नवीन लेखन...

माझा चड्डी यार – भाग २

अर्थात हे सारे त्यावेळच्या काळ व परिस्तिती प्रमाणे होते. जीवनाची दोन टोके. एकात होती भव्य दिव्यता. सुस्थिर आर्थिक परिस्थिती. हाताशी प्रत्येक गोष्ट सहजपणे साध्य होण्याची शक्यता. तर दुसरीकडे नजरेंत भरेल अशी गरीबी, असहायता, जगण्यासाठीची धडपड. परंतु हे सारे आजच्या चश्म्यातून बघताना, त्यावेळी जरी हेच होते, तरी त्या बाल वयांतील मनाला कोणतीच पर्वा नव्हती. काळजी नव्हती. आम्ही फक्त मित्र एकत्र राहू, खेळू, इच्छीणारे होतो. ह्याच अंतरीक इच्छेपायी परिस्थितीच्या भिन्नतेची गढद काळी छाया आमच्यावर पडू शकली नाही. त्याचा आम्ही केंव्हाच स्विकार केला नव्हता. याच कारणास्तव जीवनरेखा वेगळ्या  तरीही समांतर जात होत्या.

बाल वयांत मारुती सर्वच खेळांमध्ये माझ्या बरांच वरचढ होता. मोज मापत जर बोलावयाचे तर तो पाचपट माझ्यापेक्षा खेळांत पुढेच असावयाचा. हां ! मात्र त्याच काळातील अभ्यासामधील प्रगतीचा जर शोध वा आलेख घेतला, तर मी त्याच्या पुढे नेहमी दोन पाऊले जास्त होतो. हे ही एक सत्य आहे. माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील, त्याच्यापुढे असण्याचे कारण,  मला त्याच वेळी नजरे समोर आलेले मी जाणले.

 

मारुती नियमीत घरी येत असे. गप्पा, चर्चा, सतत होत असे. तो खेळण्याच्या गप्पामध्ये रस घेत होता. तर मी पुस्तकामधील वाचलेले सांगुन त्याची व पर्यायाने दोघांची करमणूक करीत असे.

एका दिवसाची घटना मला फार चांगली आठवते. आम्ही दोघे बोलत बसलो होतो. अभ्यासा संबंधी विषय होता. मी त्याला म्हटले   “ मारुती ह्या पुस्तकामधील पांच गणित मी सोडवतो. तीच तु पण सोडव. आपण दोघे उद्या सकाळी त्याची उत्तरे बघूत.”  मारुती लगेच म्हणाला  “ मी रात्रीचा अभ्यास करीत नसतो. जेव्हां जमेल तेव्हां फक्त दिवसाच करतो.   मला आश्चर्य वाटले.     “ आरे मी तर रोज रात्री तासभर तरी अभ्यास करीत असतो. रात्री जेवणानंतर एक तास मी अभ्यासांत खर्च करतो. चांगले असते. वातावरण पण शांत असते.”   मारुती शांत मनाने ऐकत होता.    “  भगवान मलापण रात्रीचा अभ्यास करणे आवडते. परंतु आमच्या घरी दिवा नाही. कंदील वा चिमणी नाही. अंधारांमुळे अभ्यास करता येत नाही. मारुती एकदम गप्प झाला. “

घरांत शेजारच्या खोलीत वडील वाचत पडलेले होते. आमचे बोलणे त्यांच्या कानावर पडले. त्यानी चटकन आम्हा दोघाना हाक दिली.   “  मारुती तु कोठे रहतोस.?   जर जवळच असेल तर रोज रात्रीचा येथेच ये. तू व भगवान मिळून अभ्यास करा. तुझी सर्व सोय केली जाईल. फक्त तुझ्या घरी वडीलांना विचारुन दररोज येत जा. “

हाच एक अत्यंत महत्वाचा क्षण, माझ्या जीवनाशी संबंधीत झाला होता. जो एक Life Turning point ठरला गेला.  आमच्या मैत्रीचे, आपुलकीचे धागे आवळत चालले होते. त्याची चेतना व साथ घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडूनच मिळत गेली. आम्ही दोघे दररोज नियमीतपणे अभ्यास करीत असू. अभ्यास करण्यासाठीच्या सर्व तांत्रीक बाबी वा

 

सोई घरातूनच व्यवस्थीत मिळू लागल्या. कोणतीही गैरसोय होत नव्हती. आमची अभ्यास करण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली होती. आणि ती बाब आमच्या दोघांच्या आवडी व स्वभावानुसार निश्चीत होत होती. मला पुस्तक वाचणे आवडायचे, तर त्याला केवळ ऐकून ज्ञान मिळवण्यात आनंद वाटे. तो मात्र अतिशय लक्ष केंद्रित करुन ऐकत असे. थोडेसे वाचन, त्यावर चर्चा ही पद्धत आम्ही अंगीकारली होती.

येथेच एक अत्यंत महत्वाचे Observation सांगतो.  आमची दोघांची अभ्यास करण्याची ही सवय वा पद्धत , आम्ही फक्त बालवयांतच अंगीकारीत होतो, असे नव्हे, तर तशीच पद्धत पुढे भावी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही योजीत होतो. तसाच अभ्यास औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना देखील करीत होतो. एका खोलीत बसून अभ्यास करीत असू.  Medicine, Surgery, Gynecology, आणि इतर वैद्यकीय पुस्तके आम्ही मिळून वाचीत असु. चर्चा करीत असू. तेथेही मी प्रत्यक्ष पुस्तक वाचत होतो, व तो समोर बसुन ते वाचन लक्ष देऊन ऐकत असे. चर्चा होई, एकमेकांच्या चुका वा समज दुरुस्त केल्या जात असे. हीच ज्ञान साधना पद्धती, प्रक्रिया शैक्षणीक काळ पर्यंत जोपासली होती.

बालपणी आभ्यास करताना आई सरबत. दुध, फळे, वा खाण्याचे पदार्थ देत असे. आमचा तो विश्रांतीचा काळ ( Interval ) मजेत जात होता.

मी माझ्या वडीलांना “ भाऊ ” व आईला  “ ताई “  ह्या नावांनी संबोधीत असे. अर्थात नाम संबोधन ही प्रक्रिया जुन्या काळी साचेबद्ध नव्हती. तेथे आजकालचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. घरांतील वडील मंडळी जे म्हणतील, जसे संबोधन करतील तेच लागु होत असे. तेथे न नियम होते ना पद्धती. मोठे मामा माझ्या वडीलाना “ भाऊ “  म्हणाले, माझ्या आईला ते

“ ताई “ संबोधायचे. बस असेच आम्ही भावंडानी त्याचे नामकरण अंगीकारले. त्याला त्या काळी कुणीच विरोध केला नसेल, आणि मान्यता मिळाली. नात्याच्या स्तरावर बाबा, आई, मामा, काका, आत्या, दादा, ताई, आक्का इत्यादी नाते नामकरणे त्या काळी वेगळीच होऊन जात होती. ह्यातूनच बप्पा, आबा, बापू, मा, माई, बाई, दीदी, अम्मा, इत्यादी प्रकारची नामावळी होती. हे नांव उच्चरल्या नंतर ते माझे कोण हे कित्येक वेळा सांगणे गरजेचे होई. आई, बाबा … म्हणताच नात्याचा इतरांना बोध होतो, तसे बापू, अम्मा …. इत्यादीत उलगडा करावा लागे.

मारुती देखील माझ्या वडीलांना भाऊ व माझ्या आईला ताई याच पद्धतीने संबोधीत असे. जणू त्यानेच मैत्रीचे नव्हे तर बंधूत्वाचे नाते आमच्या घराण्याशी निर्माण केले होते.

 

मारुती व मी दोघे रात्री अभ्यास करुन बरोबर रात्री १० वाजतां  झोपत असू. घरांत एक गजराचे घड्याळ मजसाठी दिलेले होते. रोज आम्ही गजर लाऊन सकाळी पांच वाजता उठत असू. घराच्या मागील परसदारी एक मोठी विहीर होती. त्यावर पाणी

 

काढण्यासाठी रहाटचक्र पक्के लावलेले होते. सकाळीच आम्ही पाणी काढीत असू. गम्मत म्हणजे सकाळचे पाणी खुपच गरम असायचे. वातावरणाच्या मानाने एकदम कोंम्बट

( Warm water ) . आम्ही हात पाय धुवुन खोलीमध्ये थोडावेळ अभ्यास करीत असू.

एकदा कुलकर्णी गुरुजी म्हणाले होते सकाळी गार पाण्याने स्नान करणे प्रकृतीसाठी फार चांगले असते. बस माझ्या डोक्यांत ते शिरले. तसे सकाळचे नुकतेच उपसलेले पाणी खुपच गरम असते. मी पण ठरऊन टाकले की आपण गार पाण्याने स्नान करावे.  दुसऱ्याच दिवशी मी सकाळी उठताच विहीरीच्या गार पाण्याने स्नान करु लागलो. मारुती मला मदत करीत असे. तो पाणी उपसुन देई. ती बादली भरुन काढलेले पाणी माझ्या अंगाखाद्यावर टाकीत असे. दोन चार बादल्या पाणी उपसले जाई. मारुती ह्यात सहकार्य व मेहनत घेई. असे बराच काळ पुढे चालले.

सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे.

एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे.  ही पिके येऊ लागताच, आम्ही आमच्या व्यायामाची घोडदौड त्या दिशेने घेऊन जात असु. व सकाळच्या प्रहरी, शांत वातावरणात, कुणीही बघत नाही याचा कानोसा घेत,चक्क तेथे तारे खालून शिरुन शेतात जात असू. ते पिक आमच्या पोटाच्या क्षमते प्रमाणेच खात असू. आनंद घेत असू. ज्यांमध्ये इतर भावना, जसे भय, निर्लजापणा, दुसऱ्याचे पिक हडपणे, हे सारे बाल सुलभ दुर्गुण भरलेले होते. आज जेव्हा त्या आठवणी येतात, थोडीशी गम्मत वाटते, थोडीशी खंत वाटते. परंतु वयाचे पांघरुण त्या घटनावर चांगलेच आच्छादले जाऊन, दिलासा देत दुर्लक्ष करण्यास सांगते.

शाळेचे पटांगण हे अतिशय सुलभ, योग्य, असे साधन त्या काळांत आम्हास मिळाले होते. जेथे आम्ही मित्र मंडळी खेळत असू. एक घसरगुंडी होती. सुरपारंबा,  आम्ही खेळत असू. घरांत दिलेली रींग, बॉल, बँट, रँकेट, शटल फुल, फुटबॉल हे सर्व सामान्य खेळ होते. क्रिकेट त्या काळी तेथे नव्हते. विटी दांडू हे खेळ होते. मारुतीनेच मला सायकल चालवण्याची कला व बँलेंस शिकवले.

 

आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. नंतर जस जसे आम्ही पुढील वरच्या वर्गांत जाऊ लागलो, शाळेलाही वरचावर्ग स्थापन करण्याची शासकीय मान्यता मिळत गेली. आज तर ती संस्था फार मोठी झालेली कळते.  चंपावती शाळेच्या व्यवस्थापनेत नवीन शिक्षकांची भरती होतच होती. शाळेच्या संस्थापनेच्या संबंधीत कांही शिक्षक मंडळी होती. माझ्या माहितीप्रमाणे व आज मला आठवते,  ते होते, श्री. ना. के. महाशय गुरुजी. ते ही आम्हास शिकवायचे. तसेच घारपुरे गुरुजी, पांडे गुरुजी. तेथेच नवीन गुरुजी त्यावेळी आले ते मुकुंद घनशाम कुलकर्णी. ते सोलापुरचे होते. एका शब्दांत जर टिपणी करयची,  तर खऱ्या अर्थाने माझ्या संपुर्ण शैक्षणिक क्षेत्रामधील अतिशय उत्तम, आदर्शवादी, शिक्षक म्हणून मी त्याना प्रथम प्राधान्य देईन. जीवनाची इमारत जर पायावर आधारीत असते, तर माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया जबरदस्त पक्का व मजबुत बनविताना श्री. मुकुंद घनशाम कुलकर्णी गुरुजींचा प्रमुख सहभाग त्यांत होता. त्यानी पुस्तकी ज्ञान, अभ्यास क्षेत्र, व्यायाम, ह्या प्रांतामध्ये शिक्षकी मार्गदर्शन केले.  तसेच ते सतत जीवन म्हणजे काय, जीवनाला कसे सामोरे जावे, जीवनातील यश मिळवणे हेच कोणतेही शिक्षण घेण्याचे सार असते. ध्येय असावे लागते हे सांगत. अनेक सामान्य विषयांची चर्चा करीत. आमच्या विकसीत होऊ पाहणाऱ्या बुद्धीला सतत चालना व चैतन्य देत असत. अनेक छोटी छोटी उदाहरणे, सांगुन थोरा मोठ्यांच्या यश्स्वी जीवनाच्या कथा वर्णन करीत. अभ्यास, ज्ञान, आणि जीवन या तिन्ही गोष्टी यशस्वी करण्यावर त्यांचा भर होता. अनेक वेळा सांज समयी ते फिरावयास जायचे, त्याच वेळी मारुती व मी ती वेळ हेरुन त्यांच्या बरोबर जात होतो.  त्यांच्या सहज वा सामान्य बोलण्यातच आम्हाला कित्तेक विषयांच्या गम्मती कळत असते. एक प्रेमळ गुरु शिष्य नाते होते. शाळेमध्ये त्यानी अनेक नव्या नव्या योजना राबवल्या. मारुती व मी, आम्हा दोघाना ते विशेष महत्व द्यायचे. आम्ही पण सारे मन लाऊन ती कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे. दोन योजनांचा मी प्राथमिकतेने उल्लेख करु इच्छीतो.

शाळा तशी खुपच लहान होती. परंतु त्यानी तीचे नांव बीडच्या परिसरांत व जिल्ह्यांत दुरपर्यंत नेऊन ठेवले. त्याच शाळेत त्यानी ज्ञान विकास   ह्या नावाचे हस्त लिखीत मासिक सुरु केले होते. मासिक फक्त विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यानीच चालविलेले हेते. सारी  सकल्पना कुलकर्णी गुरुजींचीच. सर्व विद्यार्थ्याना लेखनाची गोडी निर्माण करणे हा प्रमुख हेतू. मला म्हणजे भगवान ह्या विद्यार्थ्याला  संपादक ज्ञान विकास म्हणून निवडले गेले.

आज ज्येष्ठ वयाच्या वळणावर, त्या घटनेबद्दल खूप आनंद व समाधान वाटते. त्या क्षणी मला फक्त आनंद वाटला होता. कारण समाधानाचा संबंध योग्यतेशी, क्षमतेशी असतो. आणि त्याचे तसे विश्लेशन, त्यावेळी कसे असणार. अर्थात न धरी शस्त्र करी मी ह्या भगवंताचा वचनाप्रमाणे कुलकर्णी गुरुजी सतत पाठीशी होते. सर्व विद्यार्थ्याचे लेख कविता जमाकरणे, वाचून संपादन करणे, चांगला वा वाईट म्हणून त्यावर टिपणी करणे, हे काम मजवर सोपविले होते. शेवटी कुलकर्णी गुरुजी त्यावर मत देऊन लेख निकाली काढीत. सर्व लेख श्री कुलकर्णी गुरुजीनी स्वतःहाच्या हातानेच लिहीले होते. त्याकाळी छपाई करणे हे मार्ग फार दुर्मिळ होते.

ज्ञान विकास हस्त लिखीत मासिक संपादक भगवान नागापूरकर वर्ग ८ वा.       आज त्याची खुप गम्मत वाटते. येथेच  माझी एक फजीती झाल्याची आठवण येते. माझा मित्र मारुती याने एक लेख लिहून मासिकासाठी दिला. त्यानी नांव दिले होते  “ मुऱ्हाळी

 

मला त्याचाच अर्थ माहीत नव्हता. त्याचा बोध मला झाला नाही. ते सारे क्षुल्लक समजुन मी तो ‘अस्विकृत”  अशी टिपणी करुन बाजूस टाकला. सर्व लेखांचा गठ्ठा मी कुलकर्णी गुरुजीकडे दिला. दोन दिवसानंतर तोच गठ्ठा मला परत देण्यांत आला. माझे लक्ष वेधले गेले ते मारुतीच्या मुऱ्हाळी ह्या लेखावर. गुरुजीनी लाल शाईने पहील्या पानावर लिहीले होते

 “ उत्तम लेख प्रथम क्रमांक “   मी खजील झालो. कुलकर्णी गुरुजीनी मला बोलाऊन सांगितले.  “  मुऱ्हाळी ही भावनिक व्यक्तीरेखा आहे. हा प्रेमळ भाऊ असतो. तो आपल्या लग्न झालेल्या बहीणीकडे जातो. तीला दिवाळीसाठी तीच्या माहेरी म्हणजे आई वडीलांकडे घेऊन येण्याचा प्रचत्न करतो. हा अतिशय भावनापुर्ण व प्रेमळ प्रसंग असतो. मारुतीने त्यावरच बहीण भाऊ प्रेमाचा नैसर्गिक धागा धरुन,  सुंदर प्रकाश झोत टाकला. तु पण असेच लिहीत जा. “

मारुतीचे हेही वेगळे स्वरुप माझ्या ध्यानी आले. त्यावेळी मला माझ्या विषयी खंत व लज्जा वाटू लागला. मारुतीने दिलेल्या शिर्षकाचे मुऱ्हाळी या शब्दाचे अवलोकनच झाले नव्हते.

गुरुजीनी दुसरी अशीच योजना फार यशस्वी केली. त्याच शाळेंत प्रदर्शन भरऊन.  मारुतीला ह्या योजनेमध्ये प्रमुख केले गेले होते. त्याच्या बरोबर आम्ही आठजण इतर मित्र मंडळी होतो. गुरुजींचे मार्गदर्शन होते. मारुती सारी योजना कामे आमच्याकडून करऊन घेत असत. चित्रकला, हस्तकौशल्य, वैज्ञानीक प्रयोग, अनेक चित्र विचीत्र गोळा केलेले पदार्थ, रांगोळ्या, दैनंदीन जीवनामधील प्रात्यक्षीके, ईत्यादी अनेक अनेक दालनानी त्या प्रदर्शनांत खपच भव्यता, दिव्यता आणली होती. मारुती व मी दोघेही, त्या प्रदर्शन निर्मीती मध्येखुपच प्रयत्नशील व यशस्वी ठरलो. अर्थात कुलकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली.

आमचे घराणे तसे फार सनातनी. जबरदस्त ब्राह्मणी पगडा. खाण्या पिण्यांत एकदम घासपुस खाणारे. अर्थात   Pure Vegetarian हे सारे माझ्या आजोबाच्या  काळातले. माझ्या वडीलांच्या पिढीपासून त्यांत थोडीशी सुधारणा झाली म्हणा. थोडीशी म्हणजे त्या तथाकथीत संपुर्ण शाकाहारी संकल्पनेत कोंबडीने अंडे घातले. याला एक कारण माझे वडील. शिक्षण व स्वकर्तृत्व याच्या आधारे ते निझामी राज्यांत तालूकदार अर्थात Collector ह्या पदावर विराजमान झाले होते. म्हणून संस्कारीक कर्मठपणा अंगी असून देखल परिस्थीतीजन्य वातावरणी बदल हा होणे अपेक्षीतच.

तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.

एकदा त्याच्या खाण्याच्या डब्यांत ब्रेड व अम्लेट होते. “ भगवान थोडेसे अम्लेट खातोस का ? खुप चवदार लागते. आवडले नाही तर पुन्हा खाऊ नकोस.  “     मी त्याक्षणी भाऊक झालो. Temptation येऊ लागले. आपण शाकाहरी अंडे कसे खाणार. घरांत त्यावेळी समोर कुणाच नव्हते. आजी तर थेट देवघरांत. आई स्वयंपाक घरांत. वडील बाहेर गेलेले.  मला कुलकर्णी गुरुजींचे शब्द आठवले. वर्गांत एकदा शिवताना ते म्हणाले होते. जे खाद्य पदार्थ असतात, त्यांत सर्व खाद्य घटक असावेत. जसे Proteins Carbohydrates, Oils, Vitamins, इत्यादी. पदार्थांत भेदभाव करु नये. प्रोटीन्स तर सर्वात महत्वाचे…. अर्थांत सर्व विचार व खाण्याची उत्पन्न झालेली इच्छा यानी त्या क्षणी तरी विजय मिळविला. मी मारुतीने देऊ केलेले त्याच्या डब्यातील अम्लेट घेतले. मला त्याची चव एकदम आवडले. अर्थात् हे सांगणे नको, की त्यानंतर मारुतीला अनेकदा त्याच्या खाण्याच्या डब्यांत अम्लेट हा पदार्थ करुन आणावा लागला. आजीची, आईची (ताईची) व वडीलांची (भाऊंची) नजर चुकवित सारे खाणे होई.

मारुतीने पुढील जीवनांत,  आगदी थेट District Health Officer Class I झाल्यानंतर देखील मला Non Veg पदार्थ खाण्याचा बराच प्रयत्न केला. घरी वा बाहेर हॉटेलमध्ये पण मी बधलो नाही. कारण निसर्गाने माझ्या पाठीवर जन्मतः ब्राह्मण हा शिक्का मारला होताना. तो कसा मिटणार.

मैत्रीच्या धाग्याचा अशाच एका प्रसंगात खुप समाधानी अनुभव आला. तो औरंगाबादला शासनात कार्यारत होता. मला बालरोग तज्ञ होण्यासाठी UNICEF ह्या संस्थेची शैक्षणिक शिष्यवृत्ती (scholarship) मिळाली होती. तसे शासकिय आदेश मिळाले. मला मुंबईला जाणे व स्थलांतरीत होणे गरजेचे होते.  नुकतीच आम्हाला जुळी मुले झाली होती. घरामध्ये घरचे म्हणून कुणीतरी वयस्कर हवे होते. मारुतीला माझी अडचण कळताच, त्याने आपल्या आईला काही दिवसासाठी मजकडे आणून सोडले होते. न विसरता येणारी ही घटना

 

तसे औरंगाबादला मारुतीच्या व माझ्या निवृत्तीच्या काळानंतर ही अनेकदा भेटी झाल्या. मला तो दिवस विशेषकरुन आठवतो. त्याच्या मुलगाही डॉक्टर झाला.  उच्य पदवी प्राप्त केली. औरंगाबादला एक मोठे स्पेशालीस्ट सेंटर काढले. मी ते बघण्यासाठी गेलो होतो. सर्व प्रशस्त व मोठे हॉस्पीटल बघीतले. आपरेशन थियेटर , सर्व अधूनिक यंत्र सामुग्री बघीतली. पेशंटची प्रचंड वर्दळ बघीतली. मारुतीच्या सर्व नातेवाइकांची भेट व परिचय करुन दिला गेला.

मारुतीचा हा फोफावला गेलेला प्रचंड वटवृक्ष बघताना खुप मन भरुन आले. समाधान व आनंद वाटला. सारे जीवन मारुतीने सार्थकी घातले होते. जीवन म्हणजे काय, ?

 

ते कसे जगावे व यशस्वी करावे, हा एक विलक्षण व प्रचंड संदेश त्याने स्वअनुभवाने स्वतःच्या जीवन चक्रामधून दिला.

न जाणो एका गमतीच्या प्रसंगाची याच भेटीत जाण झाली. दोन टोकाचे जीवन प्रसंग त्याच वेळी समोर आले. वय सात वर्षे. मी मारुतीच्या घरी पहील्यांदाच गेलो होतो, तो दिवस आठवला.

          मला प्रथम भिती वाटली होती. त्या झोपडीत शिरताना.  सारे फ्लोअर अर्थात ती झोपडीमधली जमीन सारवलेली नव्हती, खुप ठिकाणी विखुरलेली होती, काडी काट्यांचे तुकडे, अनेक खिळे, अस्ताव्यस्त पसरलेले व पडलेले दिसले. पायाला कांही टोचुन हानी होईल, ही छुपी जाण त्यावेळी मनात आली होती. परंतु मी मनाला सावरले….

आणि आज तसेच. वयाची ७० वर्षे झाल्यानंतर जेंव्हा मारुतीच्या घरी आलो.

          मला प्रथम भिती वाटली होती.   त्या घरांत शिरताना. सारे फ्लोअर अर्थात ती विशाल घरातल्या जमनीची फरशी लक्ष ओढून घेत होती. अतिशय चमकदार, चकचकीत, स्वच्छ प्रचंड गुळगुळीत. मी बघत होतो. न जाणो माझा पाय घसरुन माझी हानी होईल ही छुपी जाण त्या वेळी मनात आली. परंतु मी मनाला सावरले….

मारुतीने फक्त झोपडीच बदलली नव्हते, त्यातील रहाणीमान बदलले नव्हते, तर संपुर्ण जीवन जगण्याची Style  च बदलून टाकली होती. संपुर्ण संस्कार बदलले होते.  आणि हे करताना त्याने आपले सर्व घराणे, त्याच्यातील माणसे, खऱ्या अर्थाने सारा समाज बदलाचे संकेत जगापूढे ठेवले.

मारुती माझा तो चड्डी यार ! अर्थात बाल मित्र.  वयाच्या सात वर्षापासून सहवास  व संबंध.  तरी मी त्याला, त्याच्या विलक्षण व अफाट कर्तृत्वाला, जगण्याच्या जिद्द, धडपड, व यश मिळवण्याच्या कार्यक्षमतेला  सलाम करतो.

 आज सुट बुट घालत हाती यशाचा ध्वजा फडकवत चाललेला   

                                 डॉ. मारुती शंकरराव अतकरे

 

बाल जीवन चक्राच्या आठवणी सांगणारा

 

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
संपर्क- ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..