|| हरि ॐ ||
<३१ मे
तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार आणि प्रसार शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था सर्वच प्रसिद्धी माध्यमांद्वारे एवढ्या तत्परतेने करतात तरीही तंबाखूचे व्यसन काही केल्या कमी होताना दिसत नाही. गरजेपेक्षा जास्त पैसा खिशात खुळखुळू लागला की त्या पैशाला फाटे फुटतात आणि माणसे नको त्या व्यसनांच्या आधीन होऊन कुटुंबाची धूळधाण करतात. तंबाखूचे व्यसन जडायला पुढील कारणे जबाबदार आहेत असे निरीक्षणावरून वाटते. जसे निरीक्षरता, कुतूहल, संगत, आकर्षण, नैराश्य, आदर्श आणि सवय. कुठलेही व्यसन गरीब/श्रीमंत, स्त्री/पुरुष, लहान/मोठा असा भेदाभेद करीत नाही. असो. थोडक्यात तंबाखूचा इतिहास बघू..!
कोलंबस आणि त्याचे खलाशी इ.स. १४९२ मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.
अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटय़ातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे कीटकनाशक ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत. निकोटिन सल्फेट हे तंबाखूच्या गाळातून तयार होणारे किटकनाशक आहे. म्हणजेच तंबाखूतून अक्षरशः विष तयार होते. तंबाखूच्या शेताला कुंपण नसत कारण जनावर तंबाखूच्या पिकाला तोंड लावत नाहीत. थोडक्यात या पृथ्वीतलावर तंबाखू खाणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे.
निकोटीन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात गेल्यास लागलीच रक्तात मिसळते आणि रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १०-२० सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते. मुख्य म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटीन व्यसनी व्यक्तींमध्ये अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया यांसारख्या मेंदूशी संबंधित रोगांचे प्रमाणही जास्त असते.
तंबाखू भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून चुऱ्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरडय़ांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे.
महाराष्ट्रात स्त्रियांचे तंबाखू वापराचे प्रमाण लक्षणीय आहे. कष्टकरी समाजात मोठ्या प्रमाणात बायका तंबाखूचा वापर करताना दिसतात. बायकांचा तंबाखूचा आवडता प्रकार म्हणजे मिश्री. भाजलेल्या तंबाखूचा म्हणजेच मिश्रीचा दात घासण्यासाठी वापर केला जातो. ब-याच वेळ मिश्री हिरड्यांवर चोळून चोळून लावली जाते. हिरड्यांची त्वचा मुलायम असल्याने मिश्रीमधील निकोटिन रक्तात पोहोचते आणि त्याचा शरीरावर व्हायचा तो परिणाम काही दिवसात दिसायला लागतो. काही मंडळी हे शरीरासाठी चांगले नसले तरी दातांसाठी आरोग्यकारक असल्याचे मानतात आणि तंबाखू पासून बनविलेली टूथपेस्टही वापरतात. महाराष्ट्रात मिश्री बद्दल खूप जनजागृती व्हायला हवी. त्याचे दुष्परिणाम लोकांपर्यंत सर्वच प्रसिद्धी माध्यमातून पोहोचवायला हवेत. मध्यंतरी एका महिला बचतगटाच्या सभेत या विषयावर माहिती दिल्यावर अनेक महिलांनी मिश्री ऎवजी दंतमंजन वापरायला सुरुवात केली. महाराष्ट्रात अनेक महिलांचे बचतगट आहेत तिथेही असा बदल घडू शकतो.
सध्या मुंबई तसेच राज्यांच्या इतर भागात रेव्हपार्टीजना उत् आला आहे. मुंबई-पुणेसारख्या शहरांत तरुणी सिगरेट ओढताना दिसतात. स्त्रियांमध्ये सिगरेट व दारुचे पिण्याचे प्रमाण सर्रास आहे. महाराष्ट्रातील किती स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात याची अचुक आकडेवारी उपल्ब्ध नसली तरी स्त्रियांना दंतवैद्याचे लागणारे उपचार, खेडोपाडी घराघरातून येणारे जळणा-या मिश्रीचे वास, टाटा कँन्सर रिपोर्टप्रमाणे महिलांमधे आढळणारे तोंडाच्या कर्करोगाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता हा प्रश्न खरच खूप गंभीर आणि अंतर्मुख करणारा आहे.
जगभरात सगळीकडे तंबाखूविरोधी आंदोलने होत असतात. परंतु सिगारेट कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे त्याच्या खपावर फारसा परिणाम होत नाही. महाराष्ट्रातही सरकारने तंबाखू आणि तंबाखू उत्पादनावर बरीच बंधने घातली आहेत. १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही. शाळेपासून १०० मीटरच्या परिसरात पान टपरीला परवानगी नाही. परंतु व्यसन करणा-यांच प्रमाण इतक जास्त आहे की अशी बंधने पाळली जात नाही. मध्यंतरी सरकारने गुटख्यावर बंदी आणली होती. त्यातला मॅग्नेशियम कार्बोनेट हा पदार्थ घातक आहे, असे सांगितले होते तरीही त्याचा वापर राजरोस चालूच आहे. गुटख्याच्या सेवनामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो. या पित्तामुळे जळ जळ होते. अल्सरचा त्रास होतो. तसेच पोटात तंबाखूचे कण चिटकून बसतात. ते कुजतात व पोटात व्रण निर्माण होतात.
तंबाखूला हळूहळू भिनणारे विष मानतात कारण त्याचे परिणाम लगेचच दिसून येत नाहीत. तंबाखू खाण्यामुळे संसार विस्कटत नाही. कुटुंबाच नुकसान होत नाही आणि पैश्याचही फार मोठ नुकसान होत नाही. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनाकडे फार गंभिरतेने बघितले जात नाही. परंतु शरीरातील असा कोणताही अवयव नाही ज्यावर तंबाखूमुळे परिणाम होत नाहीत. माणसाच्या शरीरात रक्तवाहिन्यांच जाळ असत. तंबाखूच्या अतिरिक्त सेवनामुळे या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि कठीण होतात त्यामुळे वेगवेगळे विकार होऊ शकतात.
जगात हृदय विकार हे तिस-या क्रमांकाचे मृत्यूचे कारण आहे आणि हॄदयविकाराच्या मुळाशी तंबाखू आहे. दर पाच सेकंदाला एक माणूस तंबाखूच्या आजाराने मरण पावतो, असा एक अंदाज आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तंबाखूचे अनियंत्रित सेवन. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तपुरवठा अतिरिक्त दाबाने होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर खूप ताण पडतो. हा ताण हृदयाला सहन होत नाही व कालांतराने हृदयविकाराचा झटका येतो. तसेच विडी किंवा सिगरेट ओढल्यामुळे कार्बनचे कण फुफ्फुसात अडकतात आणि श्वासनलिकेचा दाह होतो. श्वासनलिकेच्या दाहामुळे कफ होतो. कफ साठून फुफ्फुसात पाणी होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे मेंदुला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे दोन प्रकारचे विकार संभवतात. मेंदुत अचानक रक्तस्त्राव होऊन मृत्यू येतो. रक्तवाहिन्या कठीण झाल्याने त्या फुटू शकतात व मेंदुत अचानक रक्तस्त्राव होऊन माणूस मृत्यूमुखी पडु शकतो. काहीजणांना अपु-या रक्तपुरवठ्यामुळे विचार करण्याच्या भागाला क्षते पडतात. अशी क्षते पडल्यामुळे काळाचे भान राहत नाही आणि काळ-वेळ यांचा गोंधळ होतो. त्या क्षतामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. जगात तोंडाच्या कँन्सरचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. याचे कारण तंबाखू खाणारे सर्वाधिक लोक भारतात आहेत. जबड्याचा कँन्सर, अन्ननलिकेचा कँसर, जिभेचा कँसर तंबाखूमुळे होतो. माणसाला हमखास मॄत्युकडे नेणारे हे आजार तंबाखूनिर्मित आहेत.
व्यसने ही कायद्याच्या धाकाने सुटणे कठीण आहे तर त्यासाठी योग्य समुपदेशन आणि सकारात्मक कृतीची गरज आहे. गर्भलिंग चाचणीला निर्बंध आहे पण कायदा पाळला जातो का? नाही. महत्वाची कारणे लोकसंख्या, नसंपणाऱ्या गरजा व भ्रष्टाचार. भारतात तंबाखू खाण्याचे व विडी/सिगारेट ओढण्याचे प्रमाण कित्येक दशके सर्वच थरात खूप आहे. परंतू व्यसनाधीन माणसांची व्यसन सोडण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीने तशी कृती होताना दिसत असेल तरच ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून खऱ्याअर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल.
b>
<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
<
Leave a Reply