आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल ‘असं का?’ हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. आई घरी मुलांशी संवाद साधते ते तिच्या भाषेत. ती केवळ भाषा नसते तर तिचे प्रेम,वात्सल्य या भावना असतात. मुलाला कदाचित तिचे सर्वच शब्द काळत नसतील पण त्या शब्दांमागच्या भावना मात्र नक्की कळतात. त्या भावना त्या शब्दाशी निगडीत असतात हे त्याचं मन ठरवत आणि ते विवक्षित शब्द ऐकले की त्यामागची भावना त्याच्या चटकन लक्षात येते. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.
या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी ‘सर्वात चांगले विनोदी दृष्य’ म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत.
इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मात्र मागासलेली हा विचार कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक कवी वा शास्त्रज्ञ यांची ‘मातृभाषा’ इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला, ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारख् शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध ‘देशी’ भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते.
आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा ‘रोबो’ नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या ‘रशीयन भाषेचा’ जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे
स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेल्यावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन ‘फाड फाड इंग्लीश’ बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे.
इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करतात कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम करतात..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे.
Leave a Reply