१-
‘डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो!’ असं कोण म्हणत? तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.’ या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, ‘याला काय माहित आमचे डॉक्टर?’ हे अगदी खरं आहे. पण मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका.
एक काळ असाही होता, जेव्हा लोक डॉक्टरानच्या मदती शिवाय जन्मत आणि मरत सुद्धा असत. मी त्याच काळात जन्माला आलो. आणि आता डॉक्टरांच्या तडाख्यात अडकलो. त्या माझ्या जन्मा पासून, मी स्वतःला डॉक्टरांना ‘कर दिया तेरे हवाले!’ म्हणून निवांत आहे. ( आणि त्या बद्दल मी त्यांचा ऋणी राहीन. कारण अनेकदा यमदूत दारा पर्यंत येऊन गेलाय! त्याचाशी लढताना जगण्याची रसद नेहमीच डॉक्टरानी पुरवली आहे!)
माझा पहिला डॉक्टर माझी आई होती, आणि पहिले औषध गुटी! मग बहुदा ग्राईप वॉटर! त्या काळी ‘डोंगरे बालामृत’ नामक, एक गुटगुटीत बाळाचं चित्र असलेले, लहान मुलाचं टॉनिक, भयंकर प्रसिद्ध होत. आजच्या लिकर ऍड पेक्षा, त्याची जाहिरात त्या काळी ज्यास्तच होती. घरोघरी, ज्ञानेश्वरी आणि ‘डोंगरे बालामृत’ हमखास असायचे! गमतीचा भाग असा होता कि, कोणतंच कार्ट त्या चित्रातल्या बाळासारखा गुटगुटीत झालेलं दिसलं नाही. कितीही बाटल्या पिल्या तरी! अस्मादिकांनी सुद्धा गंगाळभर बाटल्या रिचवल्याचे दाखले त्या काळच्या साळकाया-माळकाया देत.
‘इतकं खात – पीत, पण ततंगडंच!’ माझ्या आज्जीचा प्रेमळ शेरा. अस्तु.
लहानपणी तीन डॉक्टर,(म्हणजे माझ्या लहानपणी, डॉक्टरांच्या नव्हे!) आमच्या गल्लीत होते. डॉ.मांडे, डॉ. माखनीकर आणि अजून एक होते, त्यांचे नाव आठवत नाही. पण ते दिसायला एकदम सिनेमा नट वाटायचे. डिट्टो के.एन. सिंग सारखे! फाशी गेल्या सारखी एक भुवई टांगलेली अन बारीक डोळा. रंग पण काळाच. मी त्यांच्याकडे जात नसे. एकदा माझा मित्र दम्या गेल्ता, उपचार बाजूलाच राहिले, घाबरून त्याला जुलाब सुरु झाले. डॉ.माखनीकर म्हणजे, एकदम देखणा माणूस, गोरा, पांढरी पॅन्ट, इनशर्ट, एखाद्या इंग्रजांसारखा वाटायचा. त्याच्याकडे बायकाच ज्यास्त जायच्या, आम्ही त्याला ‘बायकी डॉक्टर’ म्हणायचो. गायनीक असावा, तेव्हा कळत नव्हतं. या दोघांच्या मानाने, डॉ. मांडे जवळचे वाटायचे.चौकोनी चेहरा अन मागे वळवलेले, लाटा लाटा सारख्या केसांच्या ठेवणीने, ते अशोककुमार सारखे दिसायचे. मध्यम उंची, प्रसन्न चेहरा. पेशंट नसले कि दवाखान्या बाहेर खुर्ची घेऊन सिगारेट पीत बसायचे. आमच्या घराबाराचे ते फॅमिली डॉक्टर. कारण ते माझ्या मोठ्या भावाचे मित्र होते.
माझे धडपडण्याचे वय होते. रोज कुठेना कुठे खरचटले, नाहीतर खोच पडलेली असायची.
“मेल्या, स्वयंपाकापेक्षा तुझ्या जखमात भरायला ज्यास्त हळद लागते! त्या पेक्षा डॉक्टर कडे जात जा.” एकदा आई, माझ्या कोपरावर हळदीची चिमूट सोडत म्हणाली. मी मान्य केले. दुसऱ्याच दिवशी दाम्याने किरायाची सायकल आणली, ‘सुरश्या, तुला सायकल शिकिवतो.’ म्हणाला अन सायकल वरून पाडून दिल. गुढगे फुटले. डॉ. मांडे कडे जाण्यात काहीच हरकत नव्हती, पण त्यांच्या कडे राघू होता! राघू म्हणजे त्यांचा कंपाउंडर!
‘कंपाउंडर’ हे त्या काळच्या वैद्यकीय व्यवसायातले मोठे प्रस्थ असायचे. त्याकाळी काही अनुभवी कंपाउंडर मूळ डॉक्टर पेक्षा जबर प्रॅक्टिस करायचे! कंपाउंडर म्हणजे, ज्याला आपण ‘पॅरामेडिकल फोर्स’ म्हणतो ते. हा राघू आमच्या डॉ.मांडेंचा फोर्स! तो दवाखान्या पासून पेशंट पर्यंत सगळ्यांना झडायचा! डॉक्टर सुद्धा कधीकधी त्याचीच बाजू घ्यायचे! नाका पेक्षा मोती जड! बँडेज करणे, औषध देणे, हि कामे तो, एका पार्टीशन मागे स्टूलवर बसून करायचा. त्या पार्टीशनची वरची आर्धी बाजू निळ्या काचेची असायची.
मी हिम्मत करून डॉ.मांडेंच्या दवाखान्यात घुसलो.
“का रे? कशाला आलास?’ डॉक्टरांनी मला विचारले.
“लागलंय!”
“कोण तू? पैशे आणलेस का?”
“नाही! माझा दादा म्हणाला होता कि, काही लागलं तर डॉक्टरकडे जा. माझं नाव सांग.”
“तुझ्या दादाच काय नाव?”
“चंदूराव दादा!”
“कुलकर्णी का? बँकेतले?”
“हो!”
“बघू काय लागलंय?” मी गुढगे दाखवले.
“काय झालं?”
” खेळताना सायकलवरून पडलो.”
“राघुकडे जा.” मला म्हणाले आणि रघूला ओरडून सांगितलं. ‘रघ्या, याच्या गुढग्याला पट्टी कर!’
मी पार्टीशन मध्ये गेलो.
“दोन दिवसं ये. दुपारी. डॉक्टर नसताना! पैशे घेऊन ये! बँडेज बदलून देतो आणि औषध सुद्धा दिन. डॉक्टरला नको सांगू!” तो समोरच्या माणसाला सांगताना मी ऐकले. तेव्हा काही कळलं नव्हतं. पण नंतर, डॉक्टर पगार वाढवू देत नाहीत म्हणून, हा असले धंदे करायचा हे समजलं. त्याचा किती फायदा झाला माहित नाही, पण त्या नंतर मला कधी डॉक्टरांसाठी थांबावे लागले नाही.
चौकोनी, उभ्या चपट्या बाटल्यात डॉक्टर, दोनचार औषधे एकत्र केलेले ‘मिक्सचर’, औषधाचा डोस पेशंटला दिला जायचा. त्यावर, एक पूजेतल्या वस्त्रमाळे सारखी, कागदाची पट्टी चिटकवलेले असे. त्या मार्किंग प्रमाणे, मग त्या बाटलीतले औषध सकाळ संध्याकाळ घ्यावे लागे. भाजीला जाताना जशी, आपण आठवणीने पिशवी नेतो, तसे दवाखान्यात जाताना अनुभवी पेशंट, औषधासाठी बाटली सोबत घेऊन जात. कम्पाउंडर त्यात डोस भरून द्यायचा. त्या डोसाने (बोली भाषेत -ढोस!) बहुतेक पेशंट बरे व्हायचे.
इंजक्शन म्हणजे, आजार भयंकर याची नांदी वाटायची. आज आपण ‘इंजक्शन दिले’ असे म्हणतो. त्याकाळी ‘केलं’ म्हणायचे. एखादी जनाबाई आपल्या शेजारणीला, दुपारी आपलं आजारपणाच कौतुक सांगायची.
“बाई! बाई!! कित्ती त्रास झाला! तापीन थाड थाड उडत होते! कपाळावर पापड ठेवला तर भाजून निघाला असता! मग, दवाखान्यात नेलं नवऱ्यानं. डॉक्टर सुद्धा कौतुक करत होता. ‘बाई, कस काय सोसतय म्हणून!’ लगेचच त्यान एक इंजेक्शक केलं! तुमाला सांगते काकू, सकाळ पर्यंत दरदरून घाम आला.आणि झाले कि ठणठणीत!”
एखाद्या आजारातून उठल्यावर, डॉक्टर पेशंटला टॉनिक द्यायचे. त्याला एक स्पेशल नाव होत. ‘महिन्याची बाटली!’ मी एकदा कपाळाला गुणाकारच्या चिन्हा सारखी पट्टी चिकवल्यावर, डॉक्टरांना ‘महिन्याची बाटली’ द्या कि, म्हणून आग्रह धरला होता. त्याला त्या कारण, त्या बाटलीला एक गोड बिस्किटा सारखा वास यायचा, तो मला खूप आवडायचा. डॉक्टर आणि आसपासचे लोक खोखो करून का हसले, ते कळलं नव्हतं. नकळत वय होत. आपण काही वावगं बोलतोय, असं कधी वाटलं नाही. कदाचित हीच निरागसता असावी.
वैद्यकीय व्यवसायात, वैद्य, आजून आपली प्रतिष्ठा टिकवून होते. पांढर स्वच्छ धोतर घातलेले, सात्विक चेहऱ्याचे, पाचपोर वैद्य, आजून माझ्या डोळ्या समोरून हालत नाहीत. ते नाडी परीक्षा करून औषध योजना करत. त्यांच्या हातगुणांचा लौकिक खूप दूरवर पसरलेला असावा. कारण लातूरहून, आमचे एक नातेवाईक, त्याच्या कडे दर महा येत असत. एकदा मला पोटात दुखतंय म्हणून, आई त्यांच्याकडे घेऊन गेली. त्यांच्याकडे सकाळीच उपाशी पोटी जावे लगे. तेव्हाच ते नाडी पहात. त्यांची हि, ओ पी डी सकाळी सात ते नऊ पर्यंत चालू असे. उजव्या हाताच्या आंगठ्याखाली मनगटावर, आपल्या तीन बोटानी त्यांनी माझी नाडी, काही सेकंद डोळे मिटून तपासली. त्यांच्या त्या बोटांचा स्पर्श खूप नाजूक होता.
” चार वाजता या, सात दिवसाच्या पुड्या घेऊन जा! साखर खाऊ देऊ नका. मागे पुढे मधुमेहाची शक्यता आहे. दिलेल्या पुड्या मधात चाटण करून घ्या.” (चाळीस वर्षांनी त्याचे डायग्नोसिस खरे ठरले!) त्यानंतर आजवर पोटदुखी माझ्या वाट्याला आली नाही. आज नाडी परीक्षेची विद्या संपुष्टता आली आहे. एकदा दुपारी तीन वाजता, एका आयुर्वेदिक म्हणवणाऱ्या डॉक्टरने नाडी पहिली आणि चुकीचे निदान केले. हल्ली ‘आयुर्वेदाच्या’ नावाने काय व्यवसाय चालू आहे, हे पहिले कि चीड येते. पाचपोरांसारख्या वैद्याच्या ज्ञानास, एक अध्यात्मिक स्पर्श असायचा, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातही ते पावित्र्य पाळायचे. सेवाभाव होताच पण ज्ञानाचा उन्माद नव्हता. रोग्यांची ‘नाडी’ त्यांना जी कळायची, ती, आता डॉक्टरांच्या हातून निसटली आहे, असे कधी कधी वाटते.
मी चार वाजता आई सोबत पुड्या आणायला गेलो. त्यांनी पुड्या आणि मधाची बाटली जमिनीवर ठेवली.
“आई, हे ‘सोवळ्यातले डॉक्टर’ आहेत का? सकाळी पण ते असेच नुसत्या धोत्रावर होते!”
पाठीत धपाटा का बसला कळाले नाही. तेव्हा वैद्य, हा श्रद्धेचा विषय होता. पाचपोरानी, त्यांच्या कडे येणाऱ्या रोग्यांकडून कधी एक पै सुद्धा घेतली नाही! हे मला नंतर कळले.
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतीकियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye. च. Bye.
Leave a Reply