गणपतीपुढे काहीतरी पर्यावरणस्नेही आरास करण्याचे ध्येय ठेऊन मी माझ्या गणपतीसमोर जशी कोकण- गोवा येथे माटोळी बांधली जाते तशी माटोळी तयार केली होती. याला माटी किंवा अंबारी असेही म्हणतात.मुंबईत ज्या ज्या भाज्या – फळे मिळू शकल्या त्या त्या माटोळीला बांधल्या होत्या.
गणपतीचे आगमन हे निसर्गाच्या समृद्ध काळी होते. पावसामुळे फळे, फुले,भाज्या यांची रेलचेल होते. त्यातील पहिले फळ, पहिली भाजी देवाला अर्पण करण्याचा हेतू यामागे असतो.
फुले ही देवाला वाहिली जातातच पण फळे आणि भाज्यांचे काय ? म्हणूनच एक लाकडी चौकट गणेशापुढे बांधली जाते. त्यावर त्यावेळी उपलब्ध होणारी फळे, भाज्या, फळभाज्या बांधून सजावट केली जाते. १०० % पर्यावरणस्नेही अशी ही आरास असते.पत्रीमुळे जशी आपोआपच वनस्पतींची ओळख होते तशी यामुळे भाज्यांची ओळख होते.
गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. गोव्याच्या श्री. भूषण भावे यांनी माटोळीवर लिहिलेल्या कोंकणी पुस्तकाला कर्नाटक सरकारचा ” सर्वोत्तम कोंकणी पुस्तक पुरस्कार ” मिळाला होता.
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गावाकडची पार्श्वभूमी सरत चाललेल्या अनेक जणांनी आपल्या मुलांना मुद्दाम आणून माझी आरास दाखविली होती. ज्येष्ठ मंडळी तर मनोमनी थेट आपापल्या गावीच पोचली होती.
आपणही यावर्षी ही आरास करू शकता. !
— मकरंद करंदीकर,
अंधेरी ( पूर्व ), मुंबई,
Leave a Reply