पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात.
जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे.
अशावेळी चाळीतल्या अंगणाचा अगदी योग्य वापर व्हायचा . मे महिन्यातलं रणरणतं उन कामी यायचं. घरातली जुनी लोखंडी खाट, लाकडी स्टूल वा टिपॉय वर घरातली एखादी जुनी चादर किंवा प्लास्टिकच्या पेपर अंथरुन त्यावर कुरडया, नाचणीचे पापड, साबुदाण्याचे पापड, सांडगे, शेवया, स्टेनलेस स्टील वा जर्मनच्या ताटलीत आंब्याचा , फणसाचा पाक बनवून सुकायला ठेवणे आणि इतर बरंच काही.
आता साला पूर्वीच्या चाळींची जागा उंचच उंच वरांनी घेतली.
चाळींसोबत चाळीतलं अंगणसुद्धा हरवलं आणि या अंगणाच्या सोबतीने केल्या जाणाऱ्या गोष्टीसुद्धा.
पूर्वीच्या चाळी म्हटलं कि त्या चाळींना मागलं दार असायचं . मागल्या दाराबाहेर पडवी(ओसरी) आणि त्या पडवीत मांडलेली असायची चूल. घरातल्यांच्या आंघोळ्यांचं पाणी याच चूलीवरल्या एखाद्या करपलेल्या काळपट जर्मनच्या टोपात, हंड्यात वा पितळेच्या बंबात तापवलं जायचं. विस्तव पेटता ठेवायला चूलीजवळ असायची एखादी फुंकणी वा झडपी.
मागच्याच ओसरीवर सगळ्यांच्या आंघोळ्या आटपल्या कि कपडे धुतले अन् वाळत घातले जायचे. जेवणाची भांडीही इथेच धुतली जायची. तुळशी वृंदावनासमोर दिवसरात्र दिवा पेटता असायचा. मागच्या अंगणात तगार, जास्वंद , चाफा, सदाफुली, आंबा , चिंच , तूतू , फणसाची झाडं लावलेली असायची. झाडावर कोकिळ गात बसायची, खारुताई या झाडावरनं त्या झाडावर टिवटिव करत फिरत बसायची. मधेच एखादं उष्टावलेलं जांभळाचं फळं , आंबा खाली टाकून द्यायची. आम्हीसुद्धा आंब्याच्या झाडावरचे पिके आंबे लांब बांबू गावी ज्याला चिवा म्हणतात त्याच्याने पाडायचो. जांभळाचे घड तोडायचो नी ते बाटलीत साठवून त्याचा रस काढून घरच्यांच्या मदतीने काला खट्टा बनवायचो.
पहाटेलाच बैलगाडीवरनं रताळेवाला रताळी घेऊन यायचा.ती रताळी याच चुलीतल्या विस्तवावर राखाडीत भाजत ठेवायची.
याच चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत तर अगदी लाजवाब लागायचं.
अजूनही आपली जुनी ओळख कायम ठेवत काही जुनाट , मोडकळीस आलेल्या चाळी अन् त्यात रहाणारी भाडेकरु मंडळी पुनर्रविकासाची वाट पहात जगतायत.
याच चाळीतल्या याच अंगणात खाटेवर सुकत ठेवलेल्या या कुरडया, शेवया, पापड अन् सांडग्यांनी लहानपणीच्या त्याच जुन्या आठवणी जाग्या केल्या.
लेखक : चंदन विचारे
https://www.facebook.com/chandan.vichare.1/
`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपचे सभासद
Leave a Reply