माझा चड्डीयार हा लेख अनेक भागामध्ये सादर करत आहोत….
भाग- १
किती हस्यास्पद वाटते. हे एकून. परंतु एक महान सत्य. आम्ही दोघेही अतिशय सामान्य व्यक्तीमत्वाचे. सर्व साधारण जीवन क्रमाने जाणारे. शेजारच घर सोडल तर आमचा तसा परिचय दुसऱ्या घराला सुद्धा नाही. आगदी आज दोघानी वयाची पंचाहत्तरी पार केलेली असताना.
आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.
माझा प्रिय मित्र डॉ. मारुती शंकरराव अतकरे वय ७५ वर्षे पुर्ण करुन, पुढे गेलेले. वयाच्या सात वर्षापासुनचा मित्र. म्हणूनच मी त्याला चड्डीयार म्हणालो. खूपजण आगदी बालपणापासून मित्र असतात. ते वयाच्या अखेर पर्यंत . आज पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर मी त्याचा व आमच्या मित्रत्वाचा आलेख काढू लागलो. खुपशा आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. गम्मत वाटली, कौतूक वाटले, आश्चर्य वाटले. विलक्षण असे मनोरंजन झाले. केवळ त्या आलेखानेच मला कळले की जीवन म्हणजे काय असते. प्रत्येक प्रसंग निराळा, चमत्काराने परिपूर्ण, अगम्य, आणि कल्पनातीत असलेला. प्रत्येक प्रसंगाने विचाराना चालना मिळत गेली. प्रासंगीक अंदाज बांधले गेले. कदाचित् त्या घटनाना, भविष्याची जोड देताना, फक्त त्या त्या वेळेचा विचार व भावना यांचा आधार घेत कल्पना करीत गेलो. दुरद्दष्टीची कमतरता होती हे नंतर जाणवले.
डॉ. मारुती शंकरराव अतकरे याच्या केवळ बाल वयाच्या काळाला अनुसरुन मी टिपणी करु इच्छीतो. आमच्या जीवनाची सुरवातच मुळी वेगवेगळ्या टोकाची, अतिशय भिन्न वातावरणाची. जर त्याच वर्णन बघीतल, तर आम्ही दोघे जवळ येऊन मित्र होऊ शकू कां? हा प्रश्न येतो. परंतु हे घडले. आर्थिक भिन्नता, कौटूंबीक वेगळेपणा, खाण्यापिण्याचा दोन टोकाच्या सवई, धार्मिकतेचा प्रचंड पगडा, ह्या साऱ्या बाबी अनुभवत आम्ही पुढे गेलो.
आजच्या क्षणी मी जेव्हा गंभीर होऊन विचार करु लागतो, तेंव्हा एक गोष्ट प्रखरतेने जाणली जाते, मारुतीची व माझी मैत्री होणे हे स्वाभाविक व परिस्थितीनुरुप असू शकेल. थोडासा आपलेपणा, प्रेम , हे सारे ठिक. परंतु ती समांतर चालत जाणे आणि पुढे पासष्ट वर्षापेक्षाही जास्त काळ, आज तागायत टिकणे, हे मात्र विलक्षण वाटू लागते. एकदम आश्चर्य जनक.
कारण बाल वयांत दोघांच्या जीवन रेखा एकदम वेगळ्या व परस्पर एकदम भिन्न. दोन वेगवेगळे संस्कार. भिन्न मार्ग, भिन्न प्रयत्न, भीन्न वातावरण, भिन्न परिस्थिती. तीचे पैलू केव्हांच जुळण्याची वा जवळ यैण्याची सुतराम शक्यता नव्हती. सारेच आघात करणारे. आणि काळ म्हणाल तर तो एकोणीसशे पन्नास ( १९५० ) च्या भोवती घुटमळणारा.
फक्त एकच समाईक धागा दोघाना बांधून ठेवीत होता. तो म्हणजे वैचारीक स्वभाव, भावना, व विचाराची ठेवण. ह्याच इतक्या जमणाऱ्या व जुळत्या होत्या की त्याचे एक मेकाशी आकर्षण निर्माण झाले होते, आणि ते नैसर्गिक होते.
कृत्रीमतेला तेथे वाव नव्हता.
कोणती कृत्रीमता ? त्यावर विचार करु लागलो. मला आज तागायत मारुतीची जात कोणती हे माहीत नाही. आणि मी केंव्हाही तशी विचारणा केली नाही. फक्त आजकालच्या शैक्षणीक चोकटीमध्ये तो स्वतःला ‘ मागास ‘ ह्या वर्गांत टाकतो. तेव्हांच ध्यानी आले की त्याची जात मागास वर्गात मोडणारी आहे. मी मात्र अस्सल ब्राह्मण कुळातला. तथाकथीत सवर्ण, श्रेष्ठ, हा जन्मजात शिक्का पाठीवर घेऊन फिरणारा. आजच्या प्रचंड व अतिशय वेगाने बदलत जाणाऱ्या समाज धारणेत, त्याला फारसे महत्व मुळीच राहीले नाही. स्पर्ष अस्पर्षता तर पुर्ण बाजूस पडलेली आहे. आजकाल कुणाच्या डोक्यांत खऱ्या अर्थाने जाती पातीचा विचार डोकावत नसतो. हां ! मात्र जेंव्हा कांही योजनेचा फायदा घेणे हे समोर येते, तेव्हांच तो प्रश्न ऐरणीवर येतो. संघर्ष होतो. नसता दैनंदीन वागण्यामध्ये, सामाजीक जीवन हालचालीमध्ये, व्यवहारामध्ये त्याला मुळीच महत्व दिले जात नाही.
१९५० चा तो काळ, अर्थात ६५- ६६ वर्षापूर्वीचा तो काळ आठवा अथवा त्याचा अभ्यास करा. समाज अस्तीत्वाची, परिस्थीतीची जाणीव प्रखरतेने कळू लागेल. “ समाजपरिवर्तन समाजजीवन सुधारणा, प्रतिगामी वृत्तीपासून पुरोगामी संकल्पनेकडे, विज्ञान आधारीत द्द्रिष्टीकोन “ या बाबी तर चालूच होत्या. मात्र परिवर्तनाचा वेग खूपच हलके होता. कडवटपणा धर्माला चिटकून राहण्याचा संदेश देत होता, तर वैज्ञानीक विचारधारा अंद्धश्रद्धेला खतपाणी घालण्यास विरोध करीत होत्या. सवर्ण आणि मागासवर्ग ह्या गोष्टी सतत धगधगणाऱ्या होत्या. ज्याच्या त्याच्या विचारधारणे प्रमाणे प्रतिगामी व पुरोगामी यांचा वैचारीक संघर्ष असे. समाज सुधारणेच्या वाटेवर होता. आजही चालत आहे. फक्त वेगाचा फरक.
मी बाल वयातला. बाल मनाचा व विचाराचा. जाती पातीच्या संघर्ष समजण्याच्या वया पेक्षा बराच लहान. व दूर असलेला. मला फक्त दिसत होते ते प्रेम, अपुलकी, वैचारीक सारखेपणा, आणि आवड निवड.
मारुतीने आग्रह केला “ माझ्या घरी ये की एकदा. “ मी त्याच्या बरोबर त्याच्या घरी गेलो. माझ्या विचार ठेवणीला, राहणीमान ठेवणाला एक जबरदस्त झटका बसला, तो त्याच्या घरी प्रथम पाऊल टाकले त्या क्षणी.
अतिशय अस्वच्छ परिसर. सर्वत्र झोपड्या. कोणत्याही झोपडीस दार नव्हते. खिडक्यांचा तर प्रश्नच नव्हता. झाडांच्या फांद्या, वाळलेली पाने, गवताचे भारे, लाकडे वा वेळूचे खांब, काथ्या दोऱ्यांनी बांधलेले, कोठे कोठे पत्र्याचे तुकडे, वा कौलारु टाकलेले दिसून आले. ह्या सर्व झोपडपट्टीत एक झोपडी मारुतीची होती. मला आत नेले गेले. आत छोटीशी जागा. फाटकी घोंगडी व पोते अंथरलेले होते. तेथे बसलो. समोर एक पाण्याचे मडके होते. वरील भाग तुटलेला दिसत होता. त्यावर एक लाकडाचे फळकुट पाण्यावर झाकण म्हणून ठेवलेले होते. त्यावर एक ग्लास ऊलटा ठेवलेला. मारुतीने मला त्या मडक्यामधून पाणी काढून पिण्यास दिले. मी तहानलेला होतो. भरपूर पाणी प्यालो. घरांत कोपऱ्यांत मातीची चुल होती. गोळा केलेली काही लाकडे व शेणाच्या गवऱ्या होत्या.
मारुतीचे वडील कोपऱ्यांत बसले होते. फाटके, कळकट धोतर,. एक अंगरखा बऱ्यांच ठिकाणी फाटलेला, खालती शेणाणे सारऊन कांही जागी ऊकरलेल्या जमीनीवर बसलेले होते. समोर कटींग दाढी करण्याची एक धोपटी होती. तुटलेली खराब दिसत होती. मारुती म्हणाला “ भगवान हे माझे बाबा. नाव्ही आहेत. ते रोज सकाळी बाहेर फिरत रस्त्यावर पोटपाण्याचा धंदा करतात. केस कापणे ( हजामती हा शब्द मारुतीने त्यावेळी वापरला ) आणि दाढी करुन पैसे आणतात. आम्ही नाव्ही ( Barber ) आहोत. आत्ताच ते आले आहेत. जेवण करुन पुन्हा जातील. मी त्याना माझ्या संस्काराप्रमाणे वाकून नमस्कार केला. त्यानी हात वर करुन आशिर्वाद दिला. कोण आहे हा मुलगा. “ हा भगवान माझा मित्र “
आज ज्यावेळी मी त्या भुत काळाचा विचार करतो, माझ्या अंगावर शहारे येतात. झोपडीमध्ये गरीबीचे इतके ह्रदयद्रावक चित्र स्पष्ट दिसत होते, की अंगाचा थरकाप होत होता. एक प्रचंड गरीबी, सार घर, सार रहाणीमान, खाणं- पिणं, बघीतल्या नंतर सर्व कांही एक चिखल, एक दलदल झालेला पसारा वाटू लागला. आणि हे सारे त्यावेळी मी माझ्या डोळ्याने बघत होतो. आज काठावरुन बघताना, त्याच दलदलीमधून एक सुंदर, टपोरे, कमळाचे फुल फुललेले दिसले. प्रचंड मोठी पाने पसरलेली. त्याच पानावर मोती बिंदू वाटणारे पाण्याचे थेंब धारण केलेले. अभिमानाने डोलणारे फुल दिसत होते. मनाला आकर्षित करीत होते. त्या फुलाचे नांव होते “ डॉ. मारुती शंकरराव अतकरे “
( क्रमशः )
— डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply