भोवती बघतो तिथें दिसतात सारे मुखवटे
होय रे, मंचावरी असतात सारे मुखवटे !
बदलतो माणूस वस्त्रें, बदलतो आत्मा कुडी
बदलती नेते तसे त्यांच्या मनाचे मुखवटे ।।
रौद्र वादळ वा पुराचें चाललें थैमान जे
थंड काचेतून बघती थंड उडते मुखवटे ।।
रोज जे घेती सुपार्या, निजशिशुस नवनीत ते
ओळखा, कुठले खरे ते, आणि कुठले मुखवटे ।।
भामट्यांचा उबग आला, स्वीकरी अध्यात्म मी
शिर लवे, टोपी मला घालत बुवांचे मुखवटे !
नाटकी दुनिया जरी, तिज आरसा दावूं कसा ?
बनुन दर्पण, दावि ती मजलाच माझे मुखवटे ।।
लाज राखिल कोण द्यूतीं द्रोपदीची आजच्या ?
येथल्या दु:शासनांना केशवाचे मुखवटे !
तूं जरी अवतार नाहिंस राम-कृष्णांसारखा
हो पुढे अन् टाक निर्दाळून सारे मुखवटे ।।
— सुभाष स. नाईक
Leave a Reply