प्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापर आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात. दमडी, दिडकी पासून चक्क पन्नास पैशाला पुरातन म्हणून संबोधून “अॅण्टीकच्या पंक्तीत” नेऊन ठेवल्यामुळे नाण्यांना भलतच मूल्य प्राप्त झालं आहे.
स्टील, लोखंड या धातूंचा दैनंदीन कामकाजात वापर होण्यापूर्वी पीतळ, तांबं, अॅल्युमिनियम, याचा वापर असायचा, पण स्टेनलेस स्टील, लोखंडाच्या वस्तुंनी आपल्या आयुष्यात प्रवेश केल्यापासून काही गोष्टी कायमस्वरुपी हद्दपारच झाल्या आहेत, इतकच नाही तर काल परवा पर्यंत वापर असलेल्या वस्तुंना तर विशेष महत्त्व प्राप्त होऊन त्यांना “अव्वाच्या सव्वा” मागणी आली आहे.
आता चलनी नाण्यांचच घ्या ना एक पैसा, दोन पैसे, पाच, दहा, वीस पैसे याचा व्यवहारात तीस पस्तीस वर्षांपूर्वी सर्रास वापर होत, पण आज हीच नाणी पन्नास रुपये व त्यापुढे इतक्या रुपयांनी विकली जात आहे; अगदी फोर्ट परिसरात किंवा रेल्वे स्थानकाच्या आवारात किंवा प्रदर्शनातून सुद्धा.
आजच्या तरुणपिढीला किंवा लहानग्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की तीन पिढ्यांपूर्वी म्हणजे आजपासून साठ-सत्तर वर्षांपूर्वी एक, दोन, पाच, वीस पैसे, दमडी, दीडकी तसंच आज दुर्मिळ होऊन गेलेल्या नाण्यांना प्रचंड मूल्य होतं; त्याकाळी म्हणे या पैश्यातून संसाराचा मासिक खर्च अगदी सुलभरित्या होत; असो; आज मात्र परिस्थिती बदलली आहे आर्थिक गणितं बदलली आहे, जीवन पद्धती त्याचप्रमाणे सभोवतालचं वातावरणात देखील अमूलाग्र बदल घडले त्यामुळे अशा नाण्यांना काहीच मोल नाही, मात्र “अॅण्टीक कलेक्शन” आणि “नाणी जमवणार्या छंदिष्टांसाठी” अशी नाणि म्हणजे सोन्यापेक्षा ही कमी नाही हं !
कधीतरी मोठ्या व्यक्तींच्या गप्पा ऐकताना त्याकाळच्या जेव्हा आठवणी निघतात त्यावेळी पैश्यांचा मुद्दा हमखास निघतो, आणि मग “इतक्या पैश्यात तर आम्ही अशी किराणा मालाच्या दुकानातून चिक्कारसामान आणायचे आणखीन खुप काही गोष्टी या निमित्ताने ऐकायला मिळतात, पण आजच्या पिढीला आश्चर्य तर वाटतच पण हसू देखील आल्यावाचून रहात नाही.
काही जणांनी आजही जुन्या काळात वापरात असलेली नाणी आठवण म्हणुन अगदी जिवापाड जपली आहेत. विद्यमान वापरातील नाणी, नोटा ही देखील आज ना उद्या व्यावहारिक आयुष्यातून हद्दपार होतील तेव्हा आपण ही ते जपून ठेवणारच, खरंतर ही सवय प्रत्येक पिढीमध्ये दिसून आलेली आहे की जुन्या गोष्टी जपून ठेवायच्याच कारण “बात पैसे की है”! त्याच पैश्यांनी आपल्याला जीवनातील प्रसंगात कमी अधिक प्रमाणात साथ दिली आहे.
ज्यांनी कोणी दुर्मिळ नाणी जमविण्याचा छंद जोपासला आहे किंवा आपल्या घरातच क्चचित प्रसंगी जुनी नाणी नजरेस पडली की मन गतकाळात रममाण झाल्यावाचून रहात नाही, अन् या नाण्यांच्या रुपानं तो काळ देखील डोळ्यापुढे उभा ठाकतो.
— सागर मालाडकर
(मराठीसृष्टी)
Good article