मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे
मद्यपान करत करत विसरुं भान रे
मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ?
गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’ ।।
‘मद्य मद्य’ करुं या हरपून शुद्ध रे
मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे
पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे
मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे ।।
जरि असलो आम्ही कधि व्याधि-विद्ध रे
तरि असतो प्राशाया नित्य सिद्ध रे
मद्यथेंबही करी नरा प्रबुद्ध रे
मद्य करी नरजीवना समृद्ध रे ।।
क्लीबांना मद्य करी युद्धसिद्ध रे
मूढ असे, तो बनतो थोर ‘सिद्ध’ रे
तरुण बनत, असती जे जख्ख-वृद्ध रे
मद्य हेंच ‘अमृत’ म्हणुनी प्रसिद्ध रे ।।
मद्ये हेंच पेय, मद्य हेंच खाद्य रे
मद्यानें सरे उदर-अग्नि-मांद्य रे
‘मद्याचें पूजन’ , कर्तव्य आद्य रे
होइल तर होऊं दे जगत् क्रुद्ध रे ।।
प्राशक हे आशालभूत गिद्ध रे
वाटे, ‘व्हावेंच मद्यपान साध्य रे’
होवो ना होवो तें सहजसाध्य रे,
मात्र, मद्य, विषय नसे हा विवाद्य रे ।।
मद्याला समजुं नका कुणिहि त्याज्य रे
मद्य हेंच चालवितें हृदयराज्य रे
मद्य हेंच ईश, मद्य परमपूज्य रे
मद्याला भजण्याला व्हाच सज्ज रे ।।
मद्य कुणी वारयोषिता न भोग्य रे
स्पर्श करा आदरात, तेंच योग्य रे
चाखुन तनमनिंचें टिकते आरोग्य रे
थेंब चाखण्यांही लागेंच भाग्य रे ।।
मद्याचें नांव करी कंठ रुद्ध रे
मद्यप्राशनास आम्ही कटिबद्ध रे
शुक्लपक्ष येवो वा पक्ष वद्य रे
आम्हांला नेहमीच प्राश्य मद्य रे ।।
जगतासाठी भलेहि मद्य निंद्य रे
अमुच्यासाठी परंतु मद्य वंद्य रे
मद्यगान, भजन, चषक हेंच वाद्य रे
मद्य, देव, विषय हाच प्रतिपाद्य रे ।।
व्याधि : रोग
प्रबुद्ध : wise , शहाणा, ज्ञानी
सिद्ध : (१) तयार , (२) ‘सिद्धी’ प्राप्त असलेला
उदर-अग्नि-मांद्य : अन्नपचनात मंदपणा येणें
वारयोषिता : वारांगना, वेश्या
प्राश्य : जें प्राशन करावें असें
– सुभाष स. नाईक
# मद्यगान – ३
Leave a Reply