प्रत्येक व्यक्ती सतत स्वत:शी संवाद साधत असते. आपण आपल्या विवेकी बुद्धीच्या जोरावर प्रत्येक प्रसंगाचं मूल्यमापन करीत असतो, त्या अनुषंगानं आपण संबंधित निर्णय घेत असतो. यामध्ये आपण स्वतःशीच संवाद साधत असतो, स्वतःलाच प्रश्न विचारतो, त्याची स्वतःच उत्तरं देतो. यांत संप्रेषकाची, श्रोत्याची अशा दोन्हीही भूमिका आपण एकटेच बजावत असतो. ह्या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील झालेली असते. त्यामुळे अनेकदा होणारा विचार आणि कृती एकांगी होण्याचीच अधिक शक्यता असते. दोन व्यक्तींमधील संवादात सहसा तिसरी व्यक्ती सामील झालेली नसते. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव असतो. या संवादामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. या संवादामध्ये मौखिक, अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तात्काळ प्रतिसादही मिळत जातो.
समूह संवादात, संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. हा थेट संवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळखत नाहीत, त्यामुळे संवादाचा म्हणावा तसा प्रभाव श्रोत्यांवर पडत नाही आणि श्रोत्यांची प्रतिक्रिया देखील संप्रेषकाकडे उशिरा पोह्चते. काहीवेळा मूक संवादाचं आश्चर्य वाटतं.
अर्थात, मूक असेल तर तो संवाद कसा आणि संवाद असेल तर अव्यक्त कसा? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आले. अनेकदा आपलं व्यक्तं होणं आपल्या गप्प राहण्यांतून देखील काही विशिष्ट प्रकारे सूचित करू शकतं.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply