंदन आशि हळद याचा लेप लावल्यास त्वचा छान राहते.
या मसाल्यांचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
चेहऱ्यावर कोणतीही पेस्ट लावताना ती योग्य प्रमाणात घ्या. तसंच ती डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्या.
काही मसाले केसांसाठी योग्य नसतात. त्यामुळे ही सौंदर्यप्रसाधनं केसांवर जाणार नाहीत, याचीही खात्री करा.
सौंदर्य प्रसाधन बाजारातील असो वा घरगुती आधी ते कोपराच्या आतल्या बाजूस थोडंसं लावून पाहा. त्याचा त्रास झाला नाही तर ते वापरायला हरकत नाही.
स्वयंपाकघरात तर मसाले जेवणात लज्जत आणतातच. पण हेच मसाले आपलं सौंदर्यही वाढवू शकतात…..
Leave a Reply