स्वयंपाक हा विषय माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. अर्थात ह्यामध्ये करणं आणि खाणं असे दोन प्रकार पडतात. अर्थात दोनही प्रकार मला नेहमी आवडतात. पण शेवटी त्यातील दुसरा प्रकार माझ्या सर्वाधिक आवडीचा आहे. विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी माझी जीभ सदैव आतुर असते. म्हणजे तिखट, गोड, कडू, आंबट, तुरट , खारट अशा वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर आले की तोंडाला पाण्याची खळखळती धार सुरू होते.
वास्तविक महाविद्यालयीन जीवन जगत असताना शक्यतो घरापासून बराचसा काळ दूर राहावे लागते. त्यामुळे घरची चव आणि बाहेरची चव यात मात्र जमीन अस्मानाचा फरक मात्र चटकन लक्षात येतो. घरची चव म्हंटल की डोळ्यासमोर येत ते सात्विक जेवण मग त्यात अगदी केळीच पान हे प्रथम. वास्तविक आमच्या कोकणात साधारणपणे पाहुणी यायची झाली की केळीच्या पानांचा वापर पटापट वाढीस लागतो. कारण ह्या मुळे भांडी धुण्यापासून आराम मिळतो त्यामुळे संगनमताने गावातील बायका हा उपक्रम दरवर्षी चालवतात. आणि आपलं एक काम युक्तीने कमी करतात. शिवाय बाहेरील पाहुण्याला देखील केळीच्या पानावर जेवल्याचा आनंद गगनात मावणारा नसतो. मग त्याच्या वाटोळी काढलेली रांगोळी, पानाच्या वरच्या टोकावरील दही, लिंबाची फोड , त्याचा थोडं खालच्या बाजूला ओल्या नारळाची चटणी, एखादी कोशिंबीर , त्या जोडीला मुरलेल आंब्याचं लोणचं असेल तर अतिउत्तम नंतर मधोमध भाताची मुद, त्यावर वरण तुपाची धार, उजव्या भागावर एखादी रसभरीत भाजी, भाताच्या डाव्या बाजूला पोळी आणि त्यावर गोड पदार्थाची झलक, आणि ह्या साऱ्यानंतर वाटीभर मीठ घातलेलं ताक इ परिपूर्णतेने सजलेल हे पान, बाहेर हॉटेलमध्ये कितीही सजवलं तरी त्या डायनिंग टेबल ह्या प्रकारावर शोभून दिसत नाही, कारण ह्या अन्नाची खरी गोडी आहे ती खाली मांडी घालून बसून सर्व कुटुंबियांसोबत जेवण्याची. अगदी ह्याचप्रमाणे घरगुती न्याहारी म्हंटल की त्यातही बराच फरक पडतो. कारण त्यातील पदार्थ आणि बाहेरील पदार्थ ह्यांची सरमिसळ करण म्हणजे जणू त्या पदार्थांचा अपमान आहे असं मला वाटत. साधारणपणे घरातील न्याहारी ह्या विभागात कंदापोहे, उपमा, गोडाचा शिरा, दडपे पोहे, गरम भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा सोबत लसूण चटणी , फोडणीचा भात इत्यादी गोष्टी येतात. ज्या बाहेर खायला जाण म्हणजे हातच सोडून पाळत्याच्या पाठी लागण असच म्हणावं लागेल. हल्ली वेगवेगळी ऑनलाइन अँप आल्यामुळे मुलीला बघायला स्थळ आले की कांदेपोहे सुद्धा स्वीग्गी करतात हे माझ्या निदर्शनात आल्यावर मला 420 डिग्री चा करंट पत्करला अस वाटायला लागलं, आता काय म्हणावं ह्याला.
गेल्याच वर्षी माझ्या नात्यातल्या एका काकांकडे मे महिन्याच्या सुट्टीसाठी काही दिवस राहायला गेलो होतो. शहरात मध्यवर्ती ठिकाणी चांगला प्रशस्थ ब्लॉक होता त्यांचा, त्यांची एकुलती एक मुलगी म्हणजे माझी बहीण आता पांचीवीशीची घोडी झाल्यामुळे (हा शब्द आमच्या काकांनी उच्चारलेला मी नाही) तिच्या लग्नासाठी जवळ जवळ बावीसाव स्थळ येणार होत, मागील एकवीस स्थळ तिला नापसंत असल्यामुळे ही वेळ आज काकांवर आल्यामुळे असे उच्चारण होणे स्वाभाविकच होते म्हणा, तर पाच वाजता पाहुणे येणार होते. बहीण तयार होत होती आणि पावणे पाचलाच बेल वाजली. मी म्हंटल मुलगा लग्नासाठी भारीच उतावळा दिसतोय म्हणून दार उघडतो तोच दारावर स्वीग्गी बॉय पार्सल घेऊन आलेला. मी पार्सल घेतलं आणि आत काकुला नेऊन देत विचारलं.
“काकू, आत्ता स्वीग्गी कोणी केली बुवा?”
“कोणी म्हणजे काय, मीच केली, का रे?”
“आत्ता ह्या वेळी , काय मागवलस तरी काय रात्रीसाठी?”
“छे, रात्रीसाठी नव्हे आत्ता पाहुणे येतील ना, मग कांदेपोहे नकोत का? पाहिले पाच सहा वेळा हौशीने केले, आता रोज उठून कोण करणार त्यामुळे स्वीग्गी इज बेस्ट”काकू म्हणाली
” अहो पण संध्याकाळी कांदेपोहे देणारी स्वीग्गी नाही बुवा ऐकलेली?”
“कशी ऐकणार, हा हॉटेल वाला आमचा नेहमीचा आहे . गेल्या पंधरा वेला ह्यानेच कांदेपोहे पाठवलेले. त्याच काय आहे मुलगा पाहायला येण्याचं ठरलं की आम्ही त्याला कळवतो, की बरोबर ह्या वेळी पार्सल रेडी. ”
काकूंची ही कल्पना ऐकून माझ्या बहिणीच्या भावी नवऱ्याला देखील एखाद खास हॉटेल बघून ठेवावं लागणार ह्याची मला मात्र पुरेपूर कल्पना आली.
तर अशा गोष्टी म्हणजे निव्वळ फसवणूक, ह्याला दुसर काही म्हणता येणारच नाही.
अगदी असच बाहेरील पदार्थ बाहेर जाऊन न खाता घरी तयार करून खाणे किंवा बाहेरून घरी आणणे किंवा बाहेर जाऊन घरच्या सारख आमटी भात जेवणे हे सुद्धा वेडेपणाच लक्षण म्हणावं लागेल जस की अनेकदा मिसळ, रगडा पॅटिस, कांदाभजी ह्या गोष्टी घरात करून खाल्ल्या जातात, पण त्यात कोणतीही मजा नाही. आता पाणी पुरी किंवा भेळ जर घरी केली तर चौपाटीवरच्या लोकांना पोळीभाजी केंद्रच उघडावी लागतील. मिसळवाले किंवा टपरीवालयांना तर खाणावळ सुरू करावी लागेल, त्यामुळे जो तो पदार्थ त्या त्या ठिकाणी खण्यातच खरी गम्मत आहे. जस की वडापाव हा टपरीवर सोबत कटिंग घेत घेत संपवला पाहिजे. त्याची मजा हॉटेल मधल्या एअर कंडिशनर मध्ये खाण्यात नाही तसच कांदाभजी ही बाहेर पाऊस पडत असताना कुठेतरी आडोश्याला पावसाची मजा घेत , थंड हवेत , गरम गरम खाण्यात मज्जा आहे. अगदी असच एखाद्या रेस्ट्रोरंट मध्ये गेल्यावर साध जेवण जेवण्यापेक्षा पंजाबी, चायनीज, किंवा इटालियन ट्राय केलं तर चवीत ही बदल जाणवतो, शिवाय रोजच्या जेवणाच्या ताटाच्या किमतीत पाच पन्नास ऍड करून पैसे खर्च केल्याचं दुःख ही वाट्याला येत नाही आणि बायको, मैत्रीण किंवा मित्र ह्यांची मनही अगदी सहजतेने सांभाळता येतात.
— ©®तेजस नारायण खरे
P2 coming soon
Leave a Reply