नवीन लेखन...

मायामोहनाशक मायाधिपती श्री स्वामी महाराज !

भक्तवत्सल भक्ताभिमानी पुर्णब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हातून घडणे ही फार मोठी आणि देवदुर्लभ गोष्ट आहे. ज्या स्वामींच्या दरबारात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवता हात जोडून उभ्या आहेत. लक्ष्मी ही स्वामींचे पाय दाबत आहे. ईंद्र चोपदार झालेला आहे, काळ शरण आलेला असून पडेल ती स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानत असतो. चार ही वेद दारात कुत्रे होऊन आपली उपस्थिती दाखवित आहेत. असे स्वामींच्या राजस वैभवाचे वर्णन आपण श्री आनंदनाथ महाराजांच्या अभंगाद्वारे श्री स्वामी वैभव दर्शन भाग 01 पुष्प 02 मध्ये पाहितले आहे. असो. असा सर्व देवांचा देव ब्रह्मांडनायक आणि परब्रह्म आपली आराध्य देवता आहे. यापेक्षा निराळे भाग्य ते कोणते ? ज्याने आपली सेवा स्विकारावी म्हणून देवता ही वाट पाहत असतात, तो सर्वांधिपती आमची सेवा तत्परतेने स्विकारतो, आम्हाला जलद अनुभूती ही देतो. संकटकाळी सोबत आणि मार्गदर्शन ही देतो. हे केवढे अनंत उपकार त्या परब्रह्माचे आम्हांवर आहेत. याची साधी जाणीव ही अनेक लोकांना नाही. अजून ही असंख्य लोक हे ग्रह, तारे, नक्षत्रात अडकून बसलेले आढळतात किंवा स्वामी महाराज सोडून ईतर देवतांची पूजा करतात. काही जण तर स्वामींनाच साक्षी ठेवून ईतर तीर्थंक्षेत्रांचे उंबरठे झिजवत आहेत. असे मुढजन पाहिले की, त्यांच्या अज्ञानाची किव येते. सर्वांत शेवटी सर्वजण स्वामीकडे येतात आणि आम्ही मात्र सर्वात अगोदर स्वामीकडे येऊन पुन्हा ईतरत्र भटकत फिरतो. अशा लोकांनाच राजवाड्यातील फकिर ही उपाधी शोभून दिसते. असो.

सर्वश्रेष्ठ स्वामी महाराजांची सेवा करत असताना स्वामी महाराज आपली परिक्षा घेत असतात. ही परिक्षा घेताना, आपण कच्चे आहोत की पक्के आहोत याची तपासणी होत असते. यासाठी स्वामी महाराज मायेला आपली परिक्षा घेण्यासाठी पाठवतात. ही माया आपल्या आसक्तीनुसार आपली परिक्षा घेत असते. कोणाला आपली पत्नी प्रिय असते, कोणाला आपला पती प्रिय असतो. कोणाला भाऊ-बहिण, कोणाला काका-मामा, कोणाला मित्र परिवार वा कोणाला अन्य नातेवाईक प्रिय असतात. तर कोणाला परमेश्वरापेक्षाही एखादी व्यक्ती श्रेष्ठ वाटते व तो त्या व्यक्तीलांच ईश्वर मानून त्याचे खरे खोटे सर्वच योग्य मानतो. अशा सर्वंच मायेच्या प्रभावात अडकलेल्या आणि व्यक्तीपूजेत गुंतलेल्या किंवा व्यक्तीच्या आसक्तीत अडकलेल्या मुढ जनांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी स्वामीसुत महाराजांनी हा अभंग रचलेला आहे.

स्वामीसुतांनी स्वामी आज्ञेने संन्यास घेऊन आपल्या प्रिय पत्नीचा त्याग केल्यानंतर ही त्यांची प्रिय पत्नी तारका मात्र अनेक उपाय करुन स्वामीसुतांना परत संसारात आणण्याची धडपड करत होती. तेव्हा आपल्या पत्नीला योग्य तो उपदेश देण्यासाठी हा अभंग स्वामीसुतांनी उच्चारला आहे. जो सर्वच मायापाशात अडकलेल्या अज्ञानी जीवांना बोधपर ठरणारा आहे. कारण निमित्त पत्नी असली तरी मुळ परिक्षा पाहणारा कोणीतरी वेगळाच आहे, याची पुर्ण जाणीव स्वामीसुतांना झाली होती. तसेच आपल्या आयुष्यात कारण परत्वे कोणतीही व्यक्ती परमार्थांत आडकाठी करू लागली तरी सुध्दा मुळ कर्ता कोणीतरी वेगळाच आहे, याची जाणीव ठेऊन सत्य असत्य याची ओळख पटवून योग्य मार्ग धरावा. तरच आपली उन्नती होईल. अन्यथा परत आपण पदभ्रष्ट होऊ. याची जाणीव करुन देणारा आजचा अभंग पाहू या……

स्वामीविण हेच सर्व असे खोटे ।  स्मरलिया वाटे भय नाहीं ॥1॥
तारके, तुज आतां सांगतसे हित । स्वामीचे त्वरीत पाय धरीं ॥2॥
कोणाचा नवरा कोणाची बाईल ।  अवघे ते समूळ नाते खोटें ॥3॥
कोणाचे हो भाऊ कोणाच्या बहिणी । अवघी ती करणीं मायिकचि ॥4॥
कोणाचे सोयरे कोणाचे धायरे । अवघें ते पसारें व्यर्थ सर्व ॥5॥
कोणाचा चुलता कोणाचा हो काका । आणिक ही आका लटक्याची हो ॥6॥
मामाही कोणाचा, नये हो कामाचा ।  शेवटीं यमाचा जाच मोठा ॥7॥
ऐशा मायाजाळी गुंतूनि फससी । सर्वस्वी मुकसी अपुल्या हिता ॥8॥
सोडूनियां माया, स्वामींचे चरण । करी तूं वंदन सर्वकाळ ॥9॥
माझा बाप स्वामी येई तव कामीं । सासरा निजधामीं नेईल तो ॥10॥
आमुची ही आंस सोडूनियां द्यावी । धरु नको जीवीं सुखदु:ख ॥11॥
स्वामीसुत म्हणे धन्य तूंचि होसी । तयाचे हो वंशी जन्मुनियां ॥12॥

घरावर तुळसीपत्र ठेवून स्वामी कार्याची ध्वजा फडकविण्यासाठी बेघर झालेल्या आपल्या पतीला परत मायेच्या प्रभावाखाली आणण्याचे अतोनात प्रयत्न करणाऱ्या तारेला संसार मायेच्या प्रभावापासून दुर करण्यासाठी स्वामीसुत उपदेश देत आहेत की, ‘ हे तारके ! या नश्वर जगात काहीही शाश्वत नाही. किंबहुना स्वामी शिवाय हे जगच अवघे खोटे आणि मायेचा बाजार आहे. तेव्हा या फसव्या जगातून आपला उध्दार करून घ्यायचा असेल तर माझ्या स्वामीच्या नामाचे स्मरण कर. या शिवाय गत्यंत्तर नाही.’ हेच पुढे अजून समजावून सांगतात की, हे तारके, मी तुला तुझ्या हिताचेच सांगत आहे की, तू आता त्वरीत माझ्या स्वामींचे पाय धर आणि त्यांना शरण जा. ते तुला नक्कीच या मायेच्या प्रभावापासून मुक्त करतील. पण आपली मुळ वृत्ती न सोडता आपले प्रयत्न आणखीच वाढवणाऱ्या तारकेला पुन्हा उपदेश देताना स्वामीसुत सांगतात की, तारके, कोण कोणाचा नवरा आणि कोण कोणाची बायको आहे. हा सर्व वृथा भ्रम आहे. लग्न होईपर्यंत अनोखळी असणारे दोन जीव नंतर सात जन्माच्या बंधनाने बांधले जातात आणि सात जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतात, मात्र प्रत्येक जन्मी  अर्धे आयुष्य हे वेगवेगळेच घालावे लागते. तर मग बंधन ते कोणते ? त्यातही मागील जन्माचे काहीच स्मरण नसल्यामुळे या बंधनाचा काहीच उपयोग ही नसतो. तेव्हा या भ्रमातून बाहेर ये. आपल्या भवितव्याचा काही तरी विचार कर. असा उपदेश स्वामीसुत देताना दिसतात. पुढे हेच अजून स्पष्ट करुन सांगतात की, कोण कोणाचे भाऊ आणि कोण कोणाच्या बहिणी आहेत. लग्नापुर्वी जीवाभावाने राहणारे बहिण भाऊ लग्नानंतर मात्र एकमेंकापासून योग्य ते अंतर राखून असतात आणि आपल्या नविन नात्यात गुंतत जातात. तेव्हा कोणीच कोणाचे नसते, तर हा सर्व मायेचा प्रभाव आहे. आज एकावर असलेली माया उद्या तेवढीच त्यावर राहील असे होत नाही. तेव्हा यातून योग्य तो बोध घे. सोयरे धायरे हे सुध्दा कोणीच कोणाचे नसतात. हा सर्व फाफट पसारा आहे. प्रत्येकजण इथे आपला स्वार्थ पाहतो आणि  त्यातून मग आपले परके ठरते. कोणाचा चुलता आणि कोणाचा काका, तर ही सर्व स्वार्थी वृत्ती आहे. लटकी माया आहे. आपला मामा सुध्दा आपल्या कोणत्याच कामाचा नाही. किंवा आपले ईतर आप्त स्वकिय ही आपल्या काहीच कामाचे नाहीत. कारण यापैकी एक ही जण आपल्याला यमाच्या जाचातून सोडवणारा नाही. यापैकी कोणीच आपले यमपाश दुर करु शकणार नाही. तेव्हा तारके वेळीच सावध हो. आपले हित साध. यात जर गुंतत जाशील तर तुझेच सर्वस्वी अकल्याण होईल. तुच तुझ्या हिताला मुकशील, त्याला बाधा आणशिल. तेव्हा सावध हो. अशी शिकवण स्वामीसुत देताना दिसतात.

तारके, हा मायेचा पदर टाकून दे. या मायापाशातून बाहेर ये आणि माझ्या स्वामींच्या चरणी नतमस्तक हो, स्वामी चरणांना वंदन कर, यात तुझे कल्याण आहे. इतर निरर्थक गोष्टींत वेळ वाया घालवण्यापेक्षा तू सरळ शरणांगत भावाने माझ्या बापाला शरण ये, शेवटी तुझे सर्वस्वी कल्याण हा केवळ माझा बाप म्हणजे तुझा सासराच करणार आहे. तोच तुला आपल्या निजधामाला घेऊन जाणार आहे. तेव्हा मला परत प्राप्त करण्याची ओढ सोडून दे, यातून मिळणाऱ्या सुख दु:खापेक्षा तू सर्व सुखनिधान स्वामींना आपलेसे कर. त्यातच तुझे हित आहे. या जगातील नश्वर गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा सर्वेश्वर स्वामींना शरण जा, त्यांना जवळ कर, त्यांच्या चरणी नतमस्तक हो, जर हे तुला साधले तर तुच धन्य होशिल, ज्या वंशात तुझा जन्म झाला आहे, तो वंश ही तुझ्यामुळे धन्य होईल. यासाठी त्वरेने स्वामी देवांना शरण जा, त्यांचे चरण धर. तुझा उध्दार त्याच चरणाजवळ आहे. हि अंतिम बाब तू ध्यानात घे. असा बहुमोल संदेश स्वामीसुत आपली पत्नी तारा हिला देतात.

लौकिक दृष्ट्या तारेला दिलेला हा उपदेश सर्वंच पारमार्थिक वाटचाल करणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. मायेच्या प्रभावाखाली असणाऱ्या जीवाला योग्य तो शोध आणि बोध करून देणारा हा उपदेश आहे. शेवटी अंतिम सत्य परमेश्वर असून ईतर सर्व काही नश्वर आणि नाशिवंत आहे. याची जाणीव करुन देणारा हा एक बहुमोल अभंग आहे. आत्मिक उन्नती साधताना मनाला योग्य ती शिकवण आणि योग्य तो बोध यातून अगदी सहजतेने होतो. म्हणून प्रपंचातून परमार्थांकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक जीवांसाठी ही शिकवण बहुमोल आहे.

सज्जनहो, वरील अभंगाद्वारे स्वामीसुत महाराजांनी मायेचा प्रभाव आणि त्यातील फोलपणा जरी दाखवून दिला असला तरी सुध्दा आपण याचा अन्वयार्थ योग्य तोच घ्यावा, ही एक कळकळीची विनंती आहे. कारण स्वामीसुतांना स्वामींनी संसार सोडून संन्यासाश्रम घ्यायला लावला होता. म्हणून त्यांनी आपली पत्नी तारेला हा दिव्य संदेश दिला असला तरी याचा अर्थ आपण ही संसार टाकून संन्यास घ्यावा, असा अजिबात नाही. किंवा स्वामीसुतांनी ही संन्यास घ्या, असा उपदेश कोठेही केला नाही. तेव्हा आपला संसार करत करत, आपल्या प्रांपचिक जबाबदाऱ्या पार पाडत पाडत, आपले मन हे परमेश्वराकडे वळवायचे आहे. सर्वांशी प्रेमाने व ममतेने वागत असताना ही, आपले मुळ ध्येय मोक्ष प्राप्ती आहे. हे लक्षात ठेऊन हळूहळू आपले मन विरक्तीकडे न्यावे, म्हणजे जसे कमळाचे फुल हे चिखलात उमलते मात्र ते स्वत:ला त्या चिखलापासून दुर ठेवते, अगदी तसेच आपण ही संसार करत असताना त्यात अडकून पडू नये. तर त्यातून विरक्त होण्याचा प्रयत्न करावा. आपले कर्म करत करत विरक्ती अवस्थेपर्यंत जाणे म्हणजेच विकांराचा सन्यास घेणे होय. आणि हा विकारांचा संन्यास संसाराचा त्याग करुन घेतलेल्या संन्यासापेक्षाही जास्त फलप्रद आहे. कारण वासनेपासून पळून जाण्यापेक्षा संसारात राहून वासनेला जिंकणे हे जास्त महत्वपुर्ण आहे. वासनेपासून पळून जाणारा कधी तरी वासनेच्या आहारी जाऊन पदभ्रष्ट होतो. तेव्हा आपण वासनेवर जय मिळवून पुढिल वाटचाल करावी, आणि ही वाटचाल करत असताना मनाला समजूत घालण्यासाठी वरील उपदेश आपल्या मनाला करावा. एवढेच आजच्या अभंगातून अभिप्रेत आहे. याची सर्वांनी जाणीव ठेऊन, यातील मुळ हेतू लक्षात घेऊन तो साध्य करण्यासाठी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र भावाने शरण जावे, हिच एक अपेक्षा ठेऊन येथेच विराम करू या. जाता जाता सर्व मंगलाचे मंगल आणि अमंगलाचे मंगल करणाऱ्या स्वामींचे पवित्र पावन नाम स्मरण करू या…..

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥

अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

॥ श्री स्वामीसुत महाराज की जय ॥
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥

— सुनिल कनले 

सुनिल कनले
About सुनिल कनले 16 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..