“सारा मनाचा रे खेळ, तो विठ्ठल तरी तुला का बोलवील…?”
आस तुला त्याच्या दर्शनाची जणू इच्छा पूर्ण तो करील….
बघा जरा विचार करुन…
का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला?
का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर?
त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही?
असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…!
कोणी मनाच्या शांती साठी जात असेल, तर कोणी देवाच्या त्या तेजस्वी विठ्ठलाच्या मूर्ती दर्शनासाठी , कोणी नवस करण्या साठी म्हणून, तर कोणी नवस पूर्ण झाला म्हणून…!
प्रत्येकाच त्या वारी, दिंडीत जाण्याचं कारण जरी वेगवेगळे असले तरी , श्री विठ्ठलावर असलेली निर्मळ श्रद्धा मात्र सर्वांची सारखीच बरका…!
एकदा आमच्या गावात पंढरपूर ला जाण्यासाठी बाहेर गावाहून एक दिंडी आली दिंडीतील व्यक्तींचे स्वागत अन आमच्या गावात राहण्याची सोय गावा तर्फे झाली…!
सर्व जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या अलेल्याची सेवा करू लागले मला पण इच्छा झाली त्यांची काही तरी सेवा,मदत करण्याची, पण मी मदत अशी काहीच केली नाही मला फक्त त्यांच्याशी मनमोकळं बोलावं वाटत होतं, त्यांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घ्यायच होतं, मी दोन तीन आजी आजोबांना बोलत बसलो त्यांच्या सोबत हसी मजाक करत बसलो, तितक्यात माझी नजर एका कोपऱ्यात गेली एक आजोबा लाल फेटा घातलेला ,कापळी तो बुक्का ,अष्टगंधाचा टिळा, डोळ्यात एक वेगळंच तेज गालातल्या गालात हसत माझ्याकडे एकटक बघत होते…! मी त्यांच्या जवळ गेलो अन त्यांना विचारलं ओ बाबा का हसता आहात मला ? मी त्यांना बोललो तर ते म्हणाले “नगं असा जीव लाऊस लेका आम्ही आज आहोत तुझ्या गावात उद्या न्हाई तू कितीही जीव लावलास ना तरी आमचा जीव त्या विठ्ठलात अडकलाय रे….
नसता तुझ्या सारखे पोरं ,नातू , सोडून का आलो असतो असं वारीत” (मी निशब्द)
त्यांनी मला माझ्या घरी जाण्याचा आग्रह केला…
पण का? पुन्हा मी एका वेगळ्याच विचारात गुंतलो…!
नंतर मलाच त्यांच्या त्या विठ्ठलाच्या भक्तीची, प्रेमाची जाणीव झाली की त्यांना त्या विठ्ठलाच्या प्रेमापुढे कशाचाच मोह न्हवता
मी सहज जाताना त्यांच्या कडे स्मित हास्य करून तसाच घरी निघून गेलो अन मला त्यांच्यातच खरा विठ्ठल दिसला….!!!
— संतोष करमाळकर
बीड
आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपवरील #महाचर्चा_आषाढी_पंढरी या महाचर्चेचा भाग असलेला लेख.
Leave a Reply