नवीन लेखन...

मत आणि मन

साहित्य, राजकारण, समाजकारण अशा परस्पर भिन्न क्षेत्रामधली समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मतभेद. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात चार वेगवेगळी माणसे एकत्र येऊन काम करतात तिथे मतभिन्नता, मतभेद आलेच. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही गोष्ट अनुभवायला मिळते. आणि त्यात काही गैरही नाही. मतभेद असने हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण मानले जाते. पण गेल्या काही दशकात जे चित्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही समाजकारणात, राजकारणात पहायला मिळते आहे ते चिंताजनक आहे.

पूर्वी एखाद्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीवर, घटनेवर समाजाच्या विविध थरातले मान्यवर मतप्रदर्शन करीत तेव्हा आपली.. भूमिका स्पष्टपणे व ठामपणाने मांडीत. परंतु सध्या हा ठामपणा, स्पष्टपणा अभावानचे आढळतो. परस्परामध्ये गुंतलेल्या हितसंबंधांमुळे सार्वजनिक जीवनात एक प्रकारचा बोटचेपेपणा बोकाळलेला दिसतो. आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी किंवा नविन हितसंबंध जोपासण्यासाठी सावध, वरवरच्या आणि भूमिकाहीन प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. मनातले मतभेद उघडपणे व्यक्त करण्याची जोखीम कोणी पत्करत नाही.

या हिशोबी, गुळमुळीत भूमिकेच्या अगदी विरूद्ध टोकाची भूमिका घेणारा वर्गही समाजात निर्माण झालेला आढळतो. एखाद्याच्या वक्तव्याबद्दलचे, कृत्याबद्दलचे मतभेद तीव्रपणे जाहिररित्या व्यक्त करण्याची नवीन शैली या मंडळीनी विकसीत केली आहे. त्या व्यक्तीचे पुतळे जाळण्यापासून ते त्या व्यक्तीशी संबंधही नसलेल्या जनतेला रास्ता रोको करून वेठीला धरण्यापर्यंत कोणत्याही थराला ही मंडळी जाताना दिसतात. अशा तीव्र मतभेद प्रदर्शनामध्ये अनेकदा आपण मुद्द्यांना उत्तर गुद्द्यांनी ‘ देतोय याचेही भान संबंधितांना राहत नाही. कार्यशैली वा घेतलेल्या निर्णयाबाबतचे मतभेद व्यक्त करताना त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून, त्याच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाते.

अशा दोन्ही पद्धतीच्या अतिरेकी वृत्तींमुळे समाजाचा तोल ढासळतो आहे. कोणत्याही समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विधायक विरोध किंवा मतभेद आवश्यकच असतात. पण सध्याच्या काळात मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच कोणी मानायला तयार नाही. एखादया विषयावरील मतभेदामुळे उसळलेल्या तात्विक व सात्विक वादाचा धुरळा खाली बसल्यानंतर त्या विषयाचे अधिक नेमके व नेटके रुप लोकांना दिसते. पण आज विरोधाचा लहानसा सूर ही तात्काळ दाबला जात असल्याने, परिस्थितीचे नेमके आकलनच होत नाही. परिणामी, अनेक निर्णय बहुमताने पण आंधळेपणाने घेतले जातात. हे निरोगी समाजाचे लक्षण नव्हे.

मतभेदांमुळे मते दुरावतात आणि मने दुखावतात हे जरी खरे असले तरी हा दुरावा कायमचा नसतो हे ध्यानात घेतले पाहिजे. टिळक आणि आगरकर या महापुरूषांमधील मतभेद याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. सामाजिक सुधारणांना अग्रक्रम द्यावा का स्वातंत्र्याच्या मागणीला यावरून त्यांच्यात मतभेद होते पण वैर नव्हते हे विसरता कामा नये, आज मतभेद असणे म्हणजे वैर असणे असाही गैरसमज करून घेतला जातो. आणि वैर टाळण्यासाठी मतभेद लपविले जातात. या विचारसरणीमुळे समाजात आपोआप एक घातक पायंडा पडत चालला आहे. तो म्हणजे वाईट गोष्टींना (मूक) संमती देणे व चांगल्याला (खुला) पाठिंबा न देणे. केवळ इतरांची मने दुखवली जातील म्हणून समाजविघातक रुढी, परंपरांना विरोध केला जात नाही. आणि अशा गोष्टींचा प्रसार होत रहातो.

राजा नागडा आहे हे सांगणारा मुलगा काय किवा राघोबांना देहांत प्रायश्चित सुनावणारे रामशास्त्री काय, ही मंडळी केवळ कल्पनेच्या जगातच शिल्लक राहिली आहेत. ठाम विचारांनी सौम्यपणे, समोरच्याचा योग्य आदर राखून मतभेद व्यक्त करणारे सुजाण, सुसंस्कृत लोक आज हवे आहेत. विरोधी शेरे- ताशेऱ्यांना न घाबरता, त्यांचे सभ्यपणे खंडन करणारे लोक आज हवे आहेत, समाजातील बुद्धिजीवी वर्गात ही शक्ती सुप्त स्वरूपात आजही आहे. गरज आहे ती त्यांनी आपली जबाबदारी ओळखून, ती धैर्याने पार पाडण्याची. मतभेत असणे आणि ते मोकळेपणाने व्यक्त करता येणे हे समाजाच्या सहिष्णुपणाचे लक्षण आहे. हे लक्षण लोप पावणार नाही याची खबरदारी आपण सर्वानी घेतली पाहिजे.

–चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..