मती आखूड आखूड
शरीर होई फार जड
नको वाटे बडबड
क्रोधापोटी
काय हवे मज वाटे
दूरदृष्टी न डोळी साठे
क्षण तो असावा ओठी
सुखं मिळती
अर्थ-
एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात. दुसरं काही सुचेनासे होते, डोकं जड होतं, दुखायला लागतं, झोप लागत नाही, खावंसं वाटत नाही. काही करावं असं वाटत नाही. मग त्यातून बाहेर पडतो तो क्रोध, राग, चिडचिड याचा परिणाम भांडणं, वादविवाद, त्याचा परत होणारा त्रास हे सगळं कसं एका दुष्टचक्रात अडकल्यासारखं वाटतं.
श्री समर्थांनी म्हटलं आहे, मनी असावे साधेपण, वास नसावा अंतरी, मिळे न जे स्वार्थापोटी, सोडून द्यावे
मला सगळं मिळालं पाहिजे,किंवा मला सगळं मिळालंच पाहिजे यातून बाहेर पडणारा, लोभ, क्रोध आणि असमाधानी वृत्ती जी येते ती आयुष्य कठीण करून बसते. काहीवेळी दूरदृष्टी नसलेली बरी, कारण उद्याच माहीत नाही तर 10 वर्षांनंतर काय होईल हा विचार करून जगण्यात काय अर्थ आहे.
काही क्षण ,काही गोष्टी या त्या त्या क्षणी जगायच्या असतात. आयुष्य केवळ भविष्य समोर ठेऊन जगलं तर ते वर्तमान जगू देत नाही हेही खरं आहे. म्हणून काही वेळा पुढे काय वाढून ठेवलंय त्या पेक्षा अत्ता माझ्याकडे काय आहे हे बघुन जगण्यात जास्त आनंद असतो.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply