भारतीय विद्या या विषयाचे संशोधक आणि प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर जन्म ६ डिसेंबर १८२३ रोजी जर्मनीतल्या देसौ (Dessau)या गावी झाला.
मॅक्स म्युल्लर यांना कविता आणि संगीत यांची अत्यंत गोडी होती. १८४१ साली लाइपसिक विद्यापीठात प्रवेश घेतल्या नंतर त्यांचा या विषयातील रस कमी झाला. १८४१ ते १८४३ या काळात त्यांनी लाइपसिक विद्यापीठात (Leipzig University) संस्कृत व भाषाशास्त्राचा अभ्यास केला. १८४३ साली त्यांनी पीएच डी मिळवली. याच दरम्यान त्यांचा ऋग्वेदाशी परिचय झाला.
१८४४ साली त्यांनी बर्लिन विद्यापीठात फ्रांटस बोप (Franz Bopp) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास सुरु केला. पुढे १८४५-४६ या साली त्यांनी पॅरिस विद्यापीठात ब्युरनूफ (Burnouf) यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. ब्युरनुफ यांनीच त्यांना वेदांवरती काम करण्यास प्रोत्साहित केले. रामायणावरील भाष्यासहीत ऋग्वेदाचीही आवृत्ती करावी यासाठी त्यांनी म्युलर यांना आपल्याकडील हस्तलिखिते दिली. ऋग्वेदावरील पुढील अभ्यासासाठी म्युलर हे ऑक्सफर्डला गेले. १८४८ साली त्यांनी ऋग्वेदावरची संशोधीत आवृत्ती पूर्ण केली. ही आवृत्ती छापण्यासाठी तेथे त्यांना कुठलाही मुद्रक मिळेना. त्यांनी देवनागरी लिपीतील खिळे बनवून घेतले व १८४८ ते १८७३ या काळात सहा भागात असलेली ही आवृत्ती ऑक्सफर्डतर्फे छापण्यात आली. या कामासाठी लागणारे आर्थिक पाठबळ हे म्युलर यांचे मित्र बनसेन यांच्या प्रयत्नाने ईस्ट इंडिया कंपनीने उपलब्ध करुन दिले. या आवृत्तीचे शेवटचे काही भाग करण्यासाठी जर्मन पंडित आउटफ्रेश्ट यांनी त्यांना मदत केली.
मॅक्स म्युल्लर यांनी १८५० सालापासून ऑक्सफर्ड येथे अध्यापन सुरु केले. १८५४ साली आधुनिक भाषांचा प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांचे संस्कृत भाषेचा प्राध्यापक होण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. १८७३ साली ऋग्वेदाच्या आवृत्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर त्यांनी प्राचीन पौर्वात्य ग्रंथांचे इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याचे ऐतिहासीक काम केले.
’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत. मॅक्स म्युलर हे कधीच भारतात आले नाहीत. पण त्यांच्या मनात भारताबद्दल व भारतीय संस्कृतीबद्दल आत्यंतिक प्रेम होते. त्यांनी संस्कृत वाङमय तसेच प्राचीन भारतीय संस्कृती जगासमोर आणण्याचे मोठे कार्य केले. या जर्मन विद्वानाने एके ठिकाणी मोक्षमुल्लर भट्ट अशी सही केलेली आहे. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळूरू आणि चेन्नई या शहरांमध्ये मॅक्समुल्लर भवने असून तेथे जर्मन भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आणि भाषेच्या देशी-आंतरराष्ट्रीय परीक्षा घेतल्या जातात. जर्मन कॉन्स्युलटतर्फे ते चालविले जाते. भारतीय टपाल खात्याने १५ जुलै १९७४ रोजी चार तिकीटांचा एक संच वितरीत केला. त्यातील एक तिकीट हे भारतीय विद्या या विषयाचे संशोधक आणि प्रसिध्द प्राच्यविद्यापंडीत मॅक्स म्यूलर यांचे छायाचित्र असणारे होते.
मॅक्स म्युल्लर यांचे २८ ऑक्टोबर १९०० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply