नवीन लेखन...

मशागत मनाची


आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झालाय, की त्याला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तर दूरच राहिलं. सध्या तो ज्या प्रकारच्या आयुष्यातून प्रवास करतोय किंवा ज्या प्रकारचं आयुष्य जगतोय, ते त्याला मान्य नसलं तरी ते जगण्याला तो बांधील आहे.

आपण अनेकदा वर्तमानपत्रातून वाचलेलं आहे की, ‘कुणी पोलिसाने स्वतःला गोळी मारून किंवा गळफास लावून आत्महत्या केली. कारण कामाचा प्रचंड ताण हे असावे.’ म्हणजे, हा ताण किती वाढत चाललाय पहा, की माणूस मानसिक निराशेमुळे मृत्यू जवळ करतोय . हा झाला ताणाचा एक प्रकार. तर दुसरा मोठमोठ्या कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना दिलेली कामाची लक्ष्य – (target ) पूर्ण करण्याचा ताण.

अर्थात काम कोणतंही असो, त्या कामाचा आनंद घेत ते पूर्णत्वाला नेणं महत्वाचं. आता कामाचा आनंद घेत एका ठराविक काळापर्यंत आपण ते करू शकतो. शरीर आणि मन कधीतरी थकणारच. मग शरीर थकल्यावर आपण काय करतो? आराम करतो, विश्रांती घेतो काही वेळ शांत पडून रहातो किंवा निवांत झोप घेतो. थोडा वेळ का होईना, ती व्यवस्थित आणि निवांत मिळाली की आपण ताजे तवाने होऊन पुन्हा कामाला लागू शकतो. हे झालं शरीराच्या बाबतीत.

आता मन थकल्यावर आपण काय करतो? अगदी नेमकं सांगायचं तर काहीच करत नाही. मन थकतं म्हणजे तरी काय? तर जे काम आपण करत असतो ते व्यवस्थित होत नाही, काहीतरी गडबड, चिडचिड होऊ लागते, काहीच सुचत नाही, कामात आपण एकरूप होऊ शकत नाही. या सगळ्या मन थकल्याचा जाणीवा आहेत. खरं म्हणजे या जाणीवा होऊ लागल्यावर आपण अनिवार्यपणे काही वेळ त्या कामातून पूर्णपणे बाहेर येऊन मनाला दुसरा काही विरंगुळा किंवा मनाला दुसऱ्या एखाद्या आपल्या आवडीच्या विषयात गुंतवलं पाहिजे. आवडीची गोष्ट मिळाल्यामुळे मन प्रफुल्लित होतं, त्यावरचा ताण हलका होतो आणि ते पुन्हा नव्या जोमाने कामात रस घेऊ लागतं. यासाठी आपण दिवसभरातला काही वेळ (शक्यतो पहाटेचा ) मोकळ्या जागी डोळे मिटून मनातले सगळे विचार दूर सारून शांत बसावं. आपण मनाने आपल्याला आनंद मिळणाऱ्या गोष्टीत स्वच्छंदपणे फिरून येऊ शकतो. निसर्गसानिध्यात (शहरांत जरा कठीणच आहे ) किंवा मोकळ्या वाटेवरून अर्धा तास तरी फिरून येऊ शकतो. आणि हे सगळं अगदी नाहीच जमलं तर आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या कामाचा आनंद घेऊन किंवा नवीन वेगळं एखादं काम शिकून मनाला ताजं करू शकतो. उदा. सकाळचा चहा, उपहार आपण करण्याचा प्रयत्न केला आणि पत्नी सहवर्तमान त्याचा आनंद घेतला तर दोन गोष्टी होतात . एक, बायकोचं एक काम कमी होतं, त्यामुळे तिचा मुडही मस्त होतो आणि दुसरं म्हणजे आपण काहीतरी वेगळं शिकलो ज्यामुळे आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला आनंद मिळाला याचा आपल्या मनाला होणारा आनंद आपण एंजॉय करू शकतो. अर्थात दिवसभर बॉसला खुश करण्याच्या मागे, जे दिखाऊ असतं तरीही कामाचा, व्यवसायाचा, आणि स्वतःच्या पदोन्नतीचा भाग म्हणून आपण करत असतोच. म्हणजे मुद्दा काय? तर मन हे अगदी लहान लहान गोष्टींमुळे आनंदीत, प्रफुल्लित होऊ शकतं.

आता तसं पाहिलं तर शास्त्रीय दृष्ट्या मन नावाचा कोणताही अवयव शरीरात कुठेही नाही. मग मन आनंदित झालं, माझ्या मनात आलं, मन भरून आलं, मन प्रसन्न झालं म्हणजे नेमकं काय झालं? थोडक्यात सांगायचं तर जाणीव आणि बुद्धी यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, स्मरणशक्ती, भावना, चेतना या गोष्टी जिथे होतात त्या ठिकाणाला मन असं म्हणता येईल.

आपल्या मनात आलेल्या, उमललेल्या भावभावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायच्या असतील तर तिथेही एक जागृत मन असायला हवं. म्हणजेच या सुंदर भावना निर्माण होण्यासाठी आणि त्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपलं स्वतःचं मन प्रफुल्लित असायला हवं.

अगदी सोपं उदाहरण देतो. ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या प्रकल्पाची (project) जबाबदारी दिलेली असते. ती पूर्ण करून त्या प्रकल्पाचं सादरीकरणही (presentation)करायचं असतं. आता प्रकल्प तयार करत असताना तो जास्तीत जास्त परिणामकारक कसा होईल आणि सादरीकरण करताना त्याची परिणामकारकता ऐकणाऱ्या, पहाणाऱ्या व्यक्तीवर किंवा ग्राहकांवर (client )जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी तो प्रकल्प आधी आपल्या मनात रुजायला हवा, समजायला हवा तर आणि तरच त्याचा प्रभाव आपण समोरच्यावर पाडू शकतो. म्हणजेच पुन्हा आपण फिरून तिथेच येतोय की मनाची काळजी घेणं, मन तंदुरुस्त ठेवणं, त्यांची योग्य प्रकारे मशागत करणं आणि मनाला इजा होऊ नये हे पहाणं अत्यंत आवश्यक आहे.

आता मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा कळत नकळत मनावर आणि पर्यायाने मेंदूवर पगडा बसणे. मन स्थिर असेपर्यंत आपले विचार नेमक्या दिशेने प्रवास करत असतात त्यामुळे निकालही योग्य मिळत असतो. एकदा का
मनावरचं दडपण वाढू लागलं, की या विचारांची दिशा स्वैर होऊ लागते. त्यामध्ये तारतम्य रहात नाही. मनात अनेक चित्रविचित्र विचार उभे राहू लागतात. त्यांचा ताण वाढू लागतो. परिणामी सारासार विवेकबुद्धी नष्ट होऊ लागते आणि अखेर माणूस वेडापिसा होऊन जातो. या सगळ्याचा शेवट काहींची मानसिक स्थिरता नष्ट होऊन ते विचित्र वागू लागतात, कुणी नशेच्या आहारी जातात तर कुणी आत्महत्या करून आपलं जीवन संपवून टाकतात. अर्थात त्यामुळे त्या व्यक्तीचं शरीर या जगातून जातं पण सगळे ताण तणाव मात्र तिथेच उरतात. ती व्यक्ती स्वतःपूरती तो प्रश्न सोडवते इतकंच.

आज अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक ताण तणाव आहेत. माणसाचं जीवनच या तणावानी भरून गेलेलं आहे. आजचा दिवस पार पडला, उद्याचं काय? अशा वातावरणात माणूस जगतोय. आठवड्याचा शेवट कसा संपतो कळतही नाही आणि पुन्हा धबडगा सुरु होतो.

कामाच्या प्रचंड ताणामध्ये विरंगुळ्याचे क्षण वेचायला त्याच्याकडे वेळच नाही म्हणा किंवा त्यासाठी तो वेळ काढतच नाही. शालेय जीवनापासून ते अगदी निवृत्त होईपर्यंत तो टांग्याला बांधलेल्या घोड्यासारखा डोळ्यांना झापडं लावून पळतच असतो. जे काही जीवनात स्वीकारतो ते त्याच्या मनाला भावलेलं आवडलेलं असतं का? हा विचार करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे वेळ नसतो. आजच्या पिढीची अवस्था थोडीबहुत अशीच झालेली आहे. नाटक, संगीत, वाचन, पर्यटन या आपल्या मनाला चिरतरुण, प्रफुल्लित राखणाऱ्या गोष्टींकडे पाहायलाही या पिढीला वेळ नाही. मग मनाची मशागत व्हायची कशी? ते फुलणार, पळणार कसं? आणि किती काळ? आजची तरुण पिढी अकाली वार्धक्याने ग्रासलेली दिसतें. अविरत ताणांमुळे या पिढीमधला मृत्यूदर वाढू लागलाय. ही सगळी कशाची लक्षणं आहेत ? मन, शरीर या दोघांनाही पौष्टिक आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी आणि चिरतरुण राहण्यासाठी गरजेचं मिळत नाही. पण जे नको ते मात्र वेळी अवेळी मिळत रहातं. अखेर दोघंही थकतात. मेंदू काम करणं बंद करतो आणि शरीर एक थकलेला गोळा होऊन जातं. मग मानसोपचार तज्ञ् , आहार तज्ञ् यांच्याकडे फेऱ्या मारून आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अर्धवट करून त्यांची मात्र भर तो करत रहातो. हे वाक्य मी म्हणतोय कारण या सगळ्यांनी अखेरपर्यंत त्याचं मन काही प्रफुल्लित, प्रसन्न होत नाही ते नाहीच. कारण आपल्या मनाला आधी आपण कधीच जाणून घेतलेलं नसतं. त्याला काय हवय, काय आवडतं, ते कशात रमतं हे समजूनच घेतलेलं नसतं.
उपचार शरीरावर होतात आणि मन मात्र तसंच कोरडं रहातं.

प्रासादिक म्हणे,
प्रसाद कुळकर्णी.
९७६९०८९४१२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..