लहानपणी मी जेव्हा फॅमिली डाॅक्टरांकडे जात असे, तेव्हा तोंडावर मास्क लावूनच ते तपासणी करीत असत.. मोठेपणी मी दाताचं रुटकॅनाल करायला डेंटिस्टकडे गेलो होतो, तेव्हादेखील डाॅक्टरने तोंडावर मास्क लावलेला होता.. थोडक्यात डाॅक्टर पेशंटला तपासताना व उपचार करताना, पेशंटचा संसर्ग होऊ नये म्हणून तोंडावर मास्क लावून स्वतःची खबरदारी घेतात..
चित्रपटातील नायक किंवा नायिकेचे आॅपरेशन होणार असेल तर त्यातील डाॅक्टर हिरव्या रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग असलेला मास्क लावून आॅपरेशन करीत असे. आॅपरेशन पूर्ण झाले की, दरवाजावरचा लाल दिवा, हिरवा झाल्यावर तोंडावरील मास्क उतरवत तो बाहेर येत असे..
अशा प्रकारे जीवनात एकेकाळी आपणा सर्वांचा ‘मास्क’शी इतकाच संबंध आलेला होता.. १९९४ साली ‘MASK’ नावाचा जीम कॅरी या विनोदी अभिनेत्याचा, इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाला होता…
दोन वर्षांपूर्वी चीनने संपूर्ण जगाला कोरोनाबाधीत करुन जेरीस आणले.. पहिल्या लाटे नंतर दुसरी लाट येऊन सगळं जनजीवन विस्कळीत झालं.. लाखों माणसं या आजाराला हकनाक बळी पडली..
पहिल्या लाटेच्या वेळी घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडणं, शासनानं सक्तीचं केलं होतं. मास्क नसेल तर दंड भरावा लागत होता. मेडिकलच्या दुकानातून ‘युज अॅण्ड थ्रु’ व ब्रॅण्डेड मास्क विकत मिळू लागले होते..
कित्येक दुकानदार टेलरकडून ‘मास्क’ तयार करवून त्यांची विक्री करु लागले. टेलरला घरबसल्या मोठा व्यवसाय मिळाला. त्यांच्याकडील वाचलेल्या कापडातून, त्यांनी शेकडो मास्क तयार केले गेले..
सदाशिव पेठेतील ‘कलाक्षेत्रम’ या साडीच्या दुकानदाराने खास भरजरी पैठणीचे मास्क विक्रीला ठेवले. शंभर रुपये किंमतीचे हे मास्क विविध रंगात उपलब्ध होते. ते खरेदी करताना देखील महिलांनी त्या विक्रेत्यास, कदाचित रंग व काठाच्या डिझाईनवरुन भंडावून सोडले असावे..
‘बिनधास्त’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मुली डोक्यावर व तोंडावर स्टोल बांधू लागल्या होत्या.. त्या आता मास्क वापरतात.. त्यांच्या या मास्कमुळे बाजारातील लिपस्टिकचा खप निम्यावर आला..
लहान मुलांसाठी काही कंपन्यांनी काॅमिक्सच्या चित्रांचे मास्क बाजारात आणले. त्यातील विविधता पाहून मुलांना हा घेऊ की तो घेऊ, असं वाटे..
दुसऱ्या लाटेच्यावेळी डबल मास्क लावण्याची पद्धत सुरु झाली. एकावर एक असे दोन मास्क लावून माणसं फिरु लागली.
एक मास्क लावूनच श्र्वास घ्यायला अवघड जात असताना, एकावर एक मास्क लावणं जिकीरीचं होतं.. आम्ही कधीतरी सर्दी झाल्यावरच तोंडाला रुमाल लावणारे, या ‘मास्क’मुळे पूर्वीच्या व्यंगचित्रातील चोराप्रमाणे स्वतःचं तोंड झाकून घेऊ लागलो.. कधी स्वतःला काॅमिक्समधील वेताळ किंवा बॅटमॅन समजू लागलो…
तीन वेळा लाॅकडाऊन सहन केल्यानंतर कोरोना आटोक्यात आला.. तरीदेखील खबरदारी म्हणून मास्क वापरणं गरजेचं आहे..
दसरा दिवाळी निमित्ताने आता माणसांचीच लाट रस्त्यावर येते आहे. कित्येकांनी फाजील आत्मविश्वासाने मास्क लावणं सोडून दिलेलं आहे.. काहीजण तो नावाला ठेवायचा म्हणून हनुवटीवर आणून ठेवतात. काहीजण जानव्याप्रमाणे एकाच कानावरुन लोंबकळता ठेवतात..
आता माणसानेच अतिप्रगतीने अशी वेळ आणलेली आहे की, हा मास्क कायमस्वरूपी वापरणं अत्यावश्यक आहे.. दिवाळीत कितीही प्रदूषण नको म्हटलं तरी, रस्त्यावर बेसुमार फटाके वाजवले जातातच.. त्या अपायकारक धुरापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे.
रस्त्यावरील धूळ, कार्बन नाकावाटे शरीरात जाऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यासाठी मास्क हवाच! काही लूटमार करणारे तोंडावर तिखटाची पूड टाकून पर्स अथवा बॅग पळवतात, त्यासाठी चष्मा व मास्क असेल तर आपण वाचू शकतो..
सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत, कार्यक्रमात मास्क असेल तर संसर्गाचा धोका रहात नाही..
ही ‘मास्क’ची सवय कायमस्वरूपी ठेवण्यातच आपलं हित आहे.. मी माझा मास्क घरी गेल्यावर कापूराच्या डबीत ठेवून देतो. सकाळी तो नाकावर चढविल्यावर, मला प्रसन्न वाटतं.. दिवसभर दुर्गंधी पासून संरक्षण मिळतं…
आॅक्सिजनचा ‘मास्क’ लावण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर हा कापडी ‘मास्क’ कायमस्वरूपी वापरत रहा.. मग कोरोनाच काय त्याचा ‘आजोबा’ही तुमच्या वाटेला जाणार नाही…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२७-१०-२१.
Leave a Reply