आज कोण न जाणे माझी इयत्ता पाचवीतील कवी इंद्रजीत भालेराव यांची ‘बाप’ या कवितेतील चार ओळी आठवल्या…
माझा बाप शेतकरी,
उभ्या जगाचा पोशिंदा,
त्याच्या भाळी लिहलेला,
रातदिस कामधंदा…..
याच त्या चार ओळी आठवल्या न मनात जणू प्रश्नाचं काहूरचं माजलं…माझ्याही बापाच्या माझा जन्माच्या आधीपासून त्याच्याही भाळी रात्र न दिवसभर कामधंदाच तर आहे.. न वाईट तर ह्याच वाटतं ही कविता मला पाचवीला असून ह्या कवीने अजाणतेपणी का होईना आम्हाला आमच्या वडिलांच्या कष्टाची त्यावेळी जाणीव करून दिली होती, कदाचित त्यावेळी आम्ही सुद्याण नसू पण आता तर आम्हाला त्यांच्या कष्टाची जाणीव नक्कीच व्हायला हवीय….
कसं असत सामान्यतः एका शेतकरी बापाचं जगणं केलाय कधी विचार?? गरिबीतच जन्माला आलेला त्यात निसर्ग कोपलेला अशा वेळी पदरात तीन,चार,पोर असलेला आर्थिक पाठबळ म्हणजे दावणीला असणारी ती चार जनावरे. त्यातील एखादं दुसरं दुभत नाहितर पुढं जाऊन बाकीची दोन पण आपल्याला दूध-दुभत देतील या वांज अपेक्षेखातर पोटसंग जतन केलेली.. झालं त्याच आयुष्यच भांडवल.. न त्याच भांडवलावर आयुष्य ओढणार तुमचा न माझाही तो शेतकरी बाप…
चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी.
पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण कुठेतरी भगवंत आहे अस मानणार तुमचा माझा बाप म्हणतो, कोड त्यानं पाडलय तर मार्ग ही तोच दाखवेल. अस म्हणून इथंही हार मानत नाही.
भाऊबंधकी सोबतीला असो अथवा नसो पुन्हा तो नव्या जिद्दीने आपलं कुटुंब डोळ्यासमोर ठेऊन उभा राहतो,पुन्हा पेटून उठतो,पुन्हा कामाला लागतो, गावातल्या किंवा पैपाहुण्याच्या कुणाच्यातरी ओळखीच्या ठिकाणी मुलीच लग्न जमत, त्याच्या ऐपतीप्रमाणे तो पाहुण्यांच मान -पान करतो, आजपर्यंत कुणापुढे पैशांसाठी लाचार न झालेला माझा बाप मुलीच्या सासरच्या लोकांपुढे मात्र “काही कमी राहीली नाहीं ना? ” अस शंभरदा बोलून अपराध्यासारख मान खाली घालुन उभा असतो.
त्याच्या कर्मयोगान म्हणा किंवा मुलीच्या पायगुणांन पहिल्या मुलीच तर सगळं काही सुरळीत चालू राहत, तोवर इकडे उर्वरित मुलांचं शिक्षण व एक दोन वर्ष गेली की दुसऱ्या मुला वा मुलीच लग्न.. तिथंही तो पूर्ण ताकदीनिशी उभा राहतो, ती ही वेळ निघून जाते तोवर आलेल असत पहिल्या मुलीच्या बाळंतपणाची जबाबदारी, पण ती जबाबदारी ‘आजोबा’ होण्याचा तो एक सुखद आनंद देणारी असते म्हणून ती ही जबाबदारी तो आनंदाने पूर्ण करतो..
परत येत घराचं काम ज्या घराणं आजपर्यंत आपल्याला इथपर्यंत तारण्याचा एवढा मोठा आधार दिला त्याकडे ह्या बाकीच्या गोष्टी करता करता लक्ष देणं राहूनच गेलेलं असत, ते तर अजून किती दिवस साथ देणार ना? शेवटी दगड- विटांचा निर्जीव साथीदारचं.. इथं आपली हाडा- मांसाची आपली म्हणणार उलटतात त्याच काय?
घराच्या बीजगऱ्या पण आता कुरररर आशा वाजू लागलेल्या असतात जणू आता बास… हेच सांगत असतात…पोराबाळंच करता करता आईबापाच स्वप्नातल घर हे स्वप्नातलंच राहत न पैशाअभावी राहायला न म्हणायला छत्र म्हणून आहे तेव्हढया पैशात त्यांचा ‘ताजमहाल’ उभा राहतो.
असच त्याची आता पन्नाशी उलटलेली असते चारही मुलांचं शिक्षण,शिक्षण झालं की मुलं असतील तर नोकरी न मुली असतील तर लग्न, न त्यांची लग्न झालं की नातवंडासाठीची तयारी, उरलेली काही दहा- वीस वर्षे रमून जातात ते आपल्या मुलांच्या प्रपंचात, नातवंडाच्या सहवासात….
न इथंच तर संपलं त्यांचं आयुष्य……..
आता मला सांगेलं का कुणी कुठं जगला स्वतःसाठी तुमचा, माझा बाप???सांगेल का?? नाही ना… हाच तर सगळ्यात मोठा त्याग आहे आयुष्याचा त्याग हो आयुष्याचा त्याग तो केलाय तुमच्या, माझ्या आपल्या सर्वांच्या बापाने आपल्या कुटुंबासाठी… न ह्याच्यापेक्षा मोठा त्याग कोणता असूच शकत नाही..
नाहीतर आजकालची मूल पण आपल्या प्रियेसीसाठी सिगरेट, तंबाखू,दारूचा त्याग करताना दिसतातच की, पण अरे बेवड्या तू जी दारू ज्या बापाच्या जीवावर पितोस त्यानं बापाचं तर आर्थिक नुकसान आहेच पण त्यापेक्षा ज्या परमेश्वराने तुला दिलेल्या अनमोल शरीराचे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होते न त्यात तुझाच फायदा आहे, मग ह्यात कुठून न कसा बरं आला त्याग???
विचार करा ना जरा आपल्या बापाला नसेल का वाटत नवनवीन कपडे आपल्यासाठी आपल्या बायकोसाठी दिवाळीला घ्यावीत, कुठतरी दोघंच काही काळ तरी फिरायला जावं, जग इतकं मोठं आहे माणूस म्हणून जन्माला आलोय तर मुंगीएवढा त्यातला भाग तरी पाहावं एक आठवण म्हणून..नसेल का वाटत न आपण मुलं त्यांचा राग आला की म्हणून जातो काय केलं आमच्यासाठी?? केलाय त्यांनी सर्वत्याग तो कुणालाही जमणार नाही.. असो लोक जस म्हणतात आईवर लिहायला जस आभाळ पुरणार नाही तसच माझ्या बापावर लिहायला सुद्धा आभाळ कमीच पडेल…पण बापाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे..(बाप पण त्या योग्यतेचा हवाच) पण शेवटी अशा माझ्या सामर्थ्यवान बापाला सगळ्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी बळ देत असते तीच ही माझी सामर्थ्यवान आई…
सलाम आशा किर्तीवंत जीविताला..
– नूतन जाधव
Leave a Reply