सोलापूर ट्रिप बव्हंशी अशी असते- रात्री हुतात्माने आगमन, ठरलेल्या ठिकाणी पथारी टाकणे- शेंगा चटणी(अमर्याद), कवडी दही, भाकरी आणि पिठले यांच्या मदतीने उदरभरण. शरीराला हवा म्हणून बिछाना अन्यथा मन तसे रात्र रात्र जागेच असते आजकाल. सकाळी शहर झोपेत असताना येवलेंचा चहा आणि अनावर ओढीने ग्रामदेवतेच्या मंदिराकडे झपाझप पावले. दिवस सुरु करण्यापूर्वी सोलापूरकर तेथे आवर्जून आशीर्वादासाठी येतात. योगी सिद्धरामेश्वर भोवतालच्या जलाशयात आपले प्रतिबिंब निरखत स्थिर असतो आपल्या जागी. देऊळ शांतरसात लीन. बाकी पूजाअर्चा, धार्मिक विधींची लगबग सुरु झालेली असते.
आणि मंदिराला वेढून राहिलेला सिद्धेश्वर तलाव ! कुठलेही नाते जुळण्याची ललाटरेख सटवाईने रेखावी लागते म्हणे. सिद्धेश्वर तलाव आणि मी यांचेही असेच काहीसे असावे. भुसावळला फक्त तापी नदी, तीही गावापासून दूर, फटकून वसलेली ! त्यामुळे सोलापूरच्या घरापासून जवळच्या सिद्धेश्वर तलावाचे अप्रूप वाटायचे. त्याकाळी तो भरगच्च असायचा. त्या प्रवाहात मासे असायचे. आम्ही सोलापुरात नवीन असताना आवर्जून मंदिरात जायचो ते माशांना खाद्य द्यायला. तलावाला जिवंतपण बहाल करणारा तो माशांचा समुदाय हळूहळू दिसेनासा झाला. तलाव कधी कधी पूर्ण आटलेला- सुशोभीकरणासाठी पाणी काढून टाकलेला, कधी हिरवे आच्छादन ल्यालेला. मध्यंतरी तर मित्राने दुथडी भरून वाहणाऱ्या जलाशयाचा फोटो पाठविला तेव्हा क्षणभर डोळ्यांवरचा विश्वास उडाला. त्याची अशी जूनी रूपे आठवत मंदिराकडे पावले वाटचाल करीत असतात.
दुरून तो दिसतो- ध्यानस्थ ऋषीसारखा! भौतिक सर्वसंगपरित्यागाकडे निघूनही लोकांतात जगणारा! आजूबाजूला उगवत असलेल्या सकाळ प्रहराची नोंद न घेणारा. मौनात मग्न असला तरी त्या पाण्याचा सहवास कधी उदास वाटत नाही. मध्येच एखादा पक्षी त्याची समाधी भंग करतो. शेजारी एकेकाळच्या सिद्धेश्वर हायस्कूल चे रूपांतर आता यात्री निवासात झालेल्या इमारतीत भाविकांचे आवाज सुरु असतात. यावेळी आवारात स्केटींग शिकणारी मुले भरधाव शेजारून गेली. बाजूचा भुईकोट किल्ला तसाच स्तब्ध. नाही म्हणायला तिथेही “प्रभात चालणाऱ्यांची ” किंचित वर्दळ असते सकाळी सकाळी. चढत्या दिवसाबरोबर शरीराला कसेबसे बाक देणारे काही उत्साही व्यायामपटू दिसायला सुरुवात होते.
जलाशयासमोर गेले की तेथील शांतता मनात झिरपू लागते. दिवसभराचे कोलाहल मागे टाकीत तलावाशी संयत संवाद बरा वाटतो. मन स्थिर व्हायला शब्दांची गरज भासत नाही. तेथील संवादही अंतर्यामीच्या मौनात विरून जातात आणि स्वच्छ,नितळ वाटायला लागतं.
मौनव्रती जलाशय उच्चार करीत नाही. त्याचे ओठ मिटलेले असतात. मग मीच असंख्य पदरी अर्थ काढायला सुरुवात करतो. पुढील भेटीत माझी समज बरोबर आहे कां, याची खातरजमा करून घेतो, आवश्यक असेल तर दुरुस्ती करतो. तलावाच्या मनाचा तळ शोधण्याचे काम हातून सुटत नाही.
शक्यतो सोलापूरातील माझ्या दिवसाची सुरुवात या भेटीने होत असते. उद्या मात्र जमणार नाही, कारण उणेपुरे पाच तास मी घेऊन चाललो आहे बरोबर, आणि त्यांत कामांची मांदियाळी आहे.
पुढील महिन्याच्या स्नेहमेळाव्यासाठी जाईन त्यासाठी आत्तापासून तलावाच्या तीन “सकाळी ” बुक करून ठेवल्या आहेत.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply