आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ‘ ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते’ असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच….. म्हणजे माझा मोबाईल हो………
त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.
Leave a Reply