नवीन लेखन...

बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश

बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश यांचा जन्म १ जानेवारी १९०९ रोजी मिरज येथे झाला. मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते.

गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले.

मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती. शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.

नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले, ‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’

टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.

पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.

१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या.

शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले.

दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली मा. दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.

संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत.

शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..